भक्तीरूपिणी जनाई....

भक्तीरूपिणी जनाई....

युवा विवेक    28-Dec-2023   
Total Views |

भक्तीरूपिणी जनाई....
   ज्या काळात स्त्रीचा जन्म हा कष्टाचा, सोसण्याचा, भोगण्याचा अशी परिस्थिती होती, जेव्हा स्त्री मुक्तपणे समाजात आपले विचार मांडू शकत नव्हती, मोकळी होऊ शकत नव्हती, अगदी त्याच काळात जणू 'भक्तीने' जन्म घेतला. दमा नावाच्या विट्ठलभक्ताच्या घरी जणू विट्ठलाची भक्तिच जन्माला आली. अंदाजे १२५८ मधे परभणी जिल्ह्यातील गोदावरीच्या तिरावर, गंगाखेड गावात जनाबाईचा जन्म झाला. त्यांची आई करुंड आणि वडील दमा हे विट्ठलभक्त होते. पुढे जनाबाईंच्या वडीलांनी त्यांना नामदेवांच्या वडीलांच्या पदरात दिले. तेव्हा जनाबाई लहान होत्या. नामदेवांचं घर हे पंढरपुरातच होतं. त्या तिथेच राहू लागल्या आणि त्यांच्या कुटुंबाचा एक झाल्या. पंढरपुरात राहात असल्याने जनाबाईंना विट्ठलाचे दर्शन रोज घेता येत असे. नामदेव महाराज त्यांचे गुरु झाले. साक्षात् नामदेव महाराजांचा श्रेष्ठ असा सत्संग त्यांना लाभत होता. नामदेव महाराजांच्या घरातली कामं जनाबाई करत असत. पण त्यांनी कधीच घरातली कामं करताना स्वत:ला त्यामधे अडकवून घेतलं नाही. त्यांना ध्यास होता तो पांडूरंगाचा, आस होती ती पांडूरंगाची. जणू काही संसाराच्या व्यापात अडकलेल्या स्त्रियांना एक आदर्श देत त्या म्हणाल्या,
'दळीता कांडिता तुज गाईन अनंता'
हातामधे जरी काम असलं तरी नित्य त्यांच्या मनात स्मरण होतं ते पांडुरंगाचं. त्या स्मरणाची अवस्था किती उच्च असावी की साक्षात् पांडूरंगच त्यांना मदत करायला येत असे. त्या त्यांच्या एका अभंगात ही गोष्ट सांगताना म्हणतात,
झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणी।।
पाटी घेऊनियां शिरी। नेऊनियां टाकी दुरी।।
ऐसा भक्तिसी भुलला। नीच कामें करूं लागला।।
जनी म्हणे विठोबाला। काय उतराई होंऊ तुला।।
जनाबाईंनी झाडलोट करावी आणि विट्ठलाने केर भरावा ही गोष्ट किती विलक्षण आहे....
जनाबाईंनी स्वत:ला 'नामयाचि जनी' असं कृतार्थ भावाने म्हणवून घेतलं आहे. त्या विट्ठलाशी बोलायच्या ते अगदी मनोभावे. कधी त्याला कधी काही सांगायच्या तर कधी अगदी भांडायच्याही. त्यांची भक्ती ही खरोखरीच विलक्षण आहे. एका अभंगात विट्ठलाला बाळाची उपमा देत त्या म्हणतात,
'माझे अचडे बचडे छकुडे गं राधे रुपडे'
किती श्रेष्ठ भाव आहे हा.
त्यांचे अभंग हे अनेक खेड्यांपासून शहरांपर्यंत अगदी आवडीने गायले जातात. त्यांच्या अभंगांबद्दल ऐकून एकदा संत कबीर त्यांना भेटण्यासाठी नामदेव महाराजांच्या घरी गेले. तेव्हा जनाबाई गौरी थापायला बाहेर गेल्या होत्या. हे कळल्यावर संत कबीर त्यांना शोधत बाहेर गेले. तेव्हा त्यांना तिथे दोन बायका शेणाच्या गौर्यांवरून भांडताना दिसल्या. त्यातलीच एक जनाबाई असल्याचं कळल्यावर कबीरजींना आश्चर्य वाटलं. नंतर ज्या गौर्यांतून 'विट्ठल, विट्ठल' असा आवाज येतोय त्या जनाबाईंच्या गौर्या असल्याचं कळताच त्यांना आनंद झाला. किती विलक्षण सामर्थ्य आहे हे. त्यांच्या एका अभंगात त्या म्हणतात,
एक ना, अवघे सार। वरकड अवघड ते असार।
नाम फुकट चोखट। नाम घेता न ये वीट।।
अशा या पांडुरंगाच्या नामात, त्याच्या भक्तीत, त्याच्या सेवेत, त्याच्या रूपात अखंड तल्लीन असलेल्या संत जनाबाईंना मनोभावे नमस्कार.
अनीश जोशी.