आधुनिकता का अनुकरण ?

युवा लेख

युवा विवेक    22-Jul-2023   
Total Views |

आधुनिकता का अनुकरण ?

आधुनिकता हा जगाचा अविभाज्य भाग आहे. आधुनिक जग, आधुनिक भारत हे विषय आपण कितीदातरी ऐकले आहेत, वाचतो सुद्धा. यंत्रयुगाची सीमा ओलांडून आता आपण आणखी पुढे चाललो आहोत. यंत्रमानवासारखी आधुनिक यंत्रणा परदेशातल्या मोठ्या ऑफिसेसमध्ये वापरतात असं ऐकिवात आहे. आधुनिकता हा अविभाज्य आणि महत्त्वाचा घटक आहेच; पण ही आधुनिकता नेमक्या कोणत्या गोष्टीत हवी याचा विचार करणं तितकंच गरजेचं आहे. शाळा, ऑफिस, कंपनी, कार्यालये, विविध वास्तू व संस्था, शिक्षणाची पद्धत, कामाची पद्धत, खाण्या-पिण्याचे पदार्थ, दैनंदिन सवयी इत्यादी अनेक ठिकाणी काळाप्रमाणे साहजिकच बदल होणार. यातलं सारं काही आधुनिक झालं आहे, अजूनही होणार आहे.

अलीकडच्या काळात भाषा, संस्कृती, जगण्याची पद्धत इथपर्यंत आधुनिकता आहे. हे सगळे घटक आपल्या जीवनाचा एक भाग असले तरी प्रत्येक वेळी त्यात आधुनिकता हवीच, असा कुठे लेखी नियम नाही. मात्र, त्यात बदल होणे आवश्यक आहे. त्या बदलाचं नाव खरंच आधुनिकता असंच आहे का? हा प्रश्न मात्र निश्चितच निर्माण होतो. आपण भारत देशात राहतो. भारतात भाषा आणि संस्कृतीत वैविध्य आहे. या विविधतेतच एकता शोधणारा भारत हा एकमेव देश असावा, याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. गेली ४००-४५० वर्षे आपल्या देशावर अनेक आक्रमणे झाली. कुणी व्यापाराच्या निमित्ताने, कुणी एखादा प्रदेश काबीज करण्यासाठी, कुणी स्थायिक होण्याच्या निमित्ताने आले. यात पोर्तुगीज, इंग्रज यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. येताना केवळ व्यापाराचा हेतू ठेवून आलेले इंग्रज आपली भाषा, संस्कृती घेऊन आले. भारतीयांना त्याचं आकर्षण वाटू लागलं. अर्थात, यामुळे भाषा, रोजगार आणि पर्यायाने राहणीमानात अमूलाग्र बदल झाले; पण आता मात्र आपला देश स्वतंत्र आहे. तरीही आपण आपली संस्कृती आणि भाषा 'आधुनिक' हे नाव देऊन बदलत आहोत, असे काही वेळा जाणवते. काही ठिकाणी या बदलाचे नाव आधुनिक असले तरी कृतीचे नाव 'अनुकरण' आहे, असे जाणवते.

माणूस परिवर्तनशील असतो. परिवर्तन हा जगाचा लिखित म्हणा किंवा अलिखित म्हणा पण नियम आहे. दैनंदिन आयुष्यात माणूस रोज नवनवीन गोष्टी शोधत असतो. जाणून घेत असतो. एखादी गोष्ट आवडली म्हणजे ती आत्मसात करुन तसं वर्तन करण्याचा प्रयत्न करतो. यात गैर असं काहीच नाही. पण प्रत्यक्षात या परकीय गोष्टींचा आपल्याला खरंच मनापासून स्वीकार किंवा स्वागत करावेसे वाटते का? असा प्रश्न पडतो. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास भाषेचे देता येईल. सध्या इंग्रजी माध्यमात जाणारा विद्यार्थी भाषासक्षम आणि मराठी माध्यमातून शिक्षण घेणारा विद्यार्थी फारसा सक्षम नाही, असं आपण ठरवूनच टाकतो ! अशावेळी आधुनिक हे नाव असून प्रत्यक्ष कृती मात्र अनुकरण असल्याचे जाणवते. मुळातच भाषा हे संवादाचे माध्यम आहे. विशेष म्हणजे कोणत्याही वयात कोणतीही भाषा शिकता येते. मुलाची इच्छा नसताना किंवा त्याला जमत नसतानाही इंग्रजी माध्यम त्याच्यावर लादलं जातं. पर्यायाने संस्कृती लादली जाते. बरेचदा, पालकांना प्रश्न विचारल्यास, "आता सगळं इंग्रजीतून आहे." किंवा "आमच्या सगळ्या नातेवाईकांची मुले इंग्रजीत शिकली. म्हणून आम्ही पण शिकवणारे" वगैरे उत्तरे ऐकायला मिळतात. कुठलीही भाषा मुळातच वाईट नाही; पण आपण भारतात राहतो आणि भारतातली प्रत्येक व्यक्ती मोठी झाल्यावर परदेशातच जाणार आहे का?, इंग्रजी माध्यमात शिकला तरच त्याला दहावीनंतर हवा तो अभ्यासक्रम निवडता येईल, असं काही आहे का? असे प्रश्न आपण स्वत: लाच विचारले पाहिजे. आवड असल्यास जरुर शिकावे; परंतु, शेजाऱ्यांची मुले इंग्रजी माध्यमात जातात म्हणून माझी पण मुले इंग्रजी माध्यमातच जाणार हा विचारच अनुकरणातून निर्माण झाला आहे; आधुनिकतेतून नव्हे! माध्यमाचा अट्टाहास किंवा अनुकरण सोडले तरच भाषेचा एक माध्यम म्हणून आनंद मिळवता येईल.

