सुचेता कृपलानी

उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

युवा विवेक    18-Dec-2023   
Total Views |
 
सुचेता कृपलानी
स्त्री ही अनेक क्षेत्रांत उतरली ती आपल्या कार्याने समाजाची सेवा करायला. राजकारणाच्या क्षेत्रातही ती उतरली ते जणुकाही एक नवीन दिशा दाखवायला. भारताच्या राजकारणातील एक महत्वाचं नाव म्हणजे सुचेता कृपलानी. १९०८ मधे अंबाला, पंजाब येथे सुचेता कृपलानी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे वैद्यकीय अधिकारी होते. दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयात आणि सेन्ट स्टीफन्स काॅलेजात त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी इतिहासात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पुढे बनारस हिंदू विश्वविद्यालयत त्या अध्यापिका म्हणून काम करत होत्या. तिथे शिकवत असणाऱ्या आचार्य कृपलानी यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि पुढे त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या त्या सदस्या होत्या. भारत छोडो आंदोलनात त्या आघाडीवर होत्या. त्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. भारतीय संविधान सभेसाठी निवडून आलेल्या १५ महिलांपैकी त्या एक होत्या.
कानपूर मतदारसंघातून निवडून येऊन त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. पंडीत जवाहरलाल नेहेरुंचं १४ ऑगस्ट १९४७ चं 'ट्रिस्ट विथ डेस्टिनी' हे भाषण होण्यापूर्वी त्यांनी संविधान सभेच्या स्वातंत्र्य अधिवेशनात वंदे मातरम् गायले.
त्या एकेठिकाणी लिहितात की, 'आपला प्रयत्न असा पाहिजे की आपण लोकांना स्वत:ची मदत करण्याची ताकद देऊ शकू'.
१९४० मध्ये भारतीय महिला कॉंग्रेसची स्थपना झाली, त्याच्या त्या संस्थापिका होत्या. स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांचा राजकारणात समावेश होता. १९६७ मधे गोंडा मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या. त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना राज्यातल्या कर्मचाऱ्यांनी  संप केला. तो त्या राज्यातला कर्मचाऱ्यांचा पहिला संप होता. हा संप ६२ दिवस चालला होता. पण सुचेता कृपलानींनी परिस्थिती योग्यप्रकारे हाताळली आणि जेव्हा कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी तडजोड करण्यास तयारी दाखवली तेव्हाच त्यांनी माघार घेतली. भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री हा त्यांच्या कारकिर्दीतला महत्वाचा भाग होता. त्यांनी त्यांचे  आत्मचरीत्रही लिहिलं आहे.
मैं हुँ हनुमान और.. भारत देश मेरा राम है |
देख लो छाती चीर कर, दिल में हिंदुस्थान है |
अशा या त्यांच्या ओळी त्यांच्यातली देशप्रेमाची, देश सेवेची भावना व्यक्त करुन जातात आणि देश सेवेचा आदर्शही दाखवतात. अशा या मोठ्या व्यक्तिमत्वाला सादर वंदन.
~ अनीश जोशी.