स्वरपंचम

युवा विवेक    07-Jul-2022   
Total Views |


r d burman

पंचमदा उर्फ आर.डी. बर्मन गेले, तेव्हा पंचमदांना समजण्याचं वय नव्हतं आणि जेव्हा ते वय आलं तेव्हा जगात सगळं होतं, पण पंचमदा नव्हते.

टेक्नॉलॉजी होती, डॉल्बी डिजिटल होतं, बास बूफर्स होते, सगळं होतं, फक्त पंचमदा नव्हते. ते नव्हते, असं तरी कसं म्हणायचं? त्यांच्यानंतर आलेले जवळजवळ सगळे संगीतकार त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून 'ओरिजिनॅलिटी' चे ढोल पिटत होते. नव्या सहस्त्रकाच्या उंबरठ्यावर रिमिक्स नामक प्रकारानं घातलेल्या धुमाकुळात निम्मी गाणी पंचमदांचीच तर होती. बाकीच्यांचं राहू दे, दस्तुरखुद्द आशा भोसलेंनीही या लाटेत उतरून 'राहुल अँड आय'सारख्या अल्बममधून पंचमदांना नव्या पिढीच्या संगीतात खेचून आणलं होतं. 'पिया तू अब तो आजा'च्या व्हिडीओमध्ये थिरकणारी सोनाली बेंद्रे किंवा 'काटा लगा'मुळे रातोरात घराघरात पोहोचलेली शेफाली जरीवाला या पंचमदा नावाच्या महावृक्षाच्या पुन्हा उगवलेल्या फांद्या होत्या. त्यानंतर अर्थातच, झंकार बीट्स किंवा दिल विल प्यार व्यारसारख्या सिनेमांमधूनही 'बॉस कौन था, बॉस कौन है' वगैरे म्हणत पंचमदा पुन्हापुन्हा येत राहिलेच.

 

पण या सगळ्या गदारोळात खरे पंचमदा मात्र कायमच कुठंतरी हरवल्यासारखा वाटत होते. आजही वाटतात. हां, कधीकधी डोकं वर काढतात ते. एखादा शंतनू मोईत्रा 'पियू बोले' किंवा 'रात हमारी तो' सारखं काहीतरी भन्नाट घेऊन येतो किंवा जतीन ललित 'होशवालोंको खबर क्या'सारखी नितांतसुंदर गझल आणतात, तेव्हा उगीचच वाटून जातं, ही पंचमदांची दे आहे. आज ते असते तर हे असंच काहीतरी त्यांनी नक्की केलं असतं. बाजारनियमानुसार विधु विनोद चोप्रांना आधी धिंच्याक चाल ऐकवणारे आणि त्यांनी झापल्यावर आठच दिवसांत त्यांना पुन्हा घरी बोलावून आपल्याच वडिलांच्या 'रोंगिला रोंगिला रोंगिला रे'वरून सुचलेलं 'कुछ ना कहो' देणारा पंचमदाच होते. पंचमदा संपले म्हणता म्हणता पंचमदा इज बॅक अशी द्वाही फिरली आणि १९४२ अ लव्ह स्टोरीचे सूर हवेतून विरायच्या आत पंचमदाच विरून गेले.

 

