हा छंद मानवाचा!

युवा लेख

युवा विवेक    30-Nov-2023   
Total Views |

हा छंद मानवाचा!

'छंद' हा विषय आपल्या सर्वांचाच लाडका. अगदी लहानपणापासून आपण सगळेच कोणता न कोणता छंद जोपासतो, किमान त्यासाठी वेळ मिळेल तसा प्रयत्नही करतो. कधी तिच कुणाची ओळख होते किंवा अनेकदा आपल्या छंदाची सखोल ओळख आणि जाण होण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळही नसतो. पण सहजच, विचार केला की असा कोणता बरं छंद असेल, जो प्रत्येक माणूस जोपासतो? अर्थात् अपवाद असतातच, पण तरीही, बहुतांश माणसं जोपासतात असा छंद कोणता? वाटतं, अनेक छंदही ज्यामधे येतील असा हा छंद, संचयाचा!! किती खरंय! आपण प्रत्येक जण संचयात अतीव व्यग्र असतो. अगदी क्षणोक्षणी. फक्त एवढंच, की प्रत्येकाचा संचय जरा वेगळा. वेगळ्या गोष्टींचा.

मुळात, कोणताही संचय आपण का करतो ? त्यामागे असते आसक्ती कोणत्याही कारणाने निर्माण झालेली. मग ती चांगलीही असू शकते किंवा वाईटही.

