चंद लम्हे काफी होते हैं !

युवा विवेक    04-Apr-2023   
Total Views |


चंद लम्हे काफी होते हैं !आज एकदम सकाळी सकाळीच एकीकडे कामाची गडबड चालू आणि मनात कुणाच्या तरी आठवणींचं मोहोळ उठलेलं त्यात बॅकग्राऊंडला सुरेख अलवार गहिरे स्वर सुरेश वाडकरांचे 'तुला पाहिले मी नदीच्या किनारी'.....आ हा हा !!!!म्हणलं इतक्या सकाळीसकाळी एकदम गजल वगैरे !कोण ऐकतंय म्हणून खाली डोकावून पाहिलं, तर शेजारचा हॉटेलवाला सकाळी छान झब्बा, टोपी, गळ्यात रुमाल, कानात अत्तराचा फाया अशा ऐटीत हॉटेल उघडून ग्राहकाची वाट पाहत आणि स्वतःबसण्याची जागा म्हणजे त्याची खुर्ची टेबल स्वच्छ करत होता एकीकडे डोळ्यासमोर हे चित्र आणि माझी ,मुलांची सकाळची आवराआवर त्यांचे टिफिन, त्यांचे गणवेश आणि नेहमीची धावाधाव "टाय सापडत नाहीये आईsss" दुसरा नेमका त्याच वेळी ओरडत असतो "आई, डाव्या पायाचा सॉक्स कुठं आहे दे नाss" अशा आरोळ्या!आणि त्यांची घड्याळाचा काटा जराही इकडे तिकडे न होऊ देता अती म्हणजे अतीच वेळेवर येणारी school bus .. हाश हुश अरे राम राम राम.. ही म्हणून धावपळ आणि त्यातच 'तुला पाहिले मी नदीच्या किनारी 'सगळं सगळं एकमेकांना विसंगतच आणि माझ्या back of the mind रेंगाळणारी एक अनामिक हुरहूर आठवणींची ..काही काही विचारू नका ....किती आघाड्यांवर मी धावत होते, हे असं माझ्याकडे रोजच चित्र असते; पण आज वेगळं घडत होतं म्हणजे सुरेश वाडकरांनी सकाळीच स्वरांच्या रूपाने हजेरी लावली होती ना घरी... कसंबसं सगळं आवरून स्वतःसाठी वाट मोकळी करत सोफ्यावर येऊन बसले आणि हुश्य... पंचवीस-तीस मिनिटं एकदम पिन्ड्रोप सायलेन्स... मन, मेंदू, विचार काही काही नको असतं मला या वेळेत कारण या एनर्जेटिक वेळेनंतर पुन्हा धावायचं असतं, या वेळेत मी फक्त माझी असते बाकी काहीही आणि कोणीही नको... पण त्या वेळी राहून राहून 'तुला पाहिले मी नदीच्या किनारी' पुढे येत जातं आणि…याच मूडमध्ये मी शून्यात पाहत मनात रेंगाळणाऱ्या ओळींसोबत न जाणो कोणकोणत्या दुनियेची सफर करुन आलेली असते,"चंद लम्हे खुद के साथ कभी गुजार के देखो.. इश्क हो जायेगा उनसे... "दावा है मेरा!एनर्जेंटिक होऊन... पुन्हा धावण्यासाठी असं विचारात तरीही विचारशून्य होऊन क्षणभर जगावं माणसानंस्वतःची सोबत आवडणं चांगलं असतं नई...

- अमिता पेठे-पैठणकर