चेहरे

युवा विवेक    19-Jul-2022   
Total Views |


faces

त्यांची एक गंमतच असते, कधी निरखून पाहिलंय त्यांना?

गर्दीत आपलं लक्ष नसतं पण कधी लक्ष दिलं तर भारी गंमत असते ती!

आपलं तर असं आहे की जी व्यक्ती ज्या पेहरावात असते त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला पाहून त्यांच्याच भाषेत किंवा त्यांच्याच बोलीत त्यांच्या मौनातलं ऐकू येतं...

 

म्हणजे बघा हंss एखादी स्त्री बसस्टॉपवर इरकल साडी, डोक्यावर पदर, नाकातली नथ जी थेट खालच्या ओठांवर येऊन रुळणारी अशी बाई बऱ्याच वेळापासून ताटकळत उभी असलेली आपल्याला जाणवते.. तेव्हा त्यांच्याकडे नुसता कटाक्ष टाकला तरी मला ऐकू येतं "आता कधी येणार बया बस? घे ss म्हनुन गर्दीत आसन मला बसाया जागा कवा मिळायची? बरं मिळाली तरी शेजारी कुनी एकांदी जाड बाई न्हायतर बाप्या बसन तवा मी आन माझ्या सामानाच्या पिशव्या कशा मावायच्या? न्हायी मावल्या त कुनी मदत करन का? का आजून पाय पसरून बसन? माय काय धाक असतोय ह्या मांसायीचा!!!!!हे अक्षरशः तिच्या चेहऱ्यावर डोळ्यात तरळत असतं आणि माझ्या बालिश डोळ्यांनी टिपलेली असते त्या डोळ्यांची, चेहऱ्याची चिडचिड..! आणि तेंव्हाच नेमकी हल्ली हल्लीच मिसरूड उगवलेली दोन तरुण पोरटी गर्दीत दात दाखवत खी खी खु खू करत एकमेकांच्या कानात न जाणो काय खुसूर फुसूर करत असतात मधनचं लाजत काय असतात, टाळ्या काय देत असतात समोरच्याच्या गॉगलमध्ये बघून केसातून हात फिरवत भुवया उंचावताना हलकेच जीभ चावत डोळ्यातले चलबिचल भाव लपवत 'मी कुठे काय काहीच नाही' अशा आविर्भावात क्षणाक्षणाला त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात हे हावभाव निरखण म्हणजे मनाचा एक प्रकारचा सोहळाच असतो..

 

दिल अगदी गार्डन गार्डन होतं हे पाहताना!!

कधी कधी मुद्दामहून चालत जाण्याचा मुड होतो, तेंव्हा जरा बरे बाहेर पडण्यालायक कपडे अडकवून बुट घालून खिशात फोन टाकला की निघायचे रस्त्याच्या कडेने असा भटकायचा मुड असेल तर मुख्य रस्त्यावरून न जाता आतल्या बाजूचा किंवा गल्ली बोळातला रस्ता धरायचा... चालताना फार फास्ट चालायचं नाही किंवा खूप सावकाशही नाही.. मध्यम चाल ठेवायची.. जाताजाताचं अपार्टमेंटचे वॉचमन काका खुर्चीत पोक काढून बदली वॉचमनची वाट पाहात असताना मला बघून 'आता या वेळी ही कुठं निघाली भटकायला.. आम्हाला गेट ओलांडून पाच मिनिटसुद्धा जाता येईना अन् ही गेल्या चार तासात तिसऱ्यांदा बाहेर पडतेय 'हे अक्षरशः त्यांच्या थकलेल्या कंटाळलेल्या चेहऱ्यावर दिसलेलं सगळ नोट करून मी स्मित करून पुढं..

शेजारच्याच गणपती मंदिरा बाहेर दुर्वांच्या जुड्या टोपलीत घेउन बसलेली आजी थोड्या नाराज नजरेने नाक मुरडून..

 

'हं.. नास्तिक मेली कधी जुडी घ्यायची नई एखादी, आज तरी घे की गं बाय 'चेहरे सगळं बोलतात माझ्याशी!!!! डोळे मिचकावत मिश्किल हसून मी ही नजरेने आजीला चार गोष्टी सुनावून... पुढे!

देवळातही तेच.. न जाणो मोठ्ठं काहीतरी बाप्पाला मागून झालेलं असतं कुणाचंतरी.. मूर्तीकडे पाहताना 'बाप्पा हे एवढं एकच पूर्ण कर बाबा.. नंतर नाही मागणार लवकर काही ' हे असं सगळं मला चेहरे बघून वाटत असतं.. एवढी शोधक नजर तरी काय कामाची असं मी मलाच खडसावते आणि खाल मानेनं चालायचं असं बजावते दोनेक मिनिटं मन ऐकतं माझं, पण दुसऱ्या क्षणाला नवा चेहरा समोर आला की चेहरा बोलतो माझ्याशी मग मलाही अनादर करवत नाही चेहऱ्याचा.. चेहरे बोलतात माझ्याशी, मी टिपत आणि त्या चेहऱ्यांना प्रतिसाद देत पुढं ..