पण ढोबळ मनाने विचार करता लक्षात येतं, की आपण सगळेच संचय करतो, धनाचा!! अर्थात् हा संचय सकारात्मक दृष्टीतून बघायचा की नकारात्मक, हा व्यक्तिनिष्ठ प्रश्न. पण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे गरजेचे. त्यामुळे त्यांची सिमीत आसक्ती आणि सदुपयोगासाठी केलेला व्यय हा योग्यच म्हणावा लागेल. भारतीय संस्कृतीनेही धनाला कधीही त्याज्य मानलेलं नाही. ते काही अर्थांनी दुय्यम आहे, किंबहुना, त्याच्यापेक्षा साधता येतील अशी अनेक, अनेकपटीने उच्चकोटीची शुभंकर ध्येयंही आपल्याला संस्कृतीने वारंवार दाखवली आहेत. तेव्हा हा धनाचा संचय, खरंतर, माणसांसाठी स्वाभाविक संचय! करणं योग्य. पण, सन्मार्गाने साधलेलं हे ध्येय आणि सदुपयोगासाठी झालेला व्यय या गोष्टींकडे सोयीस्करपणे कानाडोळा करणं निश्चितच चुकीचं. मध्यंतरी सामाजिक माध्यमावर एक सुंदर अर्थपूर्ण सुविचार वाचण्यात आला. तो असा, की 'When god blesses you with lot of wealth, increase your standard of giving!' आपण कुणीही धनप्राप्तीचे मार्ग विस्तारल्यावर, संचय बळावत चालला असता, आपली रहाणीमान एकूणच standard of living सुधारतो. त्यात चूक नाही. पण त्याचसोबत, standard of giving ची पातळी उंचावतो का? विचारणीय प्रश्न आहे... पण केवळ धन या विषयापर्यंत हा 'संचय' मर्यादित नाही. त्यात येतात अजूनही कित्तितरी गोष्टी. कदाचित् कुणाला धनापेक्षाही मौल्यवान वाटाव्या अशा. स्मृतींचाही संचय आपण करत असतोच की. मनापासून. कधी काही दुय्यम वाटणार्या गोष्टी प्रसंगही नकळत लक्षात रहातात, तर कधी एखादा प्रसंग आपण मुद्दाम लक्षात ठेवतो. कधी लक्षात ठेवतो एखाद्याने आपल्याला केलेली मदत, त्याला पुढे कधी तशीच करायला. कधी असतो या जाणिवपूर्वक संचयामागे स्वार्थ तर कधी कृतज्ञता. पण याहीपेक्षा कित्तीतरीवेळा आपण लक्षात ठेवतो एखादा प्रसंग, कुणाचे तरी 'काहिच' शब्द, कुणाचं न पटलेलं वर्तन किंवा आणि काही. कारण, एकतर, वेळप्रसंगी संदर्भ नको का!! किंवा, आपणही त्याच्याशी तसेच वागू वेळ आली की. त्यामागे असते आपलीच अतिशय संकुचित, कोती वृत्ती. असो. कधी विसरता न येणार्या घटनांनी संचय व्यापला जातो, असह्य होतो आणि खचित नकोसाही वाटू लागतो. तर कधी अनेकानेक नकोशा गोष्टींना कामक्रोधाने भरुन भरुन या संचयाचा भार आपणच असह्य करुन घेतो. तेव्हा वाटतं, आपलाच हा विचार-प्रसंगांचा संचय आपणच अंतर्मुख होऊन बघायला काय हरकत आहे? नकळत भरल्या गेलेल्या कित्येक गोष्टींवर प्रकाश तरी पडतील. काही गोष्टी दूर सारायची किमान इच्छा तरी होईल, कदाचित् तसे प्रयत्नही अंकुरतील आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने आपण सारे नकोसे भार उतरवून हलकं फुलकं जगू शकू. हा संचय आता फार व्यापक वाटू लागलाय. सहजासहजी थांबत नाहीच. कित्तीतरी गोष्टींचा संचय आपण कळत नकळत करत असतो, क्षणोक्षणी! मुळात, अध्यात्मानुसार आपण आपापल्या गतजन्मीच्या कर्मांचं, ज्ञानाचं, फार मोठं संचित घेऊन आलो असतो. त्यात हे नवे संचय! मग वाटू लागतं, की जीवन म्हणजे आपाल्या संचिताच्या बळावर अविरतपणे कळत नकळत केलेले व्यक्त अव्यक्त संचय ! पुण्याचा संचय कुणाला नको! पुजापाठ, जपजाप्य, दानतप, अनुष्ठानं कित्तीतरी प्रकारे हे मार्ग चोखाळत आपण पुण्यफळाच्या मागे धावतो. कित्तीतरी सत्कृत्य आपण करतो, करताना लोकांना पहातो. ती कशासाठी? तर पुण्यासाठी हे अबोल उत्तर मनात पक्क असतं. पण 'परोपकाराय पुण्याय' की व्यासांची व्याख्या याबाबतीत नक्कीच लक्षात ठेवून आचरायला हवी. माणूस अशा अनेक गोष्टींचा संचय करत आला आहे. पण त्यातही जरा शाश्वत वाटावा असा एक संचय ध्यानी येतो. तो म्हणजे, ज्ञानाचा!! माणसाच्या कर्माला ज्ञानाचं अधिष्ठान असलं, की ते अधिक योग्य, प्रभावी, कदाचित् अधिक फलदायीही ठरतं. आपण अगदी लहानपणीपासून औपचारिक शिक्षणाला सुरुवात करतो. 'शिक्षण' म्हणजे काय हेही माहित नसताना. अर्थात् शिक्षणाचा खरा अर्थ आयुष्यात नंतरही कळला असतोच असंही नाही! पण, पुढे अनेक विषय समोर सुबकपणे त्यांच्या त्यांच्या नियोजित चौकटीत वाढले जातात. प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे, इच्छा आणि कुतुहलाप्रमाणे त्यांचं मर्म समजण्याचा प्रयत्न करतो आणि सामर्थ्यानुसार ते पचवतोही! हे करताना आपापली आकलनशक्ती, कुतूहल सारंच विस्तीर्ण होत जातं. अर्थातच, यामधे शिक्षकांचा फार मोठा वाटा असतोच. पण मुद्दा हा, की ज्ञानकण वेचत वेचत, शिक्षणातून, अनुभवांतून प्रत्येक व्यक्ती परिपक्व होत रहाते. आपल्या आवडीच्या ज्ञानशाखेत समरसून जाताना कित्येक लोक आपल्याला सहज दिसतात. मग हाही ज्ञानाचा संचयच ! कित्येक श्लोक, सुभाषितं, कविता, असं बरंच काही लेखक, वक्ते, आपल्या स्मृतीकोषात साठवून ठेवतात. वेळप्रसंगी संदर्भ नको का द्यायला!! पण हा ज्ञानसंचय तो धनापेक्षाही अधिक मोलाचा वाटतो. याचं कारण, धनप्राप्तीसाठी तो उपयोगी ठरतोच, त्याचबरोबर आपली प्रगल्भताही व्यापक करतो. पुढे हाच संचय इतर विद्यार्थ्यांसाठी, जिज्ञासूंसाठी प्रकाशाचा साठा असणार असतो. इथे आठवतं एक सुभाषित, ( संचयातला संदर्भ !) ते असं,

