धेय्यासक्ती

युवा विवेक    16-Aug-2022   
Total Views |

roots
कापल्या गेल्या मुळातनं
स्त्रवतंय बरंच काही..
कोंभारून येणं,बहर फुलांचा,फळांचा..
की प्राण..
तांबूस फुटू पाहणाऱ्या नवतीच्या नजाकतिचा,
शिशिरातली पानगळीचा..
श्रावणातल्या हिरवेपणाचा,
किंवा
शोषलेलं सर्व काही अगदी..
श्वास आणि ऊनसुद्धा स्त्रवत असणार त्यातनं
मूळं कापली गेलीयेत....
तसतसे कळू लागलेत
मातीच्या कणांशी असलेल्या नात्यांचे अन्वयार्थ
अनेक किडे, कृमी, निष्प्राण होऊन नाहीशा झालेल्या गोगलगायीही जिवंत होत्या कधीतरीच्या खुणा सांगणारे पोकळ शंख..
वाळलेल्या पाचोळ्याचे कुजून नाहीसे झालेले अवशेष..
काहीतरी नाहीसं होतं.. कशाची तरी सुरुवात करून..!!!
मूळं कापली गेलीयेत, स्त्रवतंय काहीतरी
तुटतायत काही धागे, सुटतायत काही बंध..
नामशेषही होतंय बरंच काही...
पण तरीही...
तरीही
पुन्हा फुट पाहतायत नवे तंतू...
घेऊ पाहतायत नवा आकार
शोधू पाहतायत नवे मार्ग
नजाणो कसली धेय्यासक्ती आहे ही मुळांना..!
खोल जमिनीचा तळ गाठायचा असावा बहुतेक त्यांना..!!
- अमिता पेठे पैठणकर