‘प्राचीन भारत आणि मिठाई’

युवा लेख

युवा विवेक    17-Oct-2023   
Total Views |

‘प्राचीन भारत आणि मिठाई’

सणावारांचे दिवस आले, की नटणं मुरडणं, छानछान दिसणं, लटके झटके सगळं सगळं आलंच की... हे फक्त बाईचं करते असं नाही बरं का! हा निसर्ग सुद्धा या सणावरांच्या दिवसात प्रचंड मूडमध्ये असतो.

पाऊस पडतो, सुगंध उठतो, अंकुर फुटतात! बघता बघता निसर्ग करड्याचा अगदी हिरवागार होऊन जातो! नटतो, मुरडतो, फळाफुलांनी फुलतो, लगडतो, डवरून डवरून जातो... निसर्ग काय नि आपण काय काहीही म्हणा पण या दिवसात अगदी हरफन मौला असतो आपण...

इतर देश प्रांतही असेच असतात. त्या त्या ऋतूंचे सोहळे करत नि करवून घेत असतात. आनंद, उत्साह, उत्सव म्हटलं, की खाणं खिलवणं आलंच नई का!

त्यात मात्र आपण पटाईत असणार असं वाटतं!

प्राचीन काळापासून सणवार, पाहुणचार आणि मिठाई किंवा गोडधोड हे समीकरणचं झालंय, नव्हे पूर्वापार चालत आलंय.

जरा मागे इतिहासाची या अँगलने शोधाशोध केल्यावर wow! असं होतंय 'प्राचीन भारत आणि मिठाई' यावर बोलावं म्हणतेय.

तर त्याचं असं झालं, की मी कधी हट्ट करून प्यायला मिल्कशेक किंवा एखादं चॉकलेट मागितलं की (लहान असताना आत्ता नई कायी) हां... तर... आजी हे मोठाले डोळे करायची आणि आईला म्हणायची फार लाडावून ठेवलीयत कार्टी, काही धाकबिक आहे की नई वडीलधाऱ्यांचा? सारखं कसलं ते चाकलेट खायचं? नायतर ते चाकलेटी पावडरी टाकून दूध प्यायची... हयाss आम्हांला नाही पटत हे असलं पादऱ्या ताकदीचं!!! हे असले भयंकर आवाजी शब्द ऐकून जाम हसू फुटायचं.

“पादरी ताकद म्हणजे गं काय आजी?”

तोंड दाबून हसतच मी विचारलं, की म्हणायची जे अंगी लागत नाही ते अन्न म्हणजे पादऱ्या ताकदीचं!!

आम्ही कसं सकस गोडधोड खायचो! गूळ फुटाणे, चुरमुऱ्याचे लाडू, तहान लाडू, भूक लाडू, बत्तासे, खरवस आणि कितीतरी नावं बराच वेळ घेत रहायची.

कळायला लागल्यावर हे आठवलं, की कळायचं साखरेच्याही आधी बत्तासा होता जो साखरेला पॅरलल आहे. ज्याचा एकोअनेक वेळा प्राचिन इतिहासात उल्लेख आला आहे.

मग काय डोक्यात किडा वळवळला आणि 'प्राचिन भारत आणि मिठाई' या टायटल खाली थोडे दिवस लिहावं म्हणून मनात आलं. चला तर मग थोडे दिवस मिठाईची सफर करु या

तर आज..

बत्तासे

लहान असताना गुढी पाडवा आला, की घरी बाबा चांगले चार-पाच किलो बतास्यांचे हार आणायचे. पाडवा दोन दिवसांवर असला, की आई एकेक हार सुटा करून पेपरमधे छान पॅक करून एका कापडी पिशवीत मला सांभाळता येतील एवढ्या पुड्या द्यायची. नातेवाईक, स्नेही आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्या सर्वांच्या घरी, गल्लीत, एक एक पुरचुंडी देउन यायची. हा कितीतरी वर्षांपासूनचा प्रघात होता आमच्या घराचा. म्हणजे आजपासून काही दशकांपूर्वीपर्यंत बहुतेकांच्या घरचाही हाच प्रघात असायचा, आता मात्र सर्व मागे पडत गेलय.. इतकचं!

