बोलके मौन..

मौन या शब्दाचा शब्दश: अर्थ शब्दांशिवाय आपल्या भावना व्यक्त करणे

युवा विवेक    16-Dec-2023   
Total Views |
 
बोलके मन
मौन हा शब्द आपल्याला काही नवीन नाही. अनेक कथा , कादंब-या आणि कवितात आपण तो वाचतच असतो. मौन या शब्दाचा शब्दश: अर्थ शब्दांशिवाय आपल्या भावना व्यक्त करणे. यातला व्यक्त हा शब्द फार महत्वाचा आहे. आपण म्हणतो , त्याचं मौनव्रत आहे किंवा त्याने मौन बाळगलंय. याचाच अर्थ ती व्यक्ती अव्यक्त असते असं नाही.. पण काही गोष्टी , काही भावना नाही शब्दांत मांडता येत ! किंबहुना काही सांगायला , काही मांडायला म्हणजेच व्यक्त व्हायला शब्दांचा उपयोग होत नाही.. तेव्हा माणूस मौनाचा आधार घेतो. जे शब्दांत मांडता येत नाही ते काहीवेळा मौनात अधिक चांगल्या प्रकारे मांडता येतं.. पण या मौनाची देखील एक भाषा असते..

कवी आणि गीतकार संदीप खरे यांचा 'मौनाची भाषांतरे ' नावाचा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यातल्या काही कविता म्हणजे खरोखरच मौनाचं भाषांतर आहे. त्या वाचल्या की कदाचित तुमच्या-माझ्या मौनात जे दडलंय ते संदीप खरे यांना समजलं आणि आपल्या मौनाचं भाषांतर ह्या काव्यसंग्रहात त्यांनी केलं.. कवी म्हणजे मौन असतं आणि त्याची कविता हेच त्याचं भाषांतर..या मौनाची भाषा शिकता येत नाही ; ती आत्मसात करावी लागते. खरंतर ती भाषा आपल्या मनाला थोड्याफार प्रमाणात निसर्गत:च अवगत असते. आपल्याला अवगत असलेली मौनाची भाषा आत्मसात करण्यासाठी साधना करावी लागते. साधना म्हणजे दुस-याचं मन ओळखता येणं ! आपण ' आँखों ही आँखों में इशारा हो गया , बैठे बैठे जिने का सहारा हो गया !' हे गाणं ऐकलं आहे. किंवा तू तिथे मी या चित्रपटातील ' शब्दांविना ओठातले कळले मला , कळले तुला.. शब्दांविना कळले मला , ओठातले कळले तुला ' हे एक गीत आहे. यातला आँखों ही आँखों में इशारा म्हणजे काय हे डोळ्यांची भाषा जाणता येत असेल त्या व्यक्तीलाच पुढची 'जिने का सहारा...' म्हणजे काय ही ओळ कळेल.. तशीच ही मौनाची भाषा आहे.. त्या दोन प्रेमवीरांना शब्दांविना ओठातले कळले ते कळणं ही मौनाची भाषा आहे..

मौन हे शब्दांहूनही बोलकं असतं.. त्या मौनाच्या भाषेला स्वर आहेत पण व्यंजन नाहीत.. समोरच्या व्यक्तीच्या मनातल्या स्वरांना व्यंजनांशी बांधता यायला लागलं म्हणजे समजावं आपल्याला आता मौनाची भाषा आत्मसात झाली आहे.. कदाचित दुस-या व्यक्तींचं बोलकं मौन आपल्याला जाणता येईलही ; पण स्वत:च्या मनाच्या मौनाचं भाषांतर मात्र भारी अवघड ! म्हणूनच आपल्या मौनाचं भाषांतर दुस-या व्यक्तीला करता येतं.. मौनाचं भाषांतर म्हणाल तर ते तसं अवघडही असतं काहीवेळा ! मौनाचं विशिष्ट असं एक अस्तित्व असतं आणि त्या मौनात कितीतरी अर्थ दडलेले असतात. एखाद्या साहित्यासारखी त्याची समीक्षा करावी लागते. मौनाची समीक्षा करत असताना लिखित किंवा मौखिक स्वरुपात काही मिळत नाही. अर्थ हाच त्याचा मुख्य आधार असल्यामुळे त्या मौनाला अपेक्षित असा अर्थ कोणता हे शोधणं ही कला आहे. कला ही अकलेनुसार चालत नाही. ती मनातल्या भावविश्वातून तयार होत असते. त्यामुळे मौनाचा अर्थ शोधताना बुद्धी , तर्क-वितर्क यांचा उपयोग होणारच नाही. त्यासाठी मनातल्या भावविश्वाला कलेकलेने स्पर्श करावा लागतो. तेव्हा कुठे अर्थ शोधण्याची प्रक्रिया सुरू होते.

वैभव जोशींची एक फार सुंदर गझल आहे , " एक होकार दे , फार काही नको , फार काही नको ... फक्त नाही नको!" या गझलेत एक ओळ आहे , " थेट स्पर्शातूनी बोल काहीतरी , मौन शब्दांतली गूढ ग्वाही नको.." अगदीच प्रियकराच्या मनातली ही ओळ आहे. जिथे सहवासच फार नाही त्या गूढ मौनातली ग्वाही तरी मला कशी उमगणार! म्हणूनच काही वेळा मला मौन आभाळासारखं भासतं.. एकेका ता-यातून आभाळ उलगडत जावं तसं मौन उलगडतं... कधी कधी मौन सागरासारखं भासतं.. अगदी अथांग ! लाट येते नि परत जाते.. कुठल्या लाटेवर स्वार व्हायचं , कुठली लाट आपली हे सारं ओळखता ओळखता मनाच्या डोहात विचारांचे तरंग निर्माण होतात. शरीर सागराला स्पर्श करण्याआधीच मनाची गट्टी सागराशी जमते. तशीच कधीतरी मौनाशी पण गट्टी जमते. एकदा का गट्टी जमली की मौनाशी सुद्धा आपण संवाद साधू लागतो.. मौन किती बोलकं असतं हे आपल्याला जाणवू लागतं .. अगदी इतकंच काय.. रोजच्या जगण्यातली कितीतरी उदाहरणे देता येतील. नव-याकडे बघून बायकोला त्याच्या मनातलं सारं काही ओळखता येतं. प्रेमातला अबोला सुद्धा कित्ती बोलका असतो.. बाळाचं मौन आईला जाणवतं.. बाळाचा अबोला आई कसा पटकन दूर करते ! नऊ महिन्यांतल्या सहवासातच हे मौन बोलकं झालेलं असतं.. आपण देवळात जातो तेव्हा आपलं मौन देवाला देखील जाणवतं.. देवाची मूर्ती आपल्याशी कधीच काही बोलत नाही.. तरीदेखील त्याचं अस्तित्व आणि त्याचं मौन आपल्या मनात बोलकं झालेलं असतं...

- गौरव भिडे ,
पुणे.
१६ डिसेंबर २०२३