उजळत जाणारं शेडिंग

युवा लेख

युवा विवेक    01-Oct-2023   
Total Views |

उजळत जाणारं शेडिंग

एखादं लहान मूल चित्र काढतं, तेव्हा ते उठून दिसावं, सुंदर व्हावं म्हणून ते दोन सारख्या रंगांची मिसळण करु बघतं. ज्याला आपण शेडींग म्हणतो. 'शेडिंग ' करण्याची उत्कट आस व त्याहूनही जास्त म्हणजे शेवटी जे काही फलित मिळणार आहे, जी सुंदरता आपल्या दृष्टीतील परिपक्वतेस अनुभवायला मिळणार आहे, त्यानुसार ते मूल किंवा खरेतर कुणीही ही रंगांची मिसळण करु बघतं. निरिक्षण केल्यास अगदी सहजच दिसून येतं, की लहान मूलं शेडींग करताना बर्याचवेळा आपल्या बालसुलभ मुग्धतेने दोन रंगांमधे ' रेष ' काढतात. म्हणजे, अमूक एखादा रंग इथपर्यंत आणि त्यापुढे दुसरा रंग. असं हे त्यांचं शेडींग. पण नंतर हळूहळू जसं मूल मोठं होतं, जशी त्याची एकूणच जाण वाढते, तशी ती रेष रहात नाही. पण रेष काढली नसली तरीही एक रंग ' इथे ' संपतो आणि दुसरा इथपासून सुरू होतो हे मात्र पहाणार्याच्या नक्कीच लक्षात येतं. मग पुढे जाऊन तो त्या रंगांची खर्या अर्थाने मिसळण करु लागतो. इथे एक रंग संपतो आणि दुसरा सुरू होतो अशी जागा पहाणारा दाखवूच शकत नाही इतक्या कलात्मकतेने आता मिसळण होऊ लागते. आणि चित्र, चित्राचा स्तर वाढत जातो, हळूहळू..

किती सूचक आहेत हे अनुभव !

इथपोत 'माझा' असा, थोडा चांगला, पण दुषित, जरा बरा पण स्वार्थी, असा माझा रंग. कोणता ? पिवळा, लाल, निळा ? माहित नाही. पण हो, क्षणाक्षणाला बदलणारा असा माझा रंग ! आणि त्यापुढे ? त्यापुढे 'त्याचा' रंग ! कोणाचा ? त्याच, सर्वेश्वराचा, ब्रम्हांडनायकाचा, जगदिशाचा रंग ! कोणता ? सर्वव्यापक आकाशाचा निळा ? की भगवा ? की शांततेत स्थिरावलेला पांढरा ? की आणि कोणता ? ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार 'तो' रंग जो तो मानतो, जाणतोही ! पण या दोन रंगांमधे? मधे असतेच की 'रेष'.. 'मायेची' ! पौराणिक कथांनी वर्णिलेली, शास्त्रग्रंथांनी सांगितलेली किंवा मग निजमनीच्या भ्रामक कल्पनांची रेष. पण हो, ती असतेच, सुरूवातीला ! मग हळूहळू बालसुलभ बुद्धीने आपणही करु बघत असतो मिसळण या रंगांची. पोहोचू बघत असतो रेषेप्रत आणि खचितच, तिच्या पल्याडही ! पण, या रंगभूमीत रंगताना जसजशी जाण वाढत जाते, तसतशी या मिसळणीची आस आणि पद्धतही विस्तारत जाते, परिपक्व होत जाते, स्थूलातून सूक्ष्माकडे. मग पुन्हा त्या मुलाप्रमाणेच आपणही जाऊ बघतो रेषेच्या पल्याड, रेष ओलांडून ? नाही, नाही.. 'रेष नाहीच' हे जाणून !

आपल्या अल्पमनाला येऊ लागतं ' रंगभान ' आणि मगच होऊ लागते मिसळण, म्हटलं तर रंगांची आणि म्हटलं तर अस्तित्वाची ! मग फरक उरत नाही गाभार्यात आणि सभामंडपात, भेद नुरतो भक्त आणि भक्तीमधे. कारण काम्य भक्ती फळली असते, निष्काम भक्तीमधे. द्वैत भक्तीने झालेली सुरुवात पूर्णत्वास येत असते अपरा भक्तीत. पण तरीही आपली स्वतःची किंवा इतरांचीही काम्य वा द्वैत भक्ती गौण वाटत नाही अशा भक्ताला. कदाचित तिथेच दडलं असतं, पूर्णत्व !

रेष उरत नाही, ती रेष जाणण्याने, कठोर परिश्रमांने किंवा..किंवा तोच समोरचा रंग स्वतःमधे बघून ! मग वाटतं, मिसळणही नव्हती ही ! नव्हतीच ! मगाचपर्यंत भासणारी ती रेष नुरली आणि मिसळण झाली दोहो रंगांची पण मग जाणीव झाली, की दोन रंग नाहीतच ! आहे फक्त एक ! एकच ! म्हटलं तर तोच रंग विविध रंग धारण करणारा, म्हटलं तर सर्व रंगांनी युक्त आणि म्हटलं तर काहिच नाही ! मग 'एकच' असताना न मिसळण होण्याची गरज न कशाचीच. आता जाणीव होते, मगाशी पुसट झालेली ती ' रेष ' आता खर्या अर्थानं किंबहुना, खर्या जाणिवेनं नुरली आहे. आणि उरलं आहे फक्त एकत्व. फक्त एकच ! कारण,

अस्तित्वाच्या सार्या सीमा पुसल्यावर,

उरतं, फक्त 'असणं'

आणि, असण्यातच आनंद असतो !

पार्थ जोशी