"तू काय खाणार..!?"

युवा लेख

युवा विवेक    29-Jul-2023   
Total Views |


आपण एखाद्या कामासाठी म्हणून घरातून बाहेर पडतो. वाटेत एखाद्या सिग्नलला, एखाद्या चौकात इतकंच काय, तर रहदारीच्या ठिकाणी ओळखीचा चेहरा दिसतो. समोरची व्यक्ती ओळखीदखल आपल्याला हात दाखवते. हा ओळखीचा चेहरा मित्र किंवा मैत्रिण असेल तर हमखास आपण आणि ती व्यक्ती गाडी बाजूला उभी करुन पहिल्यांदा भेटल्यासारखं अगदी कडकडून भेटतो. थोड्याफार गप्पा होतात; पण त्या गप्पांमध्ये ट्रॅफिक, हॉर्न वाजत असतात, कुठेतरी नेमकं काम चाललेलं असतं त्या यंत्रांचा खडखडाट वगैरे आवाजाचा व्यत्यय येतो. मग आपण जवळपास एखाद्या बऱ्यापैकी हॉटेलात जाऊन बसतो. वेटर आपल्या टेबलावर पाणी आणि मेनूकार्ड आणून ठेवतो. थोडावेळ गप्पा होतात. मग मित्र मेनूकार्ड आपल्या हातात देतो आणि विचारतो, "गप्पा होतीलच; पण आधी सांग काय खाणार तू?" अशावेळी आपल्या तोंडून हमखास 'काहीही चालेल' असा शब्द येतो. अर्थात आपण ऑर्डर देतो, पदार्थ आणि गप्पा संपतात. एकमेकांना निरोप देत आपण आपापल्या दिशेने जातो; पण, काय खाणार तू? यावर दिलेल्या 'काहीही' या उत्तरात बरंच काही दडलेलं असतं; पण कितीतरी दिवसांनी भेटलेला मित्र मग गप्पा महत्त्वाच्या का खाणं महत्त्वाचं? असं वाटायला नको किंवा जनरीत म्हणून आपण काहीही चालेल असं म्हणतो.

त्या हॉटेलात आपण आधी कधीतरी आलेले असतो किंवा एखादा पदार्थ मनात भरलेला असतो. तो पदार्थ किंवा कितीतरी पदार्थ 'काहीही' या उत्तरात दडलेले असतात. काहीजणांना विशिष्ट हॉटेलातले विशिष्ट पदार्थच आवडतात. तर काहीजण टपरीवर, गाडीवर अगदी रांगा लावून पदार्थ खातात. पुणे, नाशिक, कोल्हापूर शहरात अगदी चिवडादेखील हातगाडीवर मिळतो. भाजक्या पोह्यांचा चिवडा, त्यात चवीनुसार मीठ, तिखट, मसाला, कांदा, कोथिंबिर आणि एप्रिल, मे महिना असेल तर आंबटपणाला चांगली अशी कैरी! असं सगळं थोडंसं एकत्र केल्यासारखं करुन कागदाच्या तुकड्यावर किंवा पेपर डिशमध्ये हा चिवडा 'सर्व्ह' केला जातो. यात मटकी घातली की, त्याची चिवडा भेळ होते. हा पदार्थ संध्याकाळी पाच ते आठ या वेळात फेरफटका मारायला गेल्यावर खाण्याचा 'पौष्टिक' पदार्थ आहे! सकाळी नाश्ता म्हणजे पोहे, उपमा त्यावर भरपूर शेव, थोडीशी कोथिंबिर आणि त्यावर अगदी उकळतं सांबार किंवा सँपल (मिसळीचा रस्सा) हे खाताना लाजवाब वाटतं! हे पदार्थ सकाळी साडेसातपासून अकरा, सव्वाअकरा पर्यंत केव्हाही खावेत; पण ऑफिस गाठण्याची घाई मात्र हवी. तरच ह्या पदार्थाला आणखी चव येते...

दुपारच्या जेवणाची तर असं कुणी बाहेर भेटलं म्हणजे मजाच असते. त्यात ती भेटणारी व्यक्ती रसिक खव्वया हवी... म्हणजे मग हिरोची चित्रपटात एण्ट्री व्हावी तशी आपली 'एण्ट्री' डायनिंग हॉलमध्ये होते. पांढरा भात, मसालेभात, दोन भाज्या (यात एक उसळ ठरलेली), आमटी, थोडंसं तूप लावून गरम पोळी, दही-ताक, लोणचं, पापड, गोड पदार्थ, दहीवडा किंवा सुरळी वडी, कोथिंबिर वडी वगैरे भरलेलं ताट असतं. हे सगळं एकदा पोटात गेलं की एखाद्या लहान मुलानी काहीतरी गंमत कानात सांगावी, तसं आपलं मन आपल्या कानात सांगतं, "हे अन्न पचवण्यासाठी एक मसाला पान तरी हवंच!" मग लगेच आपण पानाच्या दुकानात जातो. खरंतर ती पानाची गादीच! पानवाला निरनिराळे पदार्थ घालून ते पान तयार करतो. ते पान तयार होत असताना ते तयार करण्याची कृती आणि पद्धत याच्याकडेच आपण पुष्कळ वेळ बघत राहतो. दुपारी चार वाजता चहा मात्र हवाच! पुण्यात चहाला अमृततुल्य हे यथार्थ नाव आहे. कुठल्याही अमृततुल्यात चहा घेताना साखर, चहा पावडर, दूध, आलं-वेलची हे पदार्थ प्रत्येक घोट घेत असताना जीभेला स्पर्श करतात. चहा दुपारी चार वाजता हवा असतोच; पण ह्या अमृततुल्य चहाला वेळ अशी नाही. केव्हाही घेतला तरी चालतो.

यानंतर नंबर लागतो तो म्हणजे बटाटेवडा आणि भजीचा. इतकी दुकाने किंवा हातगाड्या असूनही बटाटेवड्याची चव प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फरकाने वेगळी असते. कुणी मिरची कोथिंबीरीचा ठेचा वाटून बटाट्याच्या सारणात घालतात, कुणी तर वड्यासाठी चक्क बटाट्याची भाजीच करतात. काही ठिकाणी हळद न घालता पांढ-या सारणाचा वडा असतो. चटणी तर काही ठिकाणी चवदार असते. पावसात कांदा भजीच हवी. एरवी बटाटा किंवा गोल भजीवर भागवता येतं. बटाटेवडा किंवा भजी हा पदार्थ सकाळी दहा ते बारा आणि सायंकाळी पाच ते सात नक्की खावा असाच पदार्थ आहे. थालिपीठ, धपाटे हे थोडे पौष्टिक पदार्थ असले तरी चवीला चटपटीत असतात. भेळ, शेवपुरी, पाणीपुरी सारखे पदार्थ मात्र सूर्यास्त होताना खावेत तरच त्याची मजा चाखता येते. त्यानंतर दक्षिण भारतातून भारतभर प्रसिद्ध झालेले उडीदडाळ आणि तांदूळाचे पदार्थ. डोसा, अप्पम, इडली, मेदूवडा असे पदार्थ. हे पदार्थ आवडीप्रमाणे केव्हाही खावेत; पण चटणी आणि सांबार मात्र दाक्षिणात्य पद्धतीचंच हवं! हे आणि यापेक्षा कितीतरी पदार्थ 'काहीही' या उत्तरात दडलेले असतात. हे वाचताना तुम्हाला सुद्धा 'काहीही' या उत्तरात दडलेले पदार्थ आठवतील आणि तोंडाला पाणी सुटेल...

कालच एक मित्र भेटला. असेच आम्ही हॉटेलात गेलो. गप्पा मारताना मित्रानी विचारलं, "काय खाणार तू?" मी नकळतच म्हणालो, "काहीही चालेल!"

- गौरव भिडे