असो!

तर गावभर वाटून झाल्यावर हातावर एखादा बात्तासा बक्षीस म्हणून मिळायचा, स्वारी त्यावरही खुश असायची. तर अशा या साध्या सोप्या बनल्या जाणाऱ्या मिट्टगोड ऐतिहासिक मिठाईबद्दल काही!

तर... बताशांच्या बाबतीत असं मानलं जातं, की जेव्हा सिल्क रुट चालू होता, तेव्हा बत्ताशाने मुगलकाळात भारतात शिरकाव केला.

गूळ किंवा साखर, पाणी आणि सोडियम कार्बोनेट यांच्या मिश्रणातून हा बत्तासा रुपयाच्या नाण्याच्या आकारात बनवला जातो. आधीही थोड्याफार फरकाने; पण याच कृतीत बनवला गेला असणार. शतकांपूर्वीपासूनच बत्ताश्यांना धार्मिक कार्यात शुभ स्थान आहे. या मिठाईला कोणत्याही धर्माच्या सीमा वर्ज नव्हत्या.. भारतातल्या अनेक उत्सवात बतासे ही प्रथा परंपरा बनलीय!

साधारण दिवाळीनंतर ऊस तोडीचा हंगाम असतो. दूधापासून बनवल्या जाणाऱ्या मिठाईच्या तुलनेत ही मिठाई जास्त टिकावू आणि आरोग्यदायी असल्याने प्रवासी या देशातून त्या देशात सहज ने, आण करु शकत होते. त्यामुळेही त्याचा प्रवास इतर मिठाईच्या तुलनेत जास्त झाल्याचे आढळून येते.

अतिशय गुणकारी मिठाई उष्माघात, पित्तासारख्या त्रासांवर रामबाण उपाय असलेले बत्तासे अनेक पूजाविधी नंतर प्रसादाच्या स्वरूपात वाटले जायचे, अजूनही जातात.

दिवाळीतल्या लक्ष्मीपूजेत साळीच्या लाह्या, बत्तासे हा ठरलेला प्रसाद न जणो किती जुनी परंपरा अजूनही चालूच आहे. बंगालात 'हरिर लूट' म्हणजे जन्माष्टमीत ओंजळभर बत्तासे उधळले जातात आणि खेळा खेळात ते शोधले किंवा उधळताना आपापल्या पदरात, रुमालात वरच्यावर झेलले जातात त्यानंतर भजन, कीर्तन संपवले जाते. होळीच्या समारंभातही बतासे भाव खात असतात. आपल्या महाराष्ट्रात तर चैत्री पाडव्याला सूर्योदयासोबत गुढी उभारून तिला रेशमी वस्त्र नेसवून कडुलिंबाच्या पाल्याबरोबर कलशासह गाठीहार घालून पूजा संपन्न केली जाते. जिची सांगता सूर्यास्तासोबत गुढी उतरवताना नारळ फोडून खोबरं, बत्तासे प्रसाद देऊन केली जाते.

देशभरात जवळजवळ सर्वच राज्यात या न त्या सणसमारंभात सर्वच धर्मांमध्ये आपलं स्थान राखून आहे, अशी पूर्वापार चालत आलेली मिठाई आहे ही.

एक संदर्भ असाही सापडतो की, सम्राट जहांगिर आणि नुरजहां यांच्या पहिल्या भेटीच्या किश्श्यात बत्ताश्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आहे.

प्रांत, धर्म, काळ, गरिबी, श्रीमंती, व्यक्तीचं सामाजिक स्थान यासारख्या सीमांमध्ये बत्तासा कधीही अडकवू राहिला नाही. अशी धर्म, प्रांत निरपेक्ष सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी, तोंडात टाकली की मिट्ट गोडवा देणारी प्राचीन भारतीय मिठाई बत्तासा इजे लव्ह!

- अमिता पेठे-पैठणकर

अमिता पेठे-पैठणकर

एम ए लोकप्रशासन राजर्षी शाहू कॉलेज लातूर
केज,जि.बीड
सध्या वास्तव्य लातूर
स्वतःचा व्यवसाय
कविता,गझल, लेख
मुद्रितशोधन आणि अनुवाद