न भेटलेल्या माणसांची 'भेट' ..

बरेच दिवसांनी आपण एखाद्या समारंभाला जातो. तेव्हा आप्तेष्ट , मित्र-मैत्रीणींची भेट होत असते.

युवा विवेक    30-Dec-2023   
Total Views |
 
न भेटलेल्या माणसांची 'भेट' ..
न भेटलेल्या माणसांची 'भेट' ..

   बरेच दिवसांनी आपण एखाद्या समारंभाला जातो. तेव्हा आप्तेष्ट , मित्र-मैत्रीणींची भेट होत असते. किंवा ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने आपण कुणाकुणाला भेटत असतो. काहीवेळा भेटीचा विशिष्ट हेतू असतो किंवा नसतो. मग त्या भेटीविषयी आपण विचार करु लागतो. कुठल्या भेटीत काय घडलं ते आठवू लागतो. काही भेटी सुखद , काही दु:खद असल्याचं आपल्याला जाणवतं. या सगळ्या झाल्या प्रत्यक्ष भेटी.. पण आपल्या अनेक जणांशी अप्रत्यक्ष भेटी देखील होत असतात. अप्रत्यक्ष याचा अर्थ सोशल मिडीयावरील भेट असा नाही. अप्रत्यक्ष भेटीची माध्यमे किंवा साधने बरेचदा प्रत्यक्ष असतात.. एखाद्या कृतीतून , कलेतून , साहित्यातून , साधनातून त्याचा निर्माता तुम्हाला अप्रत्यक्षपणे भेटत असतो. आपण ती कृती , ते साधन वेगवेगळ्या कामांसाठी हाताळत असतो , पाहत असतो.. त्यामुळे प्रत्येक भेटीत वैविध्य असतं.. या अप्रत्यक्ष भेटी सुखद असतात. त्या आपलं जीवन समृद्ध करत असतात.

   मला बालपणापासून अशा अनेक प्रत्यक्ष न भेटलेल्या माणसांची भेट घडल्याचं आठवतं.. सर्वांत आधी भेटला तो म्हणजे चिंटू ! पेपरवाल्या काकांनी पेपर टाकला की सकाळमधे असलेलं चिंटूचं पान सगळ्यात आधी वाचायचं... पुढे कळायला लागलं तसं त्या पात्राचे निर्माते चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर त्या चिंटूतून भेटायला लागले.. शाळेतल्या लायब्ररीत 'श्यामची आई ' या वात्सल्यमूर्तीची भेट झाली. तिचं वात्सल्य जगाला अर्पण करणारे साने गुरुजी भेटले. पुढे महाविद्यालयात प्रथम भेटले ते म्हणजे 'बोलगाणी ' लिहिणारे पाडगावकर ! प्रत्येक बोलगाण्यातून कविवर्य मंगेश पाडगावकरांची वेगवेगळी भेट घडत होती. त्यानंतर भेटला तो म्हणजे संदीप दादा अर्थात संदीप खरे .. 'मौनाची भाषांतरे ' त्याने मनातल्या मनात उलगडून दाखवली.. पुढे सुरेश भट , जगदीश खेबूडकर , गदिमा यांच्या वेगवेगळ्या गीतातून अवर्णनीय भेटी झाल्या. मग व. पु. काळे भेटले. 'महोत्सव ' मधून त्यांची भेट झाली. रत्नाकर मतकरी यांची वेगवेगळ्या कथातून भेट झाली. डाॅ. अनिल अवचट प्रथम भेटले ते 'माझ्या लिखाणाच्या गोष्टी ' मधे ! यात लिखाणाच्या गोष्टीतून त्यांची सहज सोपी भेट घडत गेली. अशा कितीतरी व्यक्तींची रोज भेट घडते.. अजूनही असंख्य भेटी व्हायच्या आहेत.. ह्या सगळ्या माणसांना मी एकदाही प्रत्यक्ष भेटलो नसूनही इतक्या वेळा भेटलो असंच वाटतं.. या न भेटलेल्या माणसांच्या भेटीतून अनेक रंगाची , अनेक ढंगाची 'भेट' मिळाली. त्या रंगात रंगताना आभाळ कवेत घेतल्यासारखं वाटतं..

   सध्या माणसाला एकमेकांना भेटण्यासाठी वेळ नसतो. 'भेटण्यासाठी वेळ काढावा लागतो.. किंवा जे महत्वाचे वाटतात त्यांचीच भेट घेतली जाते ' वगैरे सोशल मिडीयावरील नकारात्मक वाक्ये हल्ली लोकप्रिय होत आहेत. पण प्रत्येक वेळी तसंच असतं असं नाही. माणसाला काही कारणाने एकमेकांच्या भेटी घेणं शक्य नसतं... माणूस माणसाला भेटला नाही तर त्याच्या आर्थिक परिस्थितीत बदल होणार नाही किंवा त्याची प्रगतीही थांबणार नाही. पण तो विचाराने समृद्ध मात्र होणार नाही. म्हणून भेट घडणं आवश्यक आहे. पण भेट घडत नाही अशावेळी काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो.. तेव्हा या अप्रत्यक्ष भेटी आपल्याला आधार देत असतात. अप्रत्यक्ष भेटी जरुर घडतात. त्याचे संकेत आपल्याला ओळखता यायला हवेत. प्रत्यक्ष भेटीसाठी अडून राहणं आताच्या युगात बरं नाही. प्रत्येकच माणूस मुद्दाम भेट टाळतो किंवा आपण त्याच्यासाठी महत्वाचे नाही असा भेट न झाल्याचा अर्थ लावणं हे मनाला अर्थहीन दु:खं देण्याचं कारण आहे. प्रत्यक्ष भेटीची इच्छा व्यक्त करणं यात गैर ते काय ! पण भेट घडली नाही म्हणून रुसून बसण्यापेक्षा या अप्रत्यक्ष भेटींचा मागोवा घेतला तर असंख्य भेटी तुम्हाला साद घालतील. हे भेटींचं विश्व रम्य असल्याचं तुम्हाला जाणवेल..

   यात तुम्हाला अनेक माणसे भेटतील. प्रत्येक भेटीत त्यांच्या छटा न्याहाळताना त्यांच्या त्या निर्मितीचा प्रवास तुम्हाला अनुभवता येईल. कुतुहल नावाचा मित्र आपल्या मनात असतो. पण त्याची नि आपली मैत्री हवी तशी झालेली नसते. ती मैत्री या भेटीतून दृढ होईल. ही दृढताच या भेटी घडवून आणेल. प्रत्येक भेटीतला क्षण अन् क्षण जगायला शिकवेल. हा क्षण जगता आला की उदासीनतेचं नकारात्मक मळभ दूर होऊन रसिकता नावाचं स्वच्छ मोकळं आभाळ तुम्हाला हवा तितका प्रकाश देईल. त्यातल्या एकेका चांदणीला तुम्हाला स्पर्श करावासा वाटेल. वाट समृद्ध होत असल्याचं तुम्हाला जाणवेल. कारण ही सगळी माणसं आपल्याला रोज भेटायला , भेटीतून वेगवेगळी 'भेट' द्यायला मनापासून उत्सुक आहेत. त्यांचं अस्तित्व जाणवू लागेल.. अशी ही न भेटलेल्या माणसांची रम्य 'भेट' ..

- गौरव भिडे.
पुणे.
३० डिसेंबर २०२३