'अहो-जहो' , 'अरे-तुरे ' ..

आई , बाबा , दादा , ताई , पती , पत्नी इत्यादी नात्यांची नावं आहेत किंवा ती त्या नात्याची संबोधने आहेत

युवा विवेक    02-Dec-2023   
Total Views |
 
'अहो-जहो' , 'अरे-तुरे ' ...
'अहो-जहो' , 'अरे-तुरे ' ...

माणसाला माणसाची गरज असते. बरीचशी नाती गरजेच्या आधारावरच जोडली जातात. नातं नावाशिवायही असू शकतं. पण काही नात्यात नाव हीच नात्याची मूळ ओळख असते. आई , बाबा , दादा , ताई , पती , पत्नी इत्यादी नात्यांची नावं आहेत किंवा ती त्या नात्याची संबोधने आहेत. संवाद साधण्यासाठी , हाक मारण्यासाठी किंवा अगदी सहजही आपण या नात्यांचं नाव दिवसभरात अनेकदा घेत असतो. महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर या नात्यांचा विशिष्ट असा एक मान आहे आणि हाक मारण्याची विशिष्ट अशी पूर्वापार चालत आलेली प्रत्येक नात्याची रीत आहे. सर्वसाधारणपणे आईशी बोलताना आपण एकेरी हाक मारतो. म्हणजेच अगं-तुगं करतो. बाबांना अहो-जहो म्हणतो. ताई-दादा आणि इतर नात्यांना वयापरत्वे अरे-तुरे किंवा अहो-जहो करतो. पती - पत्नीने एकमेकांना अहो-जहो म्हणण्याची रीत आहे. अर्थात परंपरा किंवा रीत म्हटलं म्हणजे त्याला काळानुरुप मोडता घातला जातोच. काळानुरुप माणसानी बदलायला हवंच. त्याला कुणाचाही आक्षेप नाही. पण प्रत्येक बदल स्वीकारताना त्याला काहीतरी एक कारण निश्चित असायला हवं. केवळ अधुनिकतेचा हात धरायचा , पुरोगामी विचारांचा स्वीकार करायचा म्हणून जुन्याशी थेट नातंच तोडायचं असंच काही नसतं. म्हणूनच माणसाच्या प्रत्येक कृतीमागे वैचारिक भूमिका असावी.

अहो-जहो म्हणायचे का अरे - तुरे म्हणायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण समाजात वावरताना मात्र त्याचा विचार करावा लागतो. बरेचदा आपण आपल्याच माणसाचा मान राखत नाही. अगदी रोजचेच उदाहरणही याविषयी सांगता येईल.. नवरा एखाद्या वेळी कामात असतो किंवा आंघोळ , वाॅशरुम इत्यादी नित्यकर्मे करत असतो. अशावेळी त्याचा फोन त्याची बायको उचलते. तेव्हा ती समोरच्या व्यक्तीला सांगते , " तो आता आंघोळीला गेला आहे. तो तुम्हाला नंतर फोन करेल.." पण ती व्यक्ती नेमकी कोण आहे हा विचार महत्वाचा आहे. ती व्यक्ती नातेवाईक असल्यास अरे तुरे करण्यास हरकत नसते. पण ती व्यक्ती आपल्या नव-याच्या हाताखाली काम करणारी असेल , ऑफिसातील ज्यनिअर सदस्य असेल तर त्यांच्याशी नव-याविषयी अरे तुरे करणं हे तितकंसं बरं वाटत नाही. आपणच जर चारचौघांच्या देखत अरे तुरे केलं तर आपल्या माणसाला तरी कोण मनापासून मान देईल ! त्यामुळे अशावेळी अहो-जहो म्हणणं शिष्टाचाराचं ठरतं. नव-यानेही बायकोविषयी माहिती सांगताना " ती बाहेर गेली आहे किंवा ती आत्ता घरी नाही " असं बोलण्याऐवजी " त्या आत्ता बाहेर गेल्या आहेत " असं सांगणं शिष्टाचाराचं ठरतं. आपणच आपल्या माणसाचा अशा बारीकसारीक गोष्टीत मान ठेवायला शिकलो तर कदाचित समाजाचाही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला आणि व्यक्ती म्हणून आदराचा ठरु शकेल.

समाजात आईला सर्वजण अगं आई म्हणतात तर बाबांना आपण अहो बाबा म्हणतो. म्हणजे आईचा मान कमी आणि बाबांचा जास्त असा त्याचा अर्थ नाही. दोघंही सारखेच प्रिय आहेत. त्या-त्या नात्याच्या रचनेनुसार ते-ते संबोधन ठरलेलं असतं. त्यामुळे बरेचदा हल्ली माझा बाबा किंवा माझी टीचर , माझा डाॅक्टर असं आपण सहजपणे बोलून जातो. पण बरेचदा ऐकताना ते कानाला खटकतं. घरी प्रत्येकानी प्रत्येकाला हवं ते म्हणावं. पण समाजात वावरताना समाजानी आखून दिलेल्या लिखित आणि अलिखित नियमानुसार वावरलं म्हणजे समाजही आपल्याला सहज सामावून घेतो. शिक्षक ही आई-बाबांच्या नंतर भूमिका बजावणारी एक महत्वाची व्यक्ती असते. तिचा उल्लेख माझी मिस किंवा माझी मॅडम असं न करता माझ्या मॅडम किंवा माझ्या मिस , माझे सर असाच केला पाहिजे. वाॅचमन , खाद्यपदार्थ विक्रेता , बसचालक , वाहक , भाजी विक्रेता यांना तर बरेच जण अरे -तुरे करतात. ते देखील योग्य नाही. प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी काम करीत असतो. कुटुंबासाठी झटणारी प्रत्येक व्यक्ती ही आदरस्थानी असली पाहिजे. त्यामुळे रिक्षावाले काका , पोलीस काका , वाॅचमन काका यांचा मान देखील तितकाच महत्त्वाचा असल्यामुळे आपण त्यांना अरे काका ऐवजी अहो काका अशी हाक मारली तर त्यांनाही नक्की मनापासून बरं वाटेल.

व्यक्तीपरत्वे समाजानी आखून दिलेल्या संबोधनांचा आपण योग्य ठिकाणी योग्य वापर केला तर शिष्टाचार टिकून राहणं सोपं होईल. त्या-त्या नात्याचा मान राखत शक्य असेल त्याप्रमाणे अहो-जहो , अरे-तुरे हे कुठे , कोणी आणि का म्हटलं पाहिजे याचं भान किंवा याची समज आपल्या प्रत्येकाला असावी. कारण आपलं अगदी बारीकसारीक गोष्टींचंही अनुकरण पुढची पिढी करत असते. त्यात या शिष्टाचाराचं देखील अनुकरण होणार आहे. त्यामुळे 'अहो-जहो' आणि 'अरे-तुरे' यातलं अंतर ओळखता येणं हा शिष्टाचाराचाच एक भाग आहे.

- गौरव भिडे
पुणे.