सौंदर्याची व्याख्या...

युवा लेख

युवा विवेक    07-Oct-2023   
Total Views |

सौंदर्याची व्याख्या...

       
सौंदर्य म्हणजे काय.. तर सुंदर दिसणं. कितीतरी कवींनी सौंदर्याचं वर्णन सुंदर शब्दांत केलेलं आहे. पण कवितेतलं किंवा साहित्यातलं बहुतांशी वर्णन हे शारिरीक सौंदर्याविषयी असतं. म्हणून तिथे दिसणं म्हणजे सौंदर्य ही साधी सोपी व्याख्या अभिप्रेत आहे. पण सौंदर्य हे शारिरीक किंवा शरीर इतकंच मर्यादित आहे का ? तर तसं नक्कीच नाही.. म्हणूनच साहित्याला अभिप्रेत असलेल्या 'दिसणं म्हणजे सौंदर्य ' या व्याख्येला जोडूनच एक व्याख्या आणखी करावीशी वाटते ती म्हणजे , 'असणं म्हणजे सौंदर्य ' .. माणूस कसा दिसतो हे आपण किती वेळ बघू ? एक तास , चार तास , अर्धा दिवस फारतर पाच-सहा दिवस... पण नुसत्या दिसण्यानी माणूस कसा आहे हे ओळखता येत नाही.. तो आतून म्हणजे ह्रदयापासून कसा आहे हे आपल्याला जाणून घ्यावंसं वाटतंच.. म्हणूनच दिसण्याबरोबरच असणं देखील महत्त्वाचं आहे . माणसाच्या दिसण्यापेक्षा त्याचा सहवासच आपल्याला नवनवीन गोष्टी देत असतो , घडवत असतो..

       
प्रेमाचा संबंध सौंदर्याशी अधिक आहे. म्हणूनच इथे प्रेमाचं उदाहरण द्यावंसं वाटतं.. एखाद्या व्यक्तीकडे नुसतं बघत राहूनही मनात प्रेम उत्पन्न होत असतं. पण ते प्रेम बरचसं आकर्षणाकडे झुकणारं असतं.. या आकर्षणावर आधारलेल्या प्रेमात एकमेकांच्या आवडीनिवडी , विचार-आचार जुळतीलच असं निश्चितपणे सांगता येत नाही.. म्हणूनच आकर्षणाच्या आधारावर उभी राहिलेली पहिल्या प्रेमाची इमारत बरेचदा डगमगते किंवा त्याला तडे तरी जातातच... पण सहवासावर आधारलेल्या प्रेमाचा कल शाश्वत असतो. कारण ते दिसण्याबरोबरच असण्याचा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा या प्रेमावर बराचसा प्रभाव पडतो. त्या व्यक्तीचे गुण , दुर्गुण , शील , आचार-विचार , स्वभाव , स्वभाववैशिष्ट्ये ठाऊक असतात.. असं प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा टिकतं किंबहुना रोज थोडं थोडं बहरतं. त्यामुळे दिसणं म्हणजे सौंदर्य ही व्याख्या पूर्ण असली तरी ती परिपूर्ण वाटत नाही. याउलट , दिसणं म्हणजे असणं म्हणजे सौंदर्य ही व्याख्या परिपूर्ण वाटते..

       
सौंदर्याची व्याख्या परिपूर्णच असावी.. सौंदर्याचा संबंध व्यक्तीच्या जीवनाशी प्रत्यक्ष असतो. असे असले तरी सौंदर्याविषयीची प्रत्येक व्यक्तीची व्याख्या वेगळी असते.. हे वेगळेपण हीच व्याख्येतली एक गंमत असते.
कुणाला असणं सुंदर वाटतं , कुणाला दिसण्यात सौंदर्य पहावंसं वाटतं , कुणाला या दोहोंमधे सौंदर्य गवसतं.. एखादी स्त्री छान काजळ घालते. गालाला गुलाबीसर रंग लावते . केसांना छान वळण देत नाजूक हाताने ते केस मागे सारते.. आभूषणे परिधान करते.. किंवा एखादा पुरुष छानपैकी केस वळवतो , एखादा कोट परिधान करतो , टाय लावतो.. तेव्हा त्या स्त्रीकडे किंवा त्या पुरुषाकडे आपण कितीतरी वेळ पाहत बसतो.. पण ज्याला 'ॲटिट्यूड' म्हणतात तोच ठीक नसेल तर ते सौंदर्य अगदी फिकं पडतं.. याउलट एखादा साधासा पोषाख परिधान केलेली स्त्री असते.. पण तिचं सफाईदार आणि काहीसं नाजूक वागणं -बोलणं असेल तर थेट मनाला भुरळ पडते. त्या वागण्या-बोलण्यात तिच्या त्या साध्याशा पोषाखाचा आपल्याला क्षणभर विसर पडतो. हीच सौंदर्याची खरी ताकद असते. काहीतरी लपवण्याच्या उद्देशाने केलेला श्रृंगार हा सौंदर्याच्या कल्पनेत बसणारच नाही. आपल्याकडे जे निसर्गतःच आहे ते प्रभावीपणे सर्वांसमोर मांडणं हे देखील एक प्रकारचं सौंदर्यच आहे. खरं बोलणारा , प्रामाणिकपणे वागणारा , दुस-याच्या चेह-यावर हास्य खुलावं म्हणून झटणारा , दुस-याचं हित चिंतणारा जगातला प्रत्येक माणूस हा सर्वांत सुंदर असतो. वरवरचं सौंदर्य नेत्रांना भुरळ घालतं. पण मनाला भुरळ पाडणारं सौंदर्य हेच खरं सौंदर्य नव्हे का !

       
आपला वर्ण काळा आहे , अगदी एक डोळा दुस-यापेक्षा मोठा आहे , केस गळतात किंवा विरळ आहेत इत्यादी अनेक कारणांमुळे घरी बसणा-या किंवा समाजात फारशा सहभागी न होणा-या कितीतरी व्यक्ती आपल्या आसपास असतात.. त्या व्यक्तींना आपणच आपल्यात सहभागी करून घेतलं पाहिजे. अशा व्यक्तींना सांगावंसं वाटतं , असं काहीशा कारणाने घरी बसणं बरं नाही. सौंदर्य केवळ चेह-यावर नाही.. निळ्याशार पाण्यात , ढगांच्या वेगवेगळ्या आकारात , फुला-पानात , निसर्गात , तुमच्या-माझ्याकडे असलेल्या कलेत , छंदात खरं सौंदर्य आहे. ते शोधल्याशिवाय का सापडेल ! उदासवाणं होऊन घरी बसण्यापेक्षा तुमच्याकडे असलेले छंद , कला समाजासमोर सादर करा.. मनापासून हसणारा माणूस सर्वांत सुंदर असतो.. तुम्ही , मी , आपण सर्वांनी मनापासून खळखळून हसायला शिकणं हेच तर खरं सौंदर्य आहे.. प्रत्येकाच्याच सौंदर्याच्या व्याख्येत आपण बसू असं नाही.. पण म्हणून आपण सुंदर नाही असं काही नाही.. मनापासून हसण्याची कला हे सर्वांत मोठं सौंदर्य प्रत्येक व्यक्तीत आहे !

       
लेखाचा समारोप करत असताना म्हणावंसं वाटतं , प्रत्येकाची सौंदर्याविषयीची मतं निराळी , व्याख्या निराळ्या .. प्रत्येकजण आपापल्या व्याख्येनुसार सौंदर्य शोधत असतो. हे सौंदर्य शोधतानाची धडपड आणि ते गवसल्यावर होणारा आनंदच विलक्षण ! आयुष्य सुंदर आहे , माणूस सुंदर आहे , निसर्ग सुंदर आहे आणि नियतीसुद्धा !


- गौरव भिडे