stay healthy be happy

युवा विवेक    25-Feb-2023   
Total Views |
 
 
stay healthy be happy
नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर हजर झाले आहे, एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन. आज फॉर्मल न होता थोड्या गप्पा मारू या. काही खऱ्या घटना आज सांगते, खऱ्या माणसांच्या. तुम्ही जर जिममध्ये जात असाल तर व्हे-प्रोटीन आणि क्रियटिन याबद्दल कधी न कधी ऐकले असेलच, बरोबर ना? अगदी तरुण मुलांपासून प्रौढ माणसांपर्यंत सर्वांना जिमचे ट्रेनर व्हे-प्रोटीन किंवा क्रियेटिन घेण्याचा सल्ला सरसकट देतात. परंतु याचे अनेक दुष्परिणामसुद्धा होतात याची कल्पना मात्र दिली जात नाही. जर खरंच खूप हेव्ही व्यायाम असेल तर हे प्रोटीन पचते. मात्र जर विनाकारण गरज नसताना हे घेतले गेले तर?
एका वीस वर्षांच्या मुलाबद्दल हे लिहीत आहे. माझ्या एका क्लाएंटच्या नात्यात तो मुलगा होता. मित्रांनी भरीला पाडून जिमला नेलं. तिकडे जिम ट्रेनरसुद्धा होता. या मुलाचं वजन कमी होतं, ते बघून त्याला म्हणाला, ‘तू रोज येत जा व्यायामाला. आपण muscle gain करू. प्रोटीनसुद्धा सुरू कर. मित्रांनीसुद्धा घेतलं म्हणून यानेही Whey protein सुरू केलं. इतक्यावरच हे थांबलं नाही. तर पटापट muscles gain करण्यासाठी creatine जास्त उपयोगी पडते, हे ट्रेनरने त्याच्या मनावर बिंबवले. त्याने तेही सुरू केले. फक्त सहा महिने उलटले आणि तो मुलगा आजारी दिसू लागला. चेहऱ्याची रया गेली. अंगातली शक्ती कमी होऊ लागली. पालकांनी काळजीने डॉक्टरकडे नेले, तेव्हा समजले, त्याच्या दोन्ही किडनी प्रोटीनच्या अतिरेकाने खराब झाल्या होत्या. डायलिसिस सुरू करावे लागले. अनेक दिवस तो हॉस्पिटल मध्ये admit राहू लागला. हे सर्व पाहणे असह्य झाल्याने माझ्या त्या क्लाएंटने मला विनंती केली की मी या विषयावर लिहावे, Whey protein आणि त्याहून जास्त creatine कसे घातक ठरू शकते याबद्दल. But what about natural protein? Can it harm too?
हा विषय काल एका मित्राशी बोलताना डोक्यात आला. त्याने स्वतःचे वर्कआऊट व्हिडिओ पाठवले होते. अत्यंत हेवी वर्कआऊट होता. मग म्हणाला, रोज पाच ते सात egg white आणि पाचशे ग्रॅम चिकन खातो आणि पचवतो. मी विचारलं, ‘इतकं प्रोटीन कशाला?’ तर म्हणाला, ‘प्रत्येक किलो ग्रॅम शरीराच्या वजनामागे दीड ते दोन ग्रॅम प्रोटीन घ्यावे लागते.’
यावर मी काही उत्तर दिले नाही, कारण हे टिपिकल जिम ट्रेनरकडून मिळणारे उत्तर होते. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीराला घातक ठरतो. प्रोटीन जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर त्याचा किडनी वर परिणाम होतो. याचसाठी माणसाने एका योग्य वजनाच्या प्रमाणात असणे गरजेचे आहे.
कसे ते समजावते. माझे वजन पन्नास किलो आहे. मी स्त्री आहे. अंग मेहनत कमी आहे. त्यामुळे एका किलो मागे एक ग्रॅम प्रोटीन मला दिवसाला लागेल. म्हणजेच दिवसाला पन्नास ग्रॅम प्रोटीन मला खाण्याची गरज आहे. इतकं कमी प्रमाण पचवणे माझ्या किडनीसाठी अजिबात कठीण नाही. एखादा पुरुष सत्तर किलो वजनाचा आहे. त्याला एका किलो मागे दीड ग्रॅम प्रोटीन खाण्याची गरज आहे. म्हणजे ढोबळमानाने त्याला शंभर ग्रॅम प्रोटीन खावे लागेल. तेही तो पचवू शकेल. मात्र एखाद्याचे वजन शंभर किलो आहे. अत्यंत हेवी व्यायाम करणारा हा पुरुष आहे आणि त्याला त्याच्या ट्रेनरने सांगितले की तुला दर किलो मागे दोन ग्रॅम प्रोटीन खायची गरज आहे आणि तेही रोज! म्हणजेच त्याला रोज किमान दोनशे ग्रॅम प्रोटीन खावे लागेल. विचार करा, रोज जर इतक्या हेवी प्रोटीनने त्याच्या किडनीवर प्रेशर येत राहिले तर कालांतराने त्या खराब होणार नाहीत का?
यावर सोपा उपाय म्हणजे वजनाला नियंत्रणात ठेवणे. कारण एकदा वजन नियंत्रणात आले तर शरीराला खूप जास्त प्रमाणात प्रोटीन खाण्याची गरज राहत नाही. अती वजन असणाऱ्या लोकांनी प्रोटीनचे हे गणित फार सिरीयसली घेऊ नये. कारण muscles बनवताना किडनी खराब करून बसाल. आधी वजन कमी करा, फॅट्स कमी करा आणि मग muscles gain करा.
चला तर मग, पुन्हा भेटू पुढच्या वेळी एका नव्या विषयासह.
Till then stay healthy be happy
दीप्ती काबाडे
(आहारतज्ञ)