ब्रशस्ट्रोक्स

युवा विवेक    30-Jul-2022   
Total Views |


brushstrock

आलम दुनियेत नजाकतीच्या महिरपी शोधायला निघालेल्या वेड्यापीरांना खळाळत्या संगमाच्या तोंडाशी एक वल्हं नसलेली नाव सापडते आणि मग शोध सुरू होतो, देहमोहाच्या न संपणाऱ्या खेळांचा. नजाकतीचं अनुभवाशी कॉस्मिक आणि लफ्फेदार नातं असंच तर जुळतं. कशाशीही, कोणाशीही, कधीही आणि कुठंही...
यॉर्करही फुलटॉससारखा खेळणाऱ्या सचिनच्या स्ट्रेट ड्राईव्हशी
, किशोरीताईच्या सतारी षड्जाशी, मधुबालाच्या अविनाशी हास्याशी किंवा व्हिन्सेंटच्या स्टारी नाईट्समधल्या निळ्या ब्रशस्ट्रोक्सशी, पावसाळी दिवसांत डोंगरांवर उतरलेल्या रगेल ढगांशी किंवा हळदीच्या अंगाला झालेल्या पहिल्या नाजूक स्पर्शाशी अगदी कशाशीही.
आंबटगोड चटणीचा चविष्ट चुटका
, रगड्याचा रांगडा रगेल फटका आणि त्यावर शेव कोथिंबिरीचा अस्ताव्यस्त शिंपडलेला चटका या तिन्ही लोकांना मर्ज करून तयार होते, तीच पाणीपुरी.

 
श्रावणाच्या कुंद संध्याकाळी कांदभाज्यांच्या तरंगत्या वासात, ओल्याकिच्च गॅलरीच्या टोकाशी उष्ण होत गळा चिरत जाणारी ओल्ड मॉंक, हिमालयाच्या तळाशी उभं राहिल्यावर, पाईन्समधून गळत उघड्या अंगावर येऊन पडलेलं कोरड्याठिक्क बर्फ़ाचं एक्सप्रेशन, सिल्व्हिया प्लॅथच्या स्वप्नांशी जोडलेली हॉस्पिटलची निळी भिंत, सकाळच्या वेळी थंडगार पाण्याचा अंगावर येणारा पहिला शहारा, भर उन्हात समुद्रकिनाऱ्यावर बेभान नाचत सुटणारा झोर्बा द ग्रीक, पावसाने न्हाऊन निघालेल्या रस्त्यांवर उमटणारी स्ट्रीटलाईट्सच्या प्रकाशाची रांगोळी, कडाडत्या थंडीत पहाटे पावणेतीनला एका बोटाचा दुसऱ्या ओटीपोटाला झालेला स्पर्श, ओठांच्या खाली पहिल्यांदाच उगवलेल्या केसांचा हुळहुळता काटा.
 

उनाड दिवस आणि उजाड माळरान, पावसाळी रात्रीच्या अंधारात प्लेलिस्ट चाळताना ऐकू आलेलं सीने में सुलगते है अरमां, घर थकलेले संन्यासी, मृत्युच्या काळ्या खाईत पाकिटात जपलेलं अधुरं
, अपुरं प्रेमपत्र... हिरोशिमाच्या गाफील चेहऱ्यांना मृत्युची गळाभेट कुठं ठाऊक होती. त्यांचं नातं होतं तरीही. असणारच, त्याशिवाय का मृत्यु असा कडकडून भेटतो? सगळ्या जगाकडून अव्हेरला गेलेला कोवळा पोर जेव्हा 'भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे' असं पसायदान मागतो, तेव्हा त्याला नक्की कोणतं मैत्र अपेक्षित असेल हो? सारी वेदपुराणे मोक्षाचा मंत्र घोकत असतानाच 'तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हांसी' म्हणणारे तुकाराम याच मातीतले होते की.

म्हणूनच म्हणतोय;
भारूनिया अवकाशच अवघा
,
खेळ नवा रंगेल
खेळ पुन्हा रंगेल

अक्षय संत