नाटक झाले जन्माचे

युवा विवेक    14-Jul-2022   
Total Views |


natak

अंधार. निर्वात अंधार. अचानक कुठुनशी एक प्रकाशाची तिरीप त्या अंधारया कोपऱ्यावर येऊन कलंडते. तोल सावरत डोंबारणीच्या पोरीसारखी थरथरत उभी राहाते. कुठुन आली, कुठे चालली, कसलाच थांग नाही. जणू काळाचा एक निसटून पडलेला तुकडा लपत छपत, चुकार वाटेनं अनाहूतपणे यावा, तशी त्या अंधारात अचानक प्रकटलेली प्रकाशाची ती तिरीप आल्यासरशी त्या अंधाराचा एक कोपरा उजळून टाकते. कोपऱ्यात असते एक काळी, लाकडी खुर्ची. त्या क्षणापर्यंत त्या खुर्चीचं असणं, फक्त तिलाच ठाऊक असतं, खरं तर फक्त ठाऊक असतं; जाणिव नसते तिला तिच्याच अस्तित्वाची. अचानक झालेल्या या प्रकाशाच्या आगंतुक घुसखोरीनं तीही दचकते, शहारते आणि जराशी अंग चोरून बसते. समोरच्या भिंतीवरच्या रंगीबेरंगी सावल्या आज तिला पहिल्यांदा लख्ख दिसतात. काही भरजरी, काही भारदस्त तर काही उदास-मलूल, तर काही गुलछबु, गुलहौशी. प्रत्येक सावलीला तिचा तिचा एक बिनचेहऱ्याचा मुखवटा आहे. तिला तिचं म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व आहे, पण मग ते इतका काळ कुठे होतं? की, होतं पण या अंधाराच्या प्रतलात कुठेतरी हरवून गेलं होतं? आणि मग आज एका किरणानं, एका प्रकाशलकेरीनं या सगळ्यांची रहस्यं एकदम उघड केली? काळाच्या अंधाऱ्या परिघात बांधलेल्या या मुखवट्यांना असं अचानक प्रकाशझोतात आणलं? असं कसं घडलं पण? त्यांनाही त्यांची सुखदु:ख असतील, त्यांचे रागलोभ असतील, पण नाही... त्या एका प्रकाशाच्या सावलीत बाहेरची सगळी सुखदु:ख, सगळे क्षुद्र व्यवहार झाकोळून गेलेत, वितळून गेलेत. मागे उरलेत ते फक्त, विविध नावांचे देहहीन आत्मे. रुक्मिणी, कृष्ण, सुभद्रा, नारद, सुधाकर, सिंधू, तळीराम. नवनिर्मितीचा ध्यास घेतलेले अनेक विश्वकर्मा या प्रकाशानं आज उजळून निघतायत. तिसरी घंटा वाजली. खेळाला आरंभ होतोय.

 

खेळ. खेळ श्रृंगाराचा. खेळ अंगाराचा. अंगार. रंगपटावर कोसळणारे असंख्य अंगार. धुराचे उठणारे लोट. दहा तोंडांची दशावतारी रंगदेवता साक्षात रंगचंडिकेचं रूप घेऊन, थयथया नाचत आहे. त्याच अंगारांच्या लसलसत्या अग्नीडोहात, नैवेद्य मागत आहे, शापित यक्षगंधर्वांचा. चहूबाजूंनी धडाडून पेटलेलं यज्ञकुंड असावं आणि त्यात आहुती पडत जावी एकेक ताऱ्याची किंवा त्याच आगीच्या तापल्या धगीतून घडावं मौनरागाचं एक आदिम शिल्प. उल्कापातांनी विखरुन पडावीत त्या रंगपटावरील एकेक प्यादी, तेव्हाच शांत होईल कदाचित ती, दशमुखी रंगचंडिका...

 

इथे मोजायचे नसतात श्वास क्षणांच्या जुळणीनं, फक्त उसासत्या निश्वासांनी भरून घ्यायची असते ओंजळ आणि अर्घ्य द्यायचं असतं आयुष्यातल्या साऱ्या तापत्रयांचं, त्या मनस्विनी रंगचंडिकेला. कोसळणाऱ्या प्रकाशात अंधाराचा एक कण शोधत धडपडणारी हजारो नक्षत्रे येऊन विरतात इथल्या एका धुलीकणात.

 

मान अपमान, अहंकार, उद्वेग, द्वेष, मत्सर, करुणा, ईर्षा, आकांक्षा, साऱ्या भावभावनांची मोट बांधून फिरायचं असतं या जगाच्या रंगभूमीवरून.

 

भोग भोगून सुटत नाहीत, गाठी तोडून तुटत नाहीत, एक निश्वासाचा कण रेंगाळत, घुटमळत फिरत राहातो त्याच धुरकट अंधारात. सगळे पाश तुटले तर नियतीनं चकवे तरी कोणाच्या पायांत बांधायचे ना...

 

शेवटी नट तो नटच. कोणी नर्तक म्हणतं, कोणी नाच्या. नटानं नेटानं नाचत राहायलं पाहिजे. पडदा पडो अथवा न पडो, नाचत राहिलंच पाहिजे. रंगचंडीच्या प्रलयी तांडवासारखंच. नाटक रंगलं पाहिजे, टाळ्या घुमल्या पाहिजेत, शिट्या वाजल्या पाहिजेत आणि... आणि सगळयात महत्वाचं, शेवटी नाव लागलं पाहिजे, शेवटी नाव जगलं पाहिजे. शेवटपर्यंत. नाटकच सगळं. सगळ्याचं नाटक. प्रत्येक भूमिका उत्तम वठणं महत्वाचं.

जननी रंगभूमिश्च, स्वर्गादपि गरियसी

अक्षय संत