याशिवाय परदेशी कपड्यांचे देखील आकर्षण भारतीयांना वाटू लागले आहे; पण आपण ज्या देशात राहतो तिथे हवामान मिश्र स्वरुपाचे आहे. ज्यांच्या घट्ट किंवा भडक कपड्यांचे आपण अनुकरण करतो तेथे हवा मिश्रच असते का? उत्तर नाही किंवा वेगळं असेल तर मग आपण त्याला आधुनिकतेचे नाव देऊन अनुकरण करतो आहे, असेच म्हणावे लागेल. याउलट, आपण ज्या प्रदेशात रहातो तिथल्या हवामानाचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आवश्यक तोच पोषाख आपण परिधान केला पाहिजे. फॅशनचे नाव देऊन स्वतःच्या शरीराला त्रास देण्यात फारसा अर्थ नाही. खाण्यापिण्याच्या सवयींचे आपण बऱ्यापैकी अनुकरण केले आहे. पण आपल्या शरीरास काय सोसेल, कितपत भूक आहे, वजन कमी-जास्त करण्याची गरज नक्की आहे का? याचा विचार न करता 'डाएट' ही संकल्पना आपण स्वीकारली. एकीकडे मात्र श्रावण महिना किंवा विशिष्ट कालावधीत कांदा-लसणाचे पदार्थ किंवा मांसाहार टाळणे, याला मात्र आपण नावे ठेवतो. 'जिम' सारखी संकल्पना आपण स्वीकारली पण 'योग'सारखा सहजयोगाकडे आपण दुर्लक्ष करतो! निसर्गावर आधारित असणाऱ्या भारतीय सणांचा स्वीकार केला जात नाही. बरेचदा नावे ठेवली जातात. पण याउलट परदेशातील सण-उत्सव आपण आनंदाने स्वीकारतो. या विरोधाभासाला 'आधुनिकता' असे नाव आपण दिले आहे, याबाबत आपण विचार करायला हवा.

आधुनिकता ही गरज आहे त्यामुळे मुळातच ती गरजेप्रमाणेच वापरली पाहिजे. आपली म्हणून काही भाषा आहे, संस्कृती, कार्यपद्धती आहे. त्याचं भारतीय व परदेशी लोकांना आकर्षण वाटेल यासाठी त्यात अनुकरण ही बाब न आणता बदल केले पाहिजेत. आपली संस्कृती किंबहुना जगण्याची पद्धत पुढच्या पिढीत रुजवून त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवले पाहिजे. तरच ती साऱ्या जगभर पोहोचेल. चांद्रयानासारखी वैज्ञानिक क्षमता भारतात असताना परदेशातील विज्ञानाचे अनुकरण का करावे! परकीय देशात शिकावे, नोकरी-व्यवसाय करावा, आदर ठेवावा पण ते स्वीकारण्याची स्वतःची अशी काही बाजू असावी. परकीय भाषा, संस्कृती, जगण्याची पद्धत इत्यादी मनापासून जाणून घेण्याचा, ती शिकण्याचा, प्रत्यक्षात आणण्याचा आपल्याला हक्क आहे. पण आधुनिकता आणि अनुकरण यातला फरक आपण समजून घ्यायला हवा. हा फरक जाणून घेणं हा आपल्याला विकसनशीलतेकडून विकसिततेकडे नेण्याचा उत्तम मार्ग आहे. त्या मार्गाच्या शोधार्थ आपण सदैव असले पाहिजे. आधुनिकता आणि अनुकरण यांचा स्वतंत्र व संयुक्तिक असा दोन्ही बाजूने विचार करावा.

- गौरव भिडे