 

नवा चेहरा दिसला की,तो चेहरा वाचण्याच्या तंद्रीत असताना

ध्येच रिक्षावाला पुढे पुढे आडवा येतो कधीतरी, 'किधर जाना है मेडम.'. 'स्पेशल के शेअर करोगे मेडम'.. 'ओ मेडमsss ss मेडम' अन् मी 'अरे क्या है भैय्या नई चय्ये रिक्षा बिक्षा जाव ना तुम क्यु मधे मधे आते हो'!!

अन् तोच माझा चेहरा वाचतो नि समजून जातो 'हुकलेली हाय हीबाई' हे मला त्याचा चेहरा वाचल्यावर कळतं!!!

तसे गंभीर माणसांचे चेहरे पण बोलके असतात.. खरं तर मनातलं कितीही माणूस लपवयचा प्रयत्न करत असला तरी चेहरे लपवत नसतात काही. चेहरे बोलतात कितीही लाजरी बुजरी व्यक्ती असली तरी..

 

मनातलं सगळं चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत असतं!

अशी चेहरे निरखत चालायची माझी सवय मला एखादे दिवशी गोत्यात आणते की काय असेपण वाटते कधी कधी..

पण लागलेली सवय अशी थोडीच जाणारे

नंदी स्टॉपवरचा फळ वाला चाचा डोक्यावर गोल टोपी,

अंगात पठाणी पेहराव , वाढलेली दाढी नि त्यातून लालजर्द ओठातून डोकावताना केशरलेली , सुपरीचा तुकडा तोंडात घोळवणारी जीभ फिरवत, ग्राहकांशी बोलताना पानाचे शिंतोडे उडवत बोलणारं अजब गजब दिसणारं मिश्रण माझ्याशी मात्र फार न बोलता सांगू तितके आणि तिचं फळे देऊन मोकळा होतो.. मात्र चेहऱ्यावर असतं.

 

ये ताई ३०० रुपये से जादा कभीच नई लिती.. मालूम नयी इसका तिनसौ रुपये से क्या वास्ता है क्यायी की...

हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं असतं!! मी पण माझ्या चेहऱ्याच्या हावभावाने सांगितलेल असतं बचे हुवे दोनशे रुपये का पेट्रोल टाकने का है चाचा!!! कितपत तो चेहरा वाचू शकतो कुणास ठाऊक पण माझा चेहरा त्याच्याशी बोलतो खरा..

जरा चारचौघांपेक्षा वेगळे भाव दिसले की लागते माझीनजर त्यांच्या चेहऱ्यावरची अक्षरं शोधायला!! ही जाम भारी करमणूक असते घराबाहेर पडल्यावर आणि आपण फ्री असल्यावर वाणसामान आणायला गेल्यावर पण तेच वहीत लिहिलेलं सगळं भराभरा नोकराला काढायला लावून वाणी बिल बनवायला घेतो तेव्हा व्यवस्थित चौकोनी कागद यांना जमतच नसतात दोनतीन इंचाची रुंद आणि फुटभर लांब अशी चिटोरी म्हणजे यांचं बिल बर लिहितांना पण काय लिहितात देव जाणो कोणती वेगळी लिपी यांना शिकवलेली असते किराणा दुकानदारी चालवण्याच्या कोर्स मधे काय माहिती या वेळी वाणी माझा चेहरा वाचतो.

 

वाणी: 'बर थांबाsss दूसरी बनवतो.. एकच मिनिट हां'

मी: त्रासिक नजरेनंच त्याच्याकडे बघत (त्या नंतर)

वाणी: या वेळी शब्दांन न बोलता नजरेनेच 'ह्या पाह्य तई सगळं उत्तम दर्जाच असतय आपलं पण तेवढं आक्षरात खुडी काडू नका बाबा.. त्यापेक्षा ही आगरबत्तीच पाकीट फ्री तुमायीले!!' (हे सगळं मनातच म्हणत) उदबत्तीचं पाकीट पुढं सरकवत

 

त्यावर..

मी: आओ नको नको कशाला...

वाणी: तुमी नेहमीची माणसं ऱ्हावू द्या की वं..

आणि चेहरा बोलत असतो, त्यांचा.. तेवढं आक्षराला नावं ठीवू नका बघा..

हे असे चेहरे आणि त्यांच्या भाषा ज्यामुळे आपल्याला माणूस आतून समजतो आणि माणूस म्हणून आपणही अधिक समंजस होतं जातो

हां पण अट आहे की चेहरे वाचता आले पाहिजेत!!

 

- अमिता पेठे पैठणकर