ताल हरवतो आहे

युवा विवेक    18-Apr-2023   
Total Views |


ताल हरवतो आहे

आठवणींचा रावा उठतो आहे

उरात सलतो की फडफडतो आहे

जाणतेपणी नखे लावली ज्याने

तो जखमेवर मलम फासतो आहे

तू ओठांशी ओठ भिडवण्याआधी

उगाच माझा वसंत फुलतो आहे

टिपते काही शेर सुखाचे मीही

पण एखादा मिसरा सुटतो आहे

सरळ चालणे नको वाटते आता

म्हणुन वाकडी वळणे धरतो आहे

या हृदयाची लयीत बडबड असते

पण श्वासांचा ताल हरवतो आहे

- अमिता पेठे-पैठणकर