कृष्ण… एक न उलगडलेलं कोडं!

युवा विवेक    16-Jul-2023   
Total Views |

कृष्ण… एक न उलगडलेलं कोडं!

कृष्ण, म्हणजे एक न उलगडलेलं कोडंच आहे. ते उलगडणं खरं अतिशय सोपं आहे, सहज आहे... आणि म्हणूनच कठीण! ते आजवर उलगडंही अनेकांना; पण भक्तांच्या मांदियाळीतील ते अगदीच तुरळक आहेत हेही खरंच. संस्कृतीने उराशी कवटाळून ठेवलंय त्याच्या स्मरणाला, त्याला! अगदी एखाद्या लोभस मोरपिसाप्रमाणे. तसाच तर आहे तो, मोरपिसासारखा! लोभस आणि कित्तीतरी छंटांमधे विलसणारा. त्या छटा एकमेकांत इतक्या सहज मिसळून जातात की दाखवता येत नाही. कोणती सीमा दोघांमधली भेदरेषा होणारी. तसाच तोही. आपल्या जीवनाच्या रंगांत तो इतका मिसळून गेलाय, की दाखवता येत नाही त्याचा असा वेगळा रंग. खरंतर वाटतही नाही दाखवावासा! कारण प्रत्येकच अनुभवाला थोडीच दिले जातात शब्द? आणि त्याचा अनुभव तर शब्दातीत! वाटतं, की करुन झालेही असतील त्याच्या अनुभवाला शब्द देण्याचे अनेकानेक भोळेभाबडे प्रयास. कधीतरी... कदाचित त्याच शहाणीवेने आता इच्छाही होत नसेल, आनंदाच्या उत्सवाला शब्दांमधे बांधण्याची; पण अनुभवाची उत्कटता मात्र प्रतिक्षण तितकीच ताजी आहे. त्याचा रंग जीवाला इतका वेढून आहे, की जन्माच्या सीमा ओलांडून त्याची निळाईच घेऊन जाते अलगद, अज्ञाताच्या अंधारी. त्याची निळाईही फार विलक्षण! गडद होत जाणारी... आयुष्याच्या अवघ्या सूक्ष्मभव्य सृजनाचे ओले अंधार भरलेत त्या निळाईत. दाट होत जाणारे आयुष्याचे आशय, त्यांच्या रसरुपांची तरलता व्यापून आहे तिच्यात आणि ती निळाई व्यापून आहे आपल्या, मुळापासून अनंतापर्यंत. हे तर नेहमीचंच. संस्कृती जीवनाला अगदी सवयीचं. भजन कीर्तनांतून, ओव्या गवळणींतून, भवती आणि तितकाच आतल्या अंतरात सतत किणकिणणारा त्याचा कृष्णस्वर, त्याचे आर्तमधुर निनाद या सगळ्याचं गारुड जन्मानेच लाभलेलंय भारतीय मनाला; पण त्याच्या विशेष स्मरणाचा दिवस, श्रावण अष्टमीचा. त्याच्या जन्मालाच वेढून असलेली सावळी गूढता पोरवयापासून कथांमधून न कळत जाणवणारी; पण त्यातून कुतुहलाचे आणि तितकेच स्वाभाविक करुणेचे किती अंकुर फुटत राहतात मनात त्याच्याबद्दल... प्रश्नांच्या तहानेला आधार मिळतो. मग थोडाफार कथांमधून की त्या आधारासाठीच घडवलेला असतो लोककथांचा नाजूक पैस? कोण जाणे! पण त्याच्या चरित्रात जागजागी तहान निर्माण होत रहाते आणि अविरत शोधतही रहाते निर्माणाचे अंधार, निर्वाणाचेही!! मुळात कृष्ण म्हणजे आकर्षण. कदाचित् म्हणूनही होत असू आपण त्याच्यापाशी आकर्षित. पण हे आकर्षण शरीर स्तरावरचं नाही. त्याचे अज्ञात धागेही ठाऊक नाहीत आपल्याला. पण त्या कोवळ्या अतूट धाग्यांची कल्पनाही किती रोमहर्षक वाटते मनाला! त्याचा गूढ वाटणारा जन्म, कैदेतून केलेली थक्क कराणारी सुटका, त्याच्या लोभस बाललीला आणि एकूणच विलक्षण वाढ... पुढे त्याच्या जीवनातील राधा, रुक्मिणी, गोपिका, मीरा, द्रौपदी, सारंच किती विलक्षण म्हणावं! विलक्षण म्हणून थांबता न यावं इतकं वेगळं... त्याच्या बालरुपात आनंदून जाताना अचानक दिसणारा महाभारतातला तो किती वेगळा वाटू लागतो तेव्हा! आणि त्यानं पार्थाला गीता सांगणं ही त्याची केवढी कृपा म्हणावी समस्त मानवजातीवर. अगणित धाग्यांमधे गुंतला तो, रमलाही. नात्यांना व्यावहारिक आदर्शाचा एक नवा सुगंध देऊन तो सानंद स्वेच्छेने बांधलाही गेला कित्येक कालसीमित बंधनांत. पेंद्यापासून द्रौपदीपर्यंत किती नात्यांमधे विलसत गेला तो! स्वतःला गुंफत त्यानेच घडवलेली स्वचरित्राची गुंफण इतकी का मग सोपी असणार? आणि शेवटी... त्याच्या कार्याची अनपेक्षित इतिश्री! त्याच्यासारखीच! शेवटी अनपेक्षिताचे गंध ते आपल्यासाठी. त्याच्यासाठी कुठे द्वैत आहे ज्ञात आणि अज्ञातामधे? साऱ्या साऱ्या बंधांमधून, त्यांत रमून रंगून तो क्षणात अलिप्त झाला त्यातून... अगदी क्षणात. त्याच्या शरीररंगासारखीच गूढरम्य निळाई मागे सोडून तो एक झाला त्याच्याच मूळ अस्तित्वात! कार्यपूर्ती झाली त्याची, आपल्याला अवाक् करुन सोडणारी. त्याच्या चरित्रासारखीच!

म्हणूनच तर त्याचं जीवन हे किती वेगळं कोडं वाटतं! न कळणारं. जाणिवेच्या कक्षेत न मावणारी त्याची व्यापकता पाहून नाही वाटत दुःख, तो पूर्णतः न कळल्याचं. उलट वाटत रहातो आनंदच! त्याच्या निळाईची अभिनवता रोज नव्याने चाखताना, त्याला रोज नव्याने धुंडताना... अतृप्तिच्या उद्गारातून उमलत राहतात, आर्ताच्या नव्या ज्योती. एकिकडे मूर्तीपूजेतील तो बालगोपाळ म्हणून हर्षवताना आणि त्याचवेळी त्याच्या विश्वरुपाची केवळ कल्पनाही करताना किती सुगंधी होऊन जाते जाणीव, कृष्णा! जन्माची निळाई उलगडली नाही, तरी त्याच्या असण्याच्या केवळ एका विश्वासानेही अंताच्या अंधाराची भीती केव्हाच सरुन गेलीय. त्याने मांडलेला खेळ तो रोज खेळतोच, न चुकता. पण खेळामधल्या उन्हातही त्याचा मागोवा घेता घेता, त्याच्याशी संवादताना, त्याचेच खेळ भोगता-उपभोगताना, तोच तर धरतो माझ्यावर आश्वासनाचं आकाश! त्याच्या कृष्णसावल्यांचा मोहक गारवा अनुभवताना जाणवतही नाहीत उन्हं अगदी तापून निघतानाही! म्हणूनच त्याचं न उलगडलेलं कोडं हा वरदानाचा शुभंकर टिळा वाटतो, त्यानेच भाळी पेरलेला.

पण तो आहेच की! अगदी आजही. क्षणोक्षणी!

त्याचा माझा बंध तर तसाच आहे! अगदी तसाच. अतूट, अभेद्य आणि भक्तीच्या सामर्थ्याने सावळ्या चिरंतनाचं वरदान लाभलेला. कधीपासून? माहीत नाही... पण विस्मृतीच्या प्रांतात वावरताना स्मरणात आहेत त्याच्या सावळेपणाच्या खुणा. कळत नकळत दर्शन देऊन जाणारे त्याचे प्रसाद आणि मनाच्या ओठांवर अखंड सुरू असलेलं त्याच्या स्मरणाचं गाणं.

हृदयी धरुन ठेवलंय मोरपीस, अगदी त्याच्यासारखं!

- पार्थ जोशी