कलाकाराचं आयुष्य हे असंच असतं का? कॉलेजच्या दिवसांत रात्रीच्या वेळी कुठल्यातरी दुकानाच्या कट्ट्यावर आम्ही एक नाइन्टी व्होडका आणि एक स्प्राईट घेऊन बसायचो. अर्ध स्प्राईट आधी घशात ओतायचं आणि मग त्याच बाटलीत व्होडका मिक्स करून बाटली चारांत हुक्क्यासारखी आळीपाळीने फिरवत राहायची. जरा घसा ओला झाला की एकेकाला कंठ फुटायचा आणि स्ट्रीटलाईटच्या प्रकाशात पंचमदांची मैफिल रंगायची. मग त्याच बाटलीवर गाडीची चावी आपटत 'चुरा लिया है तुमने'चा पीस तयार व्हायचा, एखादा दर्दी तुटलेल्या नात्याची आठवण काढत 'मेरी भीगी भीगी सी' म्हणता म्हणता रडायला लागायचा, एखादा कोणीतरी दोन घोटातच 'जास्त झालेला' उगीच धतींग करत रस्त्यातच 'यम्मा यम्मा' म्हणत नाचायला लागायचा तर कोणी घशातून नुसतीच हवा सोडत 'पिया तू अब तो आजा' सुरू करायचा आणि सगळेजण एका सुरात 'मोनिकाsssss ओ माय डार्लिंग' केकटायचे. खरं सांगतो, खिशाची कडकी, भविष्याचा अंधार, ब्रेकअप्सची फ्रस्ट्रेशन्स आणि बाकी केवढं काय काय एका झटक्यात बाहेर निघायचं. त्या ओरडण्यातून, त्या नाचण्यातून. पंचमदा आणि त्यांची गाणी म्हणजे त्या काळात आमच्यासारख्या दुनियादार कडक्यांचा स्ट्रेसबस्टर होता. क्वचित कधीतरी पंचमव्यसनी लोकांची कोणाच्यातरी घरी जॅमिंग सेशन्सपण रंगायची. गिटारच्या स्ट्रिंग्ज थिरकायला लागायच्या आणि पंचमदांच्या होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या गाण्यांची उजळणी व्हायची.

 

त्याही आधी रात्री मित्राकडे अभ्यासाला म्हणून जायचं, मध्यरात्री बाहेर पडून स्वारगेटला मस्त भुर्जी आणि चहा हाणून घरी यायचं, तेव्हा धुरकट अंधारावर चरे उमटायला लागायचे.

रोज रोज आंखोतले, एकही सपना चले

रातभर काजल जले, आंखो में जिस तरच ख्वाबों का दिया जले

किंवा

तुमसे मिली जो जिंदगी, हमने अभी बोयी नही

तेरे सिबाह कोई न था, तेरे सिबाह कोई नही.

एकेक शब्द, एकेक सूर सतत तोवर काहीतरी न हरवलेलं शोधत जाण्याची वाट दाखवायचा. आम्ही जायचो शोधत. आणि एका क्षणी एकदम चकवा लागायचा.

तुमने तो आसमान बिछाया, मेरे नंगे पैरों में जमीन है

बातें भी तुम्हारी आरजू हो, शायद ऐसी जिंदगी हसीन है

अरेच्चा, म्हणजे इतका वेळचं सगळं धुरकट मळभ मायाच होतं तर.

 

माया. आपल्या वेदांमध्ये अद्वैत तत्त्वज्ञान सांगितलंय. 'नेति नेति'. हेही नाही आणि तेही नाही. पंचमदांचे सूरही त्याच मायेनं गुंफल्यासारखे वाटतात. काही आहे म्हणता म्हणता निसटून जाणारं. काहीच नाही म्हणता म्हणता गवसणारं, असं काहीतरी आहे त्यांच्या सुरात. सकाळच्या निःशब्द प्रहरी, रणरणत्या उन्हातल्या तापल्या दुपारी, एखाद्या पावसाळी संध्याकाळी किंवा मग बेदाग कातररात्री काहीतरी रसरसून उफाळून येतं त्यांच्या सुरांमधून. ते सगळे क्षण ओंजळीत घट्ट धरून बसावंसं वाटतं अशा वेळी.

 

और इस पल में कोई नही है

बस इक मै हूँ, बस इक तुम हो.

करेक्ट. हेच आणि असंच. हे खरे पंचमदा असतात. नाइन्टीच्या घोटासारखे गर्द, सिंगल माल्टच्या सिपसारखे खानदानी आणि त्या धुरकट रात्रीसारखे मायावी. पंचमदा असतातच आपल्यासाठी.... कधीही, कुठंही, कसेही.

मग कितीही ओरडून विचारा, 'बॉस कौन था? बॉस कौन है?' वेगळं उत्तर द्यायची गरजच नसते, इतके ते अविभाज्य आहेत.

अक्षय