नात्याची गोष्ट , प्रेमाची गोष्ट ...

युवा विवेक    15-Jul-2023   
Total Views |

नात्याची गोष्ट , प्रेमाची गोष्ट ...

माणूस दुरावणं ही आता नित्याचीच बाब झालेली आहे. अगदीच सांगायचं म्हणजे नवरा-बायको किंवा प्रियकर-प्रेयसी या नात्यांत हे प्रमाण हल्ली फार वाढलंय! कधीकाळी या माणसाला आपण ‘आपलं माणूस’ म्हणून मिरवत होतो, ते माणूस आपलं राहिलं नाही. ही भावना किती दिवस टिकेल, सांगता येत नाही. पण हल्ली दैनंदिन जीवनात प्रत्येकच दिवस फक्त काम आणि काम यांनी इतका भरलेला आहे की, दुरावलेल्या माणसाला विसरणं हे सहज शक्य झालंय. म्हणजे मनात कुठेतरी ती व्यक्ती असतेच; पण त्या भावनेला डोकंसुद्धा वर काढता यायचं नाही इतकं मनात भरभरून ठेवलेलं आहे सगळं...

पण ही भावना एखाद्या दिवशी डोकं काढण्यात यशस्वी होतेच आणि एकदा तिनी डोकं वर काढलं की मग दैनंदिन कामात अडथळा येतोच. परत ती भावना दडपून टाकण्याचा प्रयत्न करायचा. अशावेळी वाटतं, सर्दी, ताप वगैरे आजार दोन दिवसांत बरा करण्यासारखी भावना विसरण्यावर एखादी गोळी असती तर किती बरं झालं असतं! अशी गोळी मला ठाऊक नाही; पण यावर उपाय मात्र आहे. ती भावना जेव्हा वर डोकवेल तिला तेव्हा वर येऊ द्यायचं. एखाद्या दिवशी घ्यायची रजा दैनंदिन कामातून. समोर मोठं कापड अंथरुन जसं पिशवीतलं सगळं सामान त्यावर ओततो तशी ही भावना आपल्या समोर अक्षरशः ओतायची. मनातलं सगळं बाहेर काढायचं. प्रत्येक आठवणीला स्पर्श करायचा. आता तुम्ही म्हणाल, हे आम्ही नेहमीच करतो; पण ती भावना पुन्हा मनात जाऊन खोलवर कुठेतरी जागा शोधते. म्हणूनच म्हटलं, माझं त्या भावनेविषयी अजून पूर्ण सांगून झालेलंच नाही..

त्यातली एकेक आठवण डोळ्यांसमोर आणायची. हे करत असताना प्रथम आठवायची नात्याची सुरुवात. नात्याची सुरुवातच मुळी महत्त्वाची असते. नात्याची पहिली पायरी म्हणजे वचन. आपण एकमेकांना वचनं दिली ती खरंच पूर्ण करणं शक्य होतं का? जर नसेल तर मुळातच ती अवास्तव होती हे आपल्याला मान्य करावं लागेल. प्रेमाच्या प्रांतात सत्याचं स्थान पहिलं. त्यामुळे, प्रेमात वचन द्यायचं किंवा मिळवायचं ते मौनातून आणि वचन पाळायचं ते कृतीतून! वचनातलं मौन संपलं तर त्या होतात फक्त पारावरच्या गप्पा आणि वचनपूर्तिचा उद्गार म्हणजे अहंकार! या पारावरच्या गप्पा आणि अहंकाराला प्रेमात मुळी स्थानच नाही. आता दुसरी आठवण म्हणजे मनातलं ओळखायलाच हवं ही अवास्तव अपेक्षा! ही अपेक्षा चुकीची आहे, असं नाही. पण ओठांच्या आड दडलेलं मौनातून ओळखायला आधी तेवढा सहवास तरी हवा ना! मन कळणं आणि ते जुळणं हे सहवासाच्या एकेका पायरीवर गवसतं. जोडीदाराच्या मनातलं ओळखण्याची ऊर्जा हा सहवासच देतो.

पुढे दोन-चार आठवणींना स्पर्श करुन झाल्यावर नंतर एखादी वात्सल्याची आठवण सापडते का? ते शोधायचं. ब-याच जणांना किंवा जोडप्यांना हे अनोळखी वाटेल. कुणी म्हणेल, वात्सल्य? ते तर आई नि मुलाच्या नात्यात असतं. पण मुळातच वात्सल्य हा प्रेमाचाच एक भाग असल्यामुळे प्रत्येक नात्यात वात्सल्य हवंच. खासकरुन अलीकडे नवरा-बायकोच्या नात्यात ते हवंच. एकमेकांवर प्रेम करताना एकमेकांच्या चुका दाखवण्याचा हक्क दोघांनाही निश्चितच असतो. आपला कान धरायचा म्हटलं की तो कुणी मोठ्या व्यक्तीने धरला की आपण ऐकतो; पण समवयस्क किंवा आपल्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीने तो धरला की अहंकार दुखावण्याचा संभव असतो. इथे वात्सल्य हवं! बायकोला नव-याच्या आईची भूमिका घेता यायला हवी किंवा नव-यालाही बायकोच्या आईची भूमिका घेता यायला हवी. आपली आई ओरडतेय म्हणून आपण कायमचं घर सोडून जात नाही. त्या आईची जागा घेत एखाद्या वेळी आपल्याला आई होता यायला हवं. यासाठी आपला अहंकार बाजूला ठेवला म्हणजे दुस-याचा अहंकार दुखावण्याचा प्रश्न येणार नाही. त्यामुळे प्रेमात वात्सल्याची साधना दोघांनी मिळून करायची असते. कितीतरी गोष्टी असतात. त्याचा विचार करुन त्या आपल्याला आत्मसात करता येतात; पण विचार करण्यासाठी अर्थात नात्यासाठी थोडासा वेळ द्यायला हवा. नवरसांना नात्यात स्थान द्यायला हवं... नातं फुलवायचं आहे, हे कायम लक्षात ठेवलं म्हणजे खत-पाणी घातलं जाईल. हे खत-पाणी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वर म्हटल्याप्रमाणे प्रेम, सहवास आणि वात्सल्य...

साधं सोपं सांगायचं तर, तुम्ही, मी आपण हाडामासाची माणसं आहोत. नातं माणूसच निर्माण करतो. त्यामुळे ते माणसानीच हळुवारपणे जपलं पाहिजे. माणसाला दु:खाच्या महालापेक्षा सुखाची झोपडी अधिक प्रिय वाटते. सुख आणि दु:ख या दोन सरितांनीच त्याचं आयुष्य व्यापलेलं आहे. जीवन प्रवासात या दोन्ही सरितांच्या पाण्यानी तो आपली तहान भागवत असतो. पण सरिता म्हटलं म्हणजे निसर्गाच्या सुख आणि दु:ख या दोन्ही सरिता शेवटी सागराला जाऊन मिळणारच. तिथे त्या एकरुप होतात. त्यातलं सुखाचं पाणी आणि दु:खाचं पाणी वेगळं करता येणारच नाही. माणसाच्या जीवनातला हा सागर किंबहुना महासागर म्हणजे प्रेम... प्रेम, एकरुपता, सहवास, वात्सल्य...

- गौरव भिडे
पुणे.
१५ जुलै २०२३