डेस्क जॉब डाएट

युवा विवेक    29-Apr-2023   
Total Views |

 
डेस्क जॉब डाएट

नमस्कार मित्रांनो! ठीक ना? छान! चला तर मग, आज एक अत्यंत उपयोगी विषय पाहू.

बैठे स्वरूपाचे (desk job) करणाऱ्या माणसांचा डाएट कसा असावा

आपल्यापैकी अनेकांनी हा अनुभव घेतला असेल की बैठ्या स्वरूपाचे काम करणाऱ्या लोकांचे belly fats वाढणे किंवा एकूणच वजन वाढणे अगदी सहज घडते. दिवसभर ऑफिसात एकाच जागी बसून काम करणारे लोक, वर्क फ्रॉम होममध्ये सुद्धा दिवसभर लॅपटॉपसमोर बसून राहावे लागणार लोक विशेषतः कोविडच्या पहिल्या लाटेनंतर बऱ्याच कंपन्यांनी work from home सुरू केले आहे. काहींचे ऑफिस दोन वर्षांनी सुरू झाले, तर काहींचे अजूनही घरातूनच काम सुरू आहे. या दोन वर्षांच्या काळात अनेकांचे वजन भरमसाठ वाढले. घरीच असल्यावर तोंडावर ताबा राहिला नाही म्हणून, व्यायाम थांबला म्हणून, अशी वेगवेगळी कारणे आहेत. मात्र सतत बसून राहिल्यावर वजन वाढते हे मात्र त्या दोन वर्षात सिद्ध झाले!

असे बसून राहिल्याने सर्वात वाईट परिणाम माणसाच्या metabolism वर होतो. ते खूप स्लो होते. त्यामुळे अशा अवस्थेत आपण जे काही खातो ते योग्य प्रकारे पचन न झाल्यामुळे अन्नाचे ऊर्जेत रूपांतर कमी होते आणि फॅट्समध्ये रूपांतर जास्त होते. त्यामुळेच सतत बसून राहिल्याने माणसाच्या शरीरात फॅट्स वाढत जातात आणि परिणामी पोट आणि वजन दोन्हीही वाढत जाते.

यावर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे metabolism पुन्हा फास्ट करण्यासाठी मेहनत घेणे. यासाठी रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा लिंबू रस, एक चमचा मध, अर्धा चमचा काळे मीठ आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकून ते उपाशीपोटी घ्यायचे. त्यानंतर शक्यतो एक तास काहीही न खाता नंतर ब्रेकफास्ट करायचा.

मेंदूशी निगडित काम असेल तर तुम्ही पूर्णवेळ बसून जरी राहिलात तरी नक्की अध्येमध्ये भूक लागत राहणार. कारण मेंदू थकला तर त्याला नक्कीच ऊर्जेची गरज भासते. अशा वेळी जंक फूड खाण्याचा खूप मोह होऊ शकतो. परंतु हा मोह कटाक्षाने टाळा. त्याऐवजी एखादे फळ, भाजलेले चणे शेंगदाणे, मखाने असे पदार्थ खाऊ शकता.

दोन्ही वेळच्या जेवणात सलाड सक्तीचे करा. कारण सलाड तुमचे अन्न अधिक चांगल्या रीतीने पचवण्यासाठी मदत करते. एका वेळी पोट पूर्णपणे भरेल इतके जेवणे टाळा. थोड्या थोड्या वेळाने थोडा थोडा आहार घेतला तर पचनसुद्धा चांगले होते आणि metabolism सुद्धा फास्ट होते.

संध्याकाळची वेळ, ज्या वेळी जंक फूड खाणे अगदीच गरजेचे वाटते, कारण मेंदू प्रचंड प्रमाणात थकतो आणि खूप भूक लागते. अशा वेळी सुद्धा तो मोह जितका टाळला जाईल तितके चांगले. त्या वेळी dry fruits खाणे सर्वात उत्तम. चहा कॉफी घेतली तरीही चालते.

बसून काम करणाऱ्या माणसांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. दर एका तासाने किमान दोन मिनिटांसाठी जागेवरून उठून जरा तिथल्या तिथे फेऱ्या माराव्यात. पुन्हा बसून काम करावे. हे दर एका तासाने केले तर metabolism स्लो होण्यापासून तुम्ही वाचू शकता. तसेच ज्या वेळी कामात नसाल त्या वेळी जास्तीत जास्त physically active रहा. जमेल तो व्यायाम निवडा आणि आठवड्यातून किमान चार दिवस तरी व्यायाम करा. सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत खेळणे, बाहेर फिरायला जाणे किंवा इतर activities करणे सुद्धा खूप फायद्याचे ठरते

काम तर आपण टाळू शकत नाही. मात्र स्वतःच्या तब्येतीची काळजी तर नक्कीच घ्यायला हवी ना? तर मग घेणार ना काळजी?

पुन्हा भेटू या पुढच्या भागात.

Till then stay healthy be happy

दीप्ती काबाडे

(आहारतज्ज्ञ)