पदरव

युवा विवेक    07-Mar-2023   
Total Views |

पदरव
तुझ्या येण्याचे सगळे रस्ते मीच बंद केलेत अट्टहासाने
तू येणार नाहीस परत याची खात्री आहेच!
तेवढी ओळखते तुला मी..
पण तरी नियतीच्या फासांवर फारसा विश्र्वास नाही माझा..
कुणी सांगावे या देहातून प्राण निघून जाणाऱ्या या जन्मीच्या शेवटच्या क्षणी नियती चक्क तुला समोर आणून उभं करेलही माझ्या..
तेव्हा मोह नको व्हायला पुन्हा श्वासांचा, जगण्याचा, डोळेभरून तुला पाहण्याचा ,हलकीशी का असेना पण दोन्ही हातांच्या तळव्यानी दोन्ही हातांना मिठी देण्याचा.. ठिक चाललंय ना तुझं ? असं आत्मीयतेने विचारण्याचा, हातात हात घेण्याचा, काय सांगावे शेवटच्या एका आश्र्वस्त मिठीचा ! हो आश्र्वस्तचं ! कारण या मिठीने गर्भरेशमी शेल्याची ऊब दिलीय कायम..
तू सरसावलेला असताना तुझा आवेग आडवावा आणि म्हणावं नवं काही लिहिलंस का रे ? एकव तरी, नि मोह पुन्हा तुझ्या ओळींना तुझ्याच तोंडून ऐकण्याचा..
कशाला हव्यात या आघोरी इच्छा ?
कशाला हवाय निखाऱ्यातुन येणारा पदरव..
तुला स्पर्शून वाहत येणारी माझ्या पर्यंतची ती हवा सुध्दा नकोय खरतर मला आता
आपण समजूतदारपणाच्या सीमा गाठल्या असाव्यात का रे.. म्हणून हे असं टोकाचं समजूतदार काहीबाही येतय हल्ली मनात
तुझी काय असस्था आहे हे मला जाणून घ्यायचं नाही..
नसीर तुराबी कुणी उर्दू शायर म्हणतो
अदावतें थीं, तग़ाफ़ुल था, रंजिशें थीं बहुत
बिछड़ने वाले में सब कुछ था, बेवफ़ाई न थी
कुछ ऐसाही सोचके दिल हरकते बड़ी करता है
चल सोड ना..
काल पूर्ण चंद्र दिसत होता तावदानातून! मोहक आभा पसरली होती किर्र अंधारात क्षणभर वाटलंही पाराच उतरलाय रात्रीच्या देहावर
अशा कितीतरी मोहमयी रात्रीत आपण एकमेकांसोबत जगलेला प्रत्येक क्षण..
अथ पासुन इति पर्यंत एक आहे का सांग ?
जे बोललो नाहिओत.. बोलता बोलता राहून गेलेलं बोलावंस वाटलं तर ..
नको पुन्हा नको ना मोह व्हायला.
दोन स्वतंत्र अस्तित्व आहोत,
समृद्ध आहोत!
हांss आता ते वर्तुळ अपूर्ण राहिल तो भाग वेगळा
प्रत्येकवेळी दोष कुणावर तरी टाकायलाच हवा का?
असतं काही विनाकारण..
नको त्या कोणत्याच क्षणांना अवघडलेपण द्यायला ..
त्यात त्या क्षणांचा काय दोष ना!
अमिता