गतेपि वयसि ग्राह्या विद्या सर्वात्मना बुधै |

यद्यपि स्यान्न फलदा सुलभा सान्यजन्मनि ||

अर्थ असा, की बुद्धीमान लोकांनी आपल्या म्हातारपणीही ज्ञानार्जन सुरूच ठेवावे. कारण असं, की जरी त्या ज्ञानाचा किंवा विद्येचा फायदा त्यांना तात्काळ झाला नाही, तरी ती शिकून ठेवलेली विद्या पुढल्या जन्मी सुलभ होते. भारतीय तत्वज्ञान आणि अध्यात्मानुसार, देह मागे सोडून जाताना घेतलेलं ज्ञान आणि केलेल्या कर्मांची बीजं, हेच तर आपल्या सोबत रहातं. बाकी काही नाही. तेव्हा, चांगल्या कर्मासोबत ज्ञानाचा संचयही जास्त मौलिक आणि शाश्वत वाटतो. शेवटी फक्त या जन्माचा विचार केला तरी लक्षात येतं, की धन चोरीला जाऊ शकतं, मालमत्ता निसर्गाच्या विनाशक रुपात अदृश्य होऊ शकते. पण आपण मिळवलेलं ज्ञान किंवा एखादी विद्या मात्र न कुणाला चोरता येते न नष्ट करता येते. कारण विद्येला 'प्रच्छन्नगुपतं धनं' असं एक सुभाषितात म्हटलं आहे. पुन्हा संदर्भ अशासाठी, की ज्ञानसंचयाचा हा फायदा लेखकवाचक दोहोंना वेळोवेळी होतो. लेखकाला आपला मुद्दा अधिक स्पष्टपणे सोपा करून समजावण्यासाठी आणि वाचकाला तो मुद्दा, त्याचं महत्व, पटकन् समजून घेण्यासाठी.

एवढे संचय पाहून झाल्यावरही एक अगदी महत्त्वाचा संचय राहतोच. तो म्हणजे माणसांचा! माणूस जरी संचय म्हणून इतर माणसांना आपल्या सोबत 'ठेवत' नसला, तरी नाती जोपासत, ती अधिकाधिक दृढ करत हा संचयही माणूस आनंदाने वाढवत असतो. मुळात, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं आपण बालपणीपासून ऐकत आलो आहोत, त्याहीपेक्षा अनेकवार अनुभवत आलो आहोत! म्हणून हा माणसांचा संचय. सुखदुखांना तोंड देताना आपला भक्कम पाठीराखा होणारा असा संचय. कधी हाही संचय सहेतुक दिसून येतो, तर कधी जिवापाड जपलेल्या या संचयाची निर्मळता शब्दांतही मांडता येत नाही. चांगला लोकसंग्रह हा मुळात आपल्या गुणांनी घडणारा विषय. एखादंच फूल फुलण्यापेक्षा जेव्हा त्यांचा गुच्छ फुललेला दिसतो, तेव्हा आपलं मन जास्त फुलून येतं. आपणही एकटेच फुलण्यापेक्षा आपल्या भोवतीच्या माणसांचा सबंध ताटवा फुलून येतो तेव्हा आपल्या सर्वांच्या माळ्यालाही जास्त आनंद होत असावा ! नाही का ?

असे कित्तीतरी प्रकारचे संग्रह करत, आपण जगत आलोय, राहूही. पण सगळेच संग्रह कुठे विधायक असतात? माणसाची प्रगल्भ बुद्धी जन्मापासून स्मृतीपटलावर स्मृतींचा साठा करत असते. आपण आठवायचा प्रयत्न केला की आपसुकच बालपणीपासूनच्या अनेक प्रसंगांचा आठव आपल्याला होऊ लागतो. काही कारणांमुळे, अनुभवलेलं अगदी कमी किंवा काहिच ज्याच्या लक्षात रहात नाही त्याला अर्थातच नॉर्मल म्हणता येणार नाही. पण तेच, श्वास, जे आपल्याला जगवतात, ते येतात तसे जातातही. जर आलेला श्वास बाहेरच गेला नाही तर ? श्वास बाहेर न जाता फक्त आत येत राहिले, तर जगू शकू आपण? हे उदाहरण याचसाठी की संचय हा सर्वबाबतीत उचित नाही. तो कुठे करायचा आणि कशाचा हे जाणण्याची बुद्धी, घडणाऱ्या संचयाचं भान आज ईश्वराकडे नक्कीच मागूया. शेवटी, इतकंच वाटतं की या संचयाच्या यात्रेत थोडी जरी जागरुकता आपण बाळगली, तरी ही यात्रा अधिक सुफल ठरेल. उद्श्वासाचा निखळ आनंद आपल्याला देऊन जाईल.

आपण असं नेहमी ऐकतो की माणूस शेवटी काहिच 'वर' घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा ही वस्तुस्थिती स्विकारून असं वाटतं, की या संचयाच्या यात्रेत संचय करता करता गरजवंतांसाठी, समाजासाठी, आपल्याकडील काही संचय खुले करुया. शेवटी, महत्व आहे ते माणूस किती साठवून गेला यापेक्षा किती देऊन गेला, किती खुलं करुन गेला यालाच!

- पार्थ जोशी