मला माणूस म्हणा...

युवा लेख

युवा विवेक    21-Oct-2023   
Total Views |

मला माणूस म्हणा...

सध्या नवरात्र सुरू आहे. स्त्री शक्तीचा जागर करणारा हा नऊ दिवसांचा सण आहे. विविध प्रकारचे वेश धारण केलेल्या नवदुर्गांची पूजा या नऊ दिवसात केली जाते. राक्षसांचा, दुष्ट शक्तींचा नाश करुन देवीनी आपल्या सर्वांना वाचवलं आहे. म्हणून या नवरात्राच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर केला जातो. विविध कार्यक्रमांचे, पूजांचे, होमहवनांचे आयोजन या नऊ दिवसात केले जाते. दांडिया, गरबा यांसारखे खेळ असतात. स्त्रीला देवीचं रुप मानलं जातं. स्त्री हे देवीचं रुप आहे, यात अर्थातच शंका नाही; पण या निमित्ताने एक प्रश्न पडतो.

स्त्रीला आपण देवी मानतो; पण एक माणूस म्हणून अपेक्षित मान आपण ठेवतो का? तुमच्या-माझ्या सारखीच ती हाडामासाची बनलेली आहे. मग तिला देवीचं रुप म्हणण्याआधी माणूस म्हणून स्वीकारण्याची मानसिकता आपण दाखवली पाहिजे.

अनेक स्त्रिया आज एकविसाव्या शतकात घर सांभाळून आपलं करियर घडवत आहेत. पुढे जाऊन चांगली प्रगती करत आहेत. अशा स्त्रियांना सिंहासनावर बसवून केवळ नऊ दिवसच तिला देवी मानणं यात काहीच पुरुषार्थ नाही. अशा कितीतरी स्त्रिया आहेत, ज्यांना खूप बोलायचंय; पण ऐकून घेणारं किंबहुना विश्वासानी ऐकून घेणारं असं कुणीच नाही. ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा इतक्या रुंदावलेल्या असूनही स्त्रियांच्या बारीकसारीक समस्या अजून प्रकाशझोतात आलेल्या नाहीत. इतकं शिकूनही स्त्रियांना आपण गृहीत धरतो आहोत. फारच वाटलं, तर स्त्रियांना अमुक ठिकाणी आरक्षण लागू केलं, म्हणजे आपलं कर्तव्य पार पाडलं असंच आपल्याला वाटतं; पण स्त्रियांना हवंय संरक्षण! हे संरक्षण प्रत्येक वेळी शारीरिक हवं असं काही नाही. मानसिक संरक्षण हवंय. पुरुष जितके स्त्रीला छळत नाहीत, तितकी एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा मान राखत नाही.

मुंबईसारख्या ठिकाणी महिला डब्यात सीट मिळवण्यासाठी गुन्हे दाखल होतील इतकी माराहाण करतात. ऑफिसात देखील मैत्रिणींमध्ये सहभागी करून घेतलं जात नाही. अशावेळी पन्नास टक्के आरक्षणाचा काहीतरी उपयोग आहे का!

स्त्रियांच्या नेमक्या समस्या काय आहेत, हेच आपल्याला नीट समजून घेता आलेलं नाही. आपल्याकडे असणारा पैसा किंवा पदव्या यांचा स्त्री म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी काही उपयोग नाही. तिथे भावनांना आवाहन करावं लागतं. दांडिया आणि गरबा हेच आपण कित्येक वर्षे पाहत आहोत; पण नवरात्राच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर दांडिया खेळून होईल का? समाजात स्त्रीला जगण्यासाठी नेमकी कशाची गरज असते, हे या निमित्ताने आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तलवार, दाणपट्टा चालवणे, स्वसंरक्षणाबाबत स्त्रियांचे काय विचार आहेत, अन्याय झाला तर तो दूर कसा करावा याबाबत काही चर्चा इत्यादी आयोजित करणं हे आपल्याला जमत नाही. दांडिया खेळून मुलींचे मोबाईल नंबर मागत फिरणे हा पुरुषार्थ नव्हे. स्त्री देवी आहेच; पण आधी ती तुमच्या-माझ्या सारखीच माणूस आहे. प्रत्येक स्त्रीची भावना आहे, 'देवी म्हटलं नाहीत तरी चालेल पण मला माणूस म्हणा!'

हा लेख लिहित असताना टीकेची जोड उठवणे हा मुळीच हेतू नाही. जनजागृती हाच उद्देश आहे. ही जनजागृती करायला नवरात्राहून उत्तम मुहूर्त कोणता असणार! स्त्री शक्तीचा हाच तर जागर आहे. स्त्री म्हणजे काय, स्त्रियांच्या समस्या जाणून घेणं, ही देखील देवीची पूजाच आहे. स्त्री देवीचं रुप आपण मानत असू, तर अशा देवीला आधी मनापासून स्वीकारणं, हीच पूजेची सुरूवात आहे. प्रत्येक महिन्याच्या चार दिवसांत मानसिक आणि शारीरिक ताण सहन करत बिनबोभाट आपली कामे स्त्रिया पार पाडत असतात. अशावेळी वाटतं, नऊ दिवस स्त्री पूजली नाही तरी चालेल; पण प्रत्येक महिन्याच्या चार दिवसांत स्त्रियांचा सन्मान राखला जायला हवा. स्त्रीचं मन जाणून घेणं अवघड असलं तरी अशक्य नक्कीच नाही. तिची नवदुर्गांची जशी रुपं आहेत तसंच आई, ताई, आत्या, काकू, मावशी, मामी, आजी, पत्नी, मुलगी ही तिची प्रत्यक्ष नऊ रुपंच आहेत. त्या प्रत्येक नात्यात पारदर्शकता ठेवणं हेच वर्षभरातलं आपलं 'नवरात्र' आहे. प्रत्यक्षात या नऊ रुपात स्त्री वावरत असते. नऊ रुपात कितीतरी समस्या तिला असतील; पण नात्याची जाण ठेवत ती सारं विसरत असते. अशा प्रत्यक्ष रुपातल्या नवदुर्गांना वंदन केलं, तर ते नवदुर्गांपर्यंत नक्की पोहोचेल. 'तू किती दमतेस? किंवा तू किती काम करतोस?’ इतकं कुणी आपल्याला म्हटलं तरी मनाला किती समाधान वाटतं. आपल्याला हेच तर साऱ्या स्त्रियांना म्हणायचंय.. वैभव जोशी यांची एका गीतातली ओळ सार्थ आहे... ‘तुझ्यावाचूनी वांझ पुरुषार्थ हा!' खरंच पुरुषाला पूर्णत्वास नेणारी स्त्री आहे. तिच्या उदरातून हे सुंदर जग निर्माण झालेलं आहे. या निर्मातीची अपेक्षा इतकीच आहे, स्त्री म्हणून फक्त नऊ दिवस पूजा करण्यापेक्षा मला माणूस म्हणून कायम स्वीकारा.. इतकं केलं तरी या सुंदर जगाचं पावित्र्य कायम सुरक्षित राहील..

- गौरव भिडे