सुंदर साजिरा श्रावण!

युवा लेख

युवा विवेक    19-Aug-2023   
Total Views |

सुंदर साजिरा श्रावण!

"श्रावण महिनाच विलक्षण... झाडांबरोबर मनालाही पालवी फुटते...", हे श्रावण महिन्याचं व.पु. काळे यांनी केलेलं वर्णन. याशिवाय त्यांच्याच एका लेखात किंवा कथेत, "लाजावं कसं हे श्रावण किंवा भाद्रपदानंच जगातल्या पहिल्या तरुणीला सांगितलं!", श्रावणाचं असंही वर्णन आहे. ही वाक्य वाचताच श्रावण म्हणजे खरोखरच विलक्षण महिना किंवा खरंतर आपल्या आयुष्यात नव्याने जगण्याची दरवर्षी उमेद देणारा कालावधी, असंही म्हणता येईल. निसर्गाचा उत्साह बघून मनालाही पालवी फुटते किंवा वपुंनी म्हटल्याप्रमाणे एखाद्या सुंदर तरुणीच्या पहिल्या लाजेला श्रावणाहून आणखी सरस अशी काही उपमा देताच येणार नाही. या श्रावण महिन्यातच आपल्या पारंपारिक साहित्याच्या हाती आपण हात गुंफतो. पावसाची निरनिराळी गाणी, अभंग, ओव्या, स्तोत्रे, यज्ञ-यागादि सूक्ते, मंगळागौरीची गाणी असे कितीतरी प्रकार आपण म्हणतो.

माणूस निसर्गाशी खऱ्या अर्थाने जोडला जातो तो श्रावणातच! ऊन-पावसाच्या खेळात श्रावणात आनंदाचं शिंपण होत असल्याचाच आपल्याला भास होतो. निसर्गाची ऊन आणि पाऊस ही वेगळी रुपं एकत्र नांदताना, लपंडाव खेळताना, सुखाचं शिंपण करताना आपल्याला बघायला मिळतात. गावच्या घरी तर भारी मजा असते. कौलांवरुन पडणाऱ्या पागोळ्या, घराजवळचे झरे, अंगणात पडणारे पावसाचे थेंब यांच्या आकारात सूक्ष्म पण निरनिराळे होणारे बदल आपल्याला जाणवतात. पालवी फुटलेल्या झाडाला स्पर्श करावासा वाटतो, सळसळत्या पानांना हात लावावासा वाटतो. अंगाई म्हणून कुणी झोपवावं तसं संध्याकाळी किंवा रात्री येणारी वाऱ्याची झुळूक आपल्याला सुखाची भासते. श्रावणातल्या सण आणि उत्सवांतून निसर्गाची खास ओळख होते. आषाढ महिन्याच्या उत्तरार्धातच श्रावणाची चाहूल लागते. दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीची प्रतिपदा म्हणजे श्रावण शुद्ध प्रतिपदा. पहिला सण म्हणजे नागपंचमी. "नागोबाला दूध" अशी आरोळी देत येणारे नागवाले एका टोपलीतून नाग घेऊन येतात. सुवासिनी आणि मुली या नागाची पूजा करुन त्याला लाह्या नि दूधाचा नैवेद्य दाखवतात. घरी नैवेद्यास पुरणाची दिंड करतात. यानिमित्ताने निसर्गातली जीवसृष्टी पूज्य असल्याची भावना मनात निर्माण होते. मंगळागौरीचा खेळ आवडत नाही अशी स्त्री विरळच! श्रावणातल्या मंगळवारी छान नटून-सजून सगळ्या सख्या एकमेकींकडे जाऊन निरनिराळे पारंपारिक खेळ खेळतात. मंगळागौरीच्या निमित्ताने सख्यांची होणारी भेट मनाला आनंद देणारी असते.

रक्षाबंधनाच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आपल्या भावाला बांधून समस्त स्त्रिया रक्षणाची जबाबदारीच भावाला घेण्याची विनंती करतात. बहिण-भावाच्या नात्याची वीण घट्ट होते. याच महिन्यात जानवे किंवा उपवस्त्रे बदलली जातात. जुनं 'टाकून देणे' याऐवजी यथोचित विसर्जन करुन त्याच्या आधारे नव्याचा स्वीकार करण्याचा एक संस्कारच मनावर होतो. गोपाळकाल्याच्या उत्सवातून एकोप्याची भावना दृढ होते. यज्ञ-यागादि कर्मातून वाईट शक्तींचा नाश होऊन मांगल्याची गुंफण होते. पोळ्याच्या दिवशी घरच्या बैलांना सजवून रंगरंगोटी केली जाते. गोडधोडाचे पदार्थ खायला देऊन बैलांच्या प्रति ऋण व्यक्त केले जाते. श्रावणातले हे सण म्हणजे निसर्ग आणि सजीव सृष्टी