मावळत्या दिनकरा…

युवा विवेक    13-Jul-2022   
Total Views |


sunset

सदा किती तापलेला असतोस अरे तू! तुझ्या अशा अवस्थेत तुला कसं सामोरं जावं काही कळत नाही. सदैव असं तापून राहण्याचा तुला काहीच त्रास होत नाही का? तापायला लागलास की, तुझ्याकडे नजर वर करून बघायचीही भीती वाटते.

 

थांब विषय बदलते हा. नाही तर तुला वाटेल तुझ्याबद्दल असलं भलतंसलतं काही लिहिण्यासाठी मी तुला पत्र लिहिलंय की काय. नाही रे नाही. पण सूर्य म्हटल्यावर पटकन हे रूप डोळ्यांपुढं आलं. त्यात आमच्याकडचा उकाडा एकदम बेक्कार. परत लिहिता लिहिता वाटलं, तळपताच सूर्य का लक्षात यावा आपल्या? उगवतीचं किंवा मावळतीचं तुझं रूप किती मोहक असतं! बघ... हे शब्द लिहिले आणि काय विचार डोक्यात आला माहितेय? उगवतीचा, मध्यान्हीचा आणि मावळतीचा तू अशी तुझी तीन रूपं म्हणजे बालपण, तारुण्य आणि म्हातारपण असेल का? उगवतीच्या तुला बघते ना मी रोजच. आज नारळाच्या झाडामागून उगवलास तरी रोज काही तीच जागा पक्की करत नाहीस. हळूहळू सरकत सरकत कधी डोंगरामागून येतोस तर कधी समोरच्या घरामागून. मला जसा त्याच त्याच कामांचा मधूनच कंटाळा येतो तसा तुलाही कंटाळा येतो का रे त्याच त्याच जागेचा? कधी कधी उगवताना अगदी सुरुवातीपासून छान हळूहळू वर येताना दिसतोस. पण कधी कधी अचानकच ढगांआडून एकदमच प्रकट होतोस. किती खट्याळपणा करायचा! पण तू जरी कितीही लपूनछपून यायचा प्रयत्न केलास ना तरी तुझी ती किरणं आहेत ना, ती फितुरी करतातच बरं. आकाशातली लालसर-केशरी छटा काही माझ्या नजरेतून सुटत नाही. तुझी ही खट्याळखोर वृत्ती पाहून मला तुझं ते रूप बालपणीचं वाटतं.

 

माध्यान्हीच्या तुझ्या रूपाबद्दल तर काय बोलू? तरुणपणी कसा मुलांमध्ये जोश असतो, रग असते म्हणजे कसे ते एकदम पेटलेले वाटतात त्या काळात. अल्लड, चंचल वृत्ती कमी होऊन समंजस झालेले असतात. तसा वाटतोस तू दुपारचा. खट्याळपणा सोडून फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणारा... एकेक अनुभव गाठीशी बांधत बांधत परिपक्वतेकडे प्रवास करणारा वाटतोस तेव्हा.

 

आणि मावळतीचा तू…. तुझं ते रूप तर मला प्रचंड म्हणजे प्रचंडच आवडतं. म्हणून तर मायना त्याच नावाचा आहे. पश्चिमेकडचा तेव्हाचा तुझा मोठा भडक लाल गोळा कितीही पाहिला तरी समाधान होत नाही. समाधान होण्याइतपत थांबतोस तरी कुठं म्हणा तेवढा वेळतुझं सगळं एकदम वक्तशीर. ठरलेल्या वेळी उगवायचं आणि ठरलेल्या वेळी मावळायचं. काय इतकी काय घाई असते परत जायची? दुसऱ्या दिवशी परत यायची काही तयारी करायची असते की काय? की दिवसभर तापल्यावर आमच्या पृथ्वीला क्षितीजावर भेटायची ओढ असते तुला? जणू काही प्रेयसीच ना ती तुझी! बघ काय काय कविकल्पना घोळायला लागल्या. पण संध्याकाळचं तुझं रूप पाहणं म्हणजे स्वर्गसुख वाटतं रे मला. त्यात जर मी समुद्रकिनारी असेन ना तर मनात कितीतरी आनंदाची झाडं उगवायला लागतात बघ. त्या झाडांच्या सावलीत मन इतकं शांत होतं की त्याचं वर्णन करताच येणार नाही. हळूहळू क्षितिजाकडे जाणारा तुझा तसाच भडक गोळा, आजूबाजूला ढगांना लाभलेली सोनेरी कडा, आकाशात घातलेला केशरसडा, तुझ्या अंगावर राखाडी-काळ्या ढगाची अगदी एखादीच बारीकशी रेष हे सगळं बघताना भान हरपायला होतं. त्यात किनाऱ्यावर जर मी एकटीच असेन तर गाजेची सोबत कायम साथ देण्याचं वचन दिल्यासारखी माझ्याबरोबर असते बघ. समुद्र पक्ष्यांची भिरभिर तेव्हा अजिबातच लुडबुडीची वाटत नाही. उलट तुझ्या बिंबासमोरुन जाणारे पक्षी पाहिले की निसर्गाच्या त्या भल्यामोठ्या कॅनव्हासबद्दल आकर्षण वाढायला लागतं. अशा वेळी त्या खाऱ्या पाण्यात भिजायला मात्र आवडत नाही मला. समोरचं पोर्ट्रेट शांतपणे बघत पाऊल बुडेल इतपतच समुद्राच्या फेनिल लाटांमध्ये उभं राहणं म्हणजे कमाल सुख वाटतं मला.

 

पण मावळतीच्या तुला बघायला समुद्रच हवा असं काही नाही हं. माझ्या घरातूनही तू तितकाच छान भासतोस मला. माझ्या घराच्या मागे ना मोकळ्यावर गुलमोहोराची झाडं अगदी शाळेत प्रार्थनेला एका रांगेत मुलं उभी असल्यासारखी उभी आहेत. त्यांच्या मागून तुला मावळताना बघायला छान वाटतं. त्यात जर गुलमोहोर फुललेला असेल तर बघायलाच नको. कधी कधी त्या फुलांचा आणि तुझा मावळतीचा रंग ठरवून म्याचिंग केल्यासारखा एकसारखा दिसतो. माझ्या बागेतून तुम्हाला असं न्याहाळताना तुम्ही सगळे कधी आपलेच वाटू लागता कळतही नाही. सुरुवातीला तुझे असे कितीतरी फोटो काढून ठेवले होते मी. अजूनही इच्छा होते कधी कधी. पण परत मनात येतं रोजच तर तुझं हे रूप दिसणार आहे, मग फोटो कशाला हवेत. प्रत्यक्षच तुझ्यासोबत प्रवास करावा ना थोडा. तेव्हा तुझ्या बाबतीत मात्र म्हणावसं वाटतं, 'प्रतिमेहूनी प्रत्यक्ष उत्कट...'

 

तुझ्या बाबतीत एक आश्चर्य वाटतं मात्र. किती नियमितता आहे तुझ्यात! रोजच्या रोज हजर व्हायचं, ठरलेलं काम करायचं आणि थोड्या काळासाठी रजा घ्यायची. त्याच त्याच रुटीनचा कंटाळा येत नाही का रे कधी? अर्थात कंटाळा येऊन कसं चालेल असंही आहेच की. सगळं जग विस्कळीत होऊन जाईल तुझ्या एखाद दिवसाच्याही रजेने आणि तुला तरी करमेल का? बरं आता पत्र बास करते आणि मावळतीकडे नजर लावून बसते. भेटत राहू रोजच.

तुझ्याच विश्वामधली एक…..

जस्मिन जोगळेकर.