गुंफण आठवणींची...

युवा लेख

युवा विवेक    14-Oct-2023   
Total Views |

गुंफण आठवणींची...

आठवण म्हणजे एखादा प्रसंग, एखादा दिवस आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. आठवणीचा प्रभाव जसजसा वाढत जाईल, तसतसं आणखी आपण त्या आठवणीत रमायला लागतो. काही वेळाने तर ती आठवण आपण मनातल्या मनात अगदी जशीच्या तशी जगायला लागतो. आठवणींचं एक मात्र आहे की, ती कधी सांगून येत नाही. त्याचा असा काही ऋतू नसतो. अचानक धो-धो पावसाला सुरुवात व्हावी तसे आठवणींचे तुषार आपल्याला भिजवू पाहतात. अर्थात प्रत्येकच वेळी आठवण हवीहवीशीच असेल, असं काही सांगता येत नाही. एखादी आठवण कधीकधी येऊ नये असं आपल्याला वाटतं; पण ते आपल्या हातात का आहे! आठवण यायची तेव्हा येणारच..

आठवणीचं नातं एकटेपणाशी तसं अधिक आहे. माणूस एकटा बसला म्हणजे त्याचं मन वेगाने विचार करायला लागतं. अशावेळीच नेमकं मनाला खूप काही बोलायचं नसतं; पण समोर कुणीच नसतं. तेव्हा वाटतं, अरे आता ही व्यक्ती असती तर किती गप्पा मारल्या असत्या आपण! मग त्या व्यक्तीची आठवण आपल्याला यायला लागते. त्या व्यक्तीबरोबर मारलेल्या गप्पा, एकत्र घालवलेला वेळ, त्या व्यक्तीशी झालेलं भांडण, संवाद... बरंच काही आठवतं. एकेका आठवणीचा मेघ मनात दाटून येतो आणि त्याची आपल्याही नकळत एक गुंफण होते. आठवणी गुंफत असताना किती वेळ गेला, पहिली आठवण कुठली किंवा दुसरी आठवण कुठली... काही काही कळत नाही. हीच आठवणींची गंमत आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव, आचार-विचार निराळे असतात; पण हे निराळेपण असूनही कुठल्याही व्यक्तीच्या मनात आठवणींची गुंफण मात्र सारखीच होत असते. हेच आठवणींचं विशेष!

हे सर्व झालं सुखद आठवणींचं; पण दु:खद आठवणी आपल्याला येतातच. आपलं कुणी जवळचं माणूस, नातेवाईक किंवा मित्र परिवारातील कुणी अकाली आपल्याला सोडून गेलेलं असतं. त्या आठवणींचं नातं असतं ते मनातल्या हळव्या कोपऱ्याशी आणि अश्रूंशी. अशी एखादी आठवण आली म्हणजे आपल्याला मुळीच राहवत नाही; पण तरीसुद्धा यातही एक समाधान मानायला आपण शिकायचं. आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येते आहे म्हणजे ती व्यक्ती आपल्यापासून दूर गेलेलीच नाही. त्या आठवणीतून ती व्यक्ती आपल्याला सांगू पाहते, माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा तुझ्या पाठिशी कायमच आहेत. आपण त्या आठवणीतच एक प्रकारे आधार शोधायचा प्रयत्न करायचा. आठवणींविषयी आणखी एक सांगायचं म्हणजे, त्या कधी फारशा लपवता येत नाही. एखादा प्रसंग, एखादी व्यक्ती आपल्या मनात कायम असतो. डोळे म्हणजे आपल्या मनाचंच प्रतिबिंब... त्यामुळे डोळ्यात दाटणा-या भावभावनातून आठवणी लपवता येत नाहीत. मनात भरुन आलेलं आभाळ असेल तितका पाऊस पडायचाच.. तो निसर्ग नियमच नाही का! मग ऋतू असो किंवा नसो. आठवणींना 'एक्सपायरी डेट' नसते. त्या अविरत आपल्या मनात वास करतात. एका वेळी एकच आठवण, असा काही नियम नाही. एका प्रसंगाच्या आधारे दुसरा प्रसंग, तिस-या व्यक्तीची आठवण अशा आठवणी मार्गक्रमण करतात. म्हणूनच त्याला आठवणींची गुंफण म्हणायचं...

आठवणी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आठवण आल्यावर प्रत्येक आठवणीच्या वेळी आपली प्रतिक्रिया वेगळी असते. आई-वडिलांची आठवण काहीशी हळवी असते. बायकोची किंवा प्रेयसीची आठवण आतल्या आत बोचल्यासारखी वाटते. मित्राची आठवण कितीतरी वेळ मन रमवणारी असते. म्हणूनच आठवणींचं नातं माणसाशी जवळचं आहे... किंबहुना, ती माणसाची एक भावनिक गरज आहे.

आठवण विशिष्ट प्रसंगाची किंवा व्यक्तीचीच असते असं नाही. आठवण आपल्या गुरुंची येत असते. उपास्य देवतेची आठवण येत असते. त्या देवतेची मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर आली, की आपल्याला बरं वाटतं. मनातल्या मनातच आपण कितीदा नमस्कार करतो. मला असं वाटतं, ब-याचदा आपल्याकडे मानसपूजा सांगितली जाते ती याच कारणासाठी असावी. एखादी देवाची मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर दिसते. तेव्हा देवाला फुले वहावीशी वाटतात; पण ती प्रत्यक्षात वाहता येत नाहीत. अशावेळी मानसपूजा केली म्हणजे समाधान तर होतंच, मानही राखला जातो. काहीवेळा आपण पाहिलेलं एखादं ठिकाण आपल्याला पुन्हा पुन्हा आठवत असतं. कदाचित एखाद्या वेळी खाण्याचा पदार्थही आठवेल. म्हणूनच माणसाचं मन आणि त्या मनात कुठली आठवण केव्हा येईल ते काही सांगता येत नाही.

भूतकाळाशी वर्तमानकाळ गुंफण्याचं सामर्थ्य आठवणीत असतं. तसंच आठवणींचं नातं भविष्यकाळाशी देखील आहे. कारण, आठवण पुन्हा पुन्हा येत असते. तिन्ही काळांशी मानवी जीवनाला स्पर्श करण्याची संधी आणि सामर्थ्य आठवणीच देतात.. फक्त आपल्याला त्याची गुंफण करता यावी..

-
गौरव भिडे