शहरातला पाऊस...

युवा लेख

युवा विवेक    12-Aug-2023   
Total Views |

 शहरातला पाऊस...

पावसाची कितीतरी गाणी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. 'सांग सांग भोलानाथ...' सारखं बालगीत असो, अगदी अलीकडच्या काळातलं 'चिंब भिजलेले' असो; अशा कितीतरी गाण्यातून आपण सूरांचा चिंब पाऊस अनुभवला आहे. ती गाणी ऐकताना आपण पाऊस जगलोय. या गाण्यांचं आणि पावसाचं परस्परावलंबी नातं आहे. प्रत्येक वयात आपल्याला पाऊस वेगवेगळा वाटतो. एकाच पावसाचं हे वेगवेगळ्या वयातलं वेगवेगळं रुप मनाला भावतं, नव्या आठवणींचं जणू आभाळच पाऊस घेऊन येतो. हे जसं वयानुसार बदलणारं पावसाचं रुप आहे, तसं स्थानानुसारही त्याचं रुप बदलतं. गाण्यातला किंवा गोष्टीतला पाऊस हा गावाकडचा किंवा शहराबाहेरील तरी नक्कीच असतो. म्हणजे शहरात पडणारा पाऊस रम्य नसतो, असेच काही नव्हे; पण आपल्याला तो कधीकधीच रम्य वगैरे वाटतो.


पाऊस म्हणजे माणसाला निसर्गानं दिलेलं सुंदर वरदान आहे. याच निसर्गाशी दोन हात करुन माणसानी शहरं निर्माण केली. लोकसंख्यावाढ हे त्याचं मुख्य कारण आणि दुय्यम म्हणजे राहणीमानाचा उच्च दर्जा राखण्याची स्पर्धा! अर्थात निसर्ग यामुळे आपल्यावर काही रागवलेला नाही; पण रुसलाय मात्र जरुर! तुमचा-आमचादेखील नाईलाज आहे. रोज नव्याने शहर वाढतंय. तुम्ही-आम्ही राहतो, त्या जागेवरही पूर्वी खूप झाडं होतीच. तेव्हाचा पाऊस आणि आत्ताचा पाऊस यात बराचसा फरक आहे. पाऊसही या फरकाचाच एक घटक झालाय नाही का! ग्रामीण भागातला पाऊस आभाळातून अजूनही हिरवाई घेऊनच येतो. शहराच्या पावसानी अलीकडे रुपडं बदललंय. हिरव्या रंगाबरोबरच नवनव्या गोष्टी शहरातला पाऊस शिकलाय. थोडक्यात सांगायचे तर, एखादा माणूस 'लहरी' असतो तसा पाऊस 'शहरी' झालाय. एखाद्या सोमवारीच बघा ना... आपण सकाळी अलार्म वाजला की उठतो. दात घासता-घासता खिडकीकडे लक्ष जातं. ऊन पडलंय, रात्रीच्या पावसाने ओले झालेले रस्ते थोडेसे वाळतायत... म्हणजे आता पाऊस जरा उघडलाय म्हणत आपण लवकर आवरतो आणि ऑफिस किंवा महत्त्वाच्या कामासाठी निघायच्या तयारीत असताना धो-धो पावसाला सुरुवात होते. रेनकोट, छत्री घेऊन आपण कंटाळत बाहेर पडतो. आधीच सोमवार त्यात पाऊस! आपलं नशीबच खोटं म्हणत चिडचिड करत ऑफिसात पोहोचतो. काही वेळा गाडी स्लीप झालेली असते, पँटवर चांगला गुडघ्यापर्यंत चिखल लागलेला असतो. आजच नेमका कंपनीचा सीईओ किंवा कोणी मोठी व्यक्ती ऑफिसला भेट द्यायला येणार असते. तेव्हा वाटतं कुणी सांगितलं पावसाला आत्ता यायला. हा विचार करत असताना पाऊस थांबतो आणि आभाळानी छत्री धरल्याच्या ऐटीत ती मोठी व्यक्ती आत शिरते. तेव्हाच नेमकी आपल्याला पावसाचं कौतुक करणारी गाणी सुचली म्हणजे आतल्या आत चिडचिड होत राहते.

हाच पाऊस मात्र ऑफिसातून घरी जाताना परत येतो आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत घरी यावं लागतं. गाडी बंद पडणे, खड्डे चुकवणे, ट्रॅफिक आणि वाढत जाणारा पाऊस यामुळे घरी येईपर्यंत कंटाळा येतो. घरी पाऊल टाकलं की पाच मिनिटांनी पाऊस आपले पाय वाजवणं थांबवतो. अशा वेळी तर पावसाचा फार म्हणजे फारच राग येतो; पण तेवढ्यात कुणीतरी आल्या आल्या हातात आल्याच्या चहाचा कप दिला की, मेहनत सार्थकी लागते. नशीब जोरावर असले तर भजी पण मिळतात. मग पाऊस आल्याचं आणि भिजल्याचं जरा बरंही वाटतं. पावसावरचा आपला राग कमी होतो. शनिवार, रविवार सुटीच्या दिवशी आपण वर्षासहल ठरवतो. तेव्हा हा पाऊस कितीही विनवण्या केल्या तरी येत नाही. कुठे दडी मारुन बसतो देवजाणे! शेवटी कृत्रिम पाऊस म्हणजे कारंज्याखाली भिजायची वेळ येते; पण आपलं नाही तर नाही पण मित्राचं नशीब जोरावर असेल तर पाऊस येतो. वर्षासहलीचं सार्थक करतो. प्रेयसी किंवा प्रियकराबरोबर पावसात भिजायला मिळतं. तेव्हा वाटतं पाऊस असाच बेभान पडावा. वर्षासहल थकवा घालवते. तेव्हा पावसाचे आभार मानावेसे वाटतात. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या स्टाॅलची जत्राच भरते. भजी किंवा गरमगरम पदार्थ खात असताना आपली मगाशी उडलेली तारांबळ आता कुणाची तरी उडली हे बघायला मजा वाटते. काही अपघातही होतात, काहीवेळा वेळापत्रकही कोलमडतं. शहरातला पाऊस कधी हवासा अन् कधी नकोसा असतो.

थोडक्यात शहराचं आणि पावसाचं, 'तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना', असं सासू-सूनेसारखं नातं आहे. ते टाळता येत नाही, त्यात आनंद शोधावा लागतो. आपल्याला खूपदा काहीजण म्हणतात, "मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत." असं म्हटल्यावर आपण प्रतिप्रश्न करावा, "तू पावसाळे बघितलेस त्या पावसाळ्याचा पाऊस ग्रामीण होता का शहरातला पाऊस होता?"

- गौरव भिडे