सावधान होऊनी विचारा....

युवा लेख

युवा विवेक    02-Nov-2023   
Total Views |

सावधान होऊनी विचारा....

संतांची भूमिका ही समन्वयाची असल्याचं अनेकदा आपल्याला दिसून येतं. तो समन्वय वागण्यातला येतो तसा जगण्यातलाही.... साधा, सोपा मात्र भरभरून देऊ पहाणारा असा मार्ग संत सामान्यांना दाखवतात तेव्हा तो चालण्याची ईच्छा सामान्य सुजाणांना होणं स्वाभाविक आहे मात्र तो चालताना लागणारं सातत्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न गरजेचे वाटतात. ते प्रयत्न नक्कीच फळतात ते निष्ठेने तसे परमेश्वराच्या कृपेनेही.... संत नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात -

अवघे सावधान होऊनि विचारा । सोडवण करा संसाराची ॥१॥

अवघा काळ वाचे ह्मणा नारायण वांयां एक क्षण जाऊं नेदी ॥२॥

कोणतीही गोष्ट जर खर्या अर्थाने नीट करायची असेल, बारकाईने आणि महत्वाचं म्हणजे कौशल्याने करायची असेल तर त्या गोष्टीकडे अवधान देणं फार गरजेचं असतं, तशी कामाच्या साफल्यामागची हतोटी लपली असते ती सावधानतेच्या मागे असं म्हणता येऊ शकतं. ईथे असा अर्थ लक्षात घेता येतो की संत नामदेव महाराज म्हणतात की आपण नेहेमीच सावधान होऊन विचार करायला हवा, विचार करायला हवा तो आपल्या जगण्यातल्या हव्यासाचा, आपणच वाढवून ठेवलेल्या आपल्या ईच्छांचा, तेव्हा जणू दिसू लागतात आपणच धरुन ठेवलेले पाश, एक-एक धागा आपोआप सुटत जातो.... कदाचित संसाराची सोडवण करायची आहे ती अशी, विचार करुन, विवेकाच्या सहाय्याने.... मात्र हे करत असताना करायचं आहे ते नामस्मरण.... नामस्मरण हा श्रेष्ठ त्याचबरोबर सोपा मार्ग समजला जातो मात्र ईथे नामदेव महाराज नामस्मरण करायला सांगतात ते सबंध वेळ, एकही क्षण वाया जाऊ न देता घ्यायचं आहे ते नारायणाचं नाम....

अवघें हें आयुष्य सरोनि जाईल । मग कोण होईल साह्य तुह्मां ॥३॥

अवघा प्रपंच जाणोनि लटिका । शरण रिघा एका पंढरिराया ॥४॥

ह्या संसाराची सोडवण ती नक्की कशासाठी ? असा प्रश्न सामान्यांना पडू शकतो. जणू त्याबद्दलच सांगत नामदेव महाराज म्हणतात की नामस्मरण न करता, परमेश्वराची उपासना न करता केवळ उपभोगात रमून काय होणार आहे ? उपभोगच्या क्षणिक सुखांनी कधीतरी सरून जाईल आयुष्य.... तेव्हा सहाय्य करणार तरी कोण ? रिकामी झोळी असताना त्यातून काढणार तरी काय ? जणू म्हणूनच नारायणाच्या नामाने भरायची आहे आपली झोळी, भक्तीने, कृतार्थ होऊन.... मात्र प्रपंच खरा म्हंटला तर त्यात रमणं आलंच, त्यात आतून गुंतणं आलं आणि आपल्या कामामागचा प्रपंचाचाच, त्याच्याशीच निगडीत हेतू आलाच. मात्र एकदा त्याला लटिका म्हंटलं की किती गुंते आपोआप सुटतात, गुंतण्याची वृत्तीच निववत जाते, तेव्हा दिसतो तो फक्त एक, त्या एकाचा मार्ग आणि माणूस धावू लागतो त्यावर, मार्गांची भिन्नता मूळी उरतच नाही, मन 'त्या'च्यापायी स्थिरावू लागतं, शारण्यभाव उमलू लागतो, भक्तीचा सुगंध हलकेच दरवळू लागतो....

अवघे मायामोह गुंतलेति पहा । अवघे स-हज आहां जीवन्मुक्त ॥५॥

नामा म्हणे अवघे सुखाचेचि व्हाल । जरी मन ठेवाल विठ्ठलापायीं ॥६॥

जणू असं झाल्यावर अशा भक्ताला ते दाखवतात, दाखवतात ती मायामोहात गुंतलेली, गुरफटलेली माणसं आणि मग जणू स्वत:कडे पहायला सांगतात, जीवनमुक्तीचा आनंद जणू 'आहां' शब्दातून व्यक्त करतात. असाही एक अर्थ घेता येतो की पांडुरंगाच्या कृपेने माणसाला गुंतवून ठेवणारे, गुंगवून टाकणारे मायामोहच जणू गुंतून पडले आहेत, त्यांना त्या भक्ताला स्पर्श करण्याची, त्रास देण्याची जणू मुभाच नाहीये.... अशा या भक्ताच्या अंतरंगाला विकारांचा स्पर्शही नसल्याने आणि अर्थात पांडूरंगाची कृपा असल्याने तो भक्त जीवनमुक्त होतो तो अगदी सहज, विनासायास.... मुक्ती आहे ती सगळ्या प्रकारच्या पाशांपासून, सगळ्या अंगांनी सुटका आहे ती दु:खाला कारण ठरणार्या चक्रातून....

संत नामदेव महाराज मोठ्या कौतुकाने मणसांना सांगतात, आपल्याला सांगतात की तुम्ही सर्वार्थाने केवळ सुखीच व्हाल, सुखच बघाल, भोगाल, जगाल जर मन विठ्ठलापायी ठेवाल.... मन 'त्या'च्यापायी ठेवायचं आहे म्हणजे कदाचित मनाचं धावणंही त्याच्यापायी ठेवायचं आहे, संकल्प करायचा आहे तो त्याच्या कृपेच्या प्राप्तीचाच आणि ध्यास धरायचा आहे तो त्याचाच, तो आनंदरूप आहे, अशा या त्याच्या भक्ती करणार्या, प्रेमळ, भोळ्या भक्तांना तो आनंद, सुख दिल्यावाचून राहील का ?

- अनीश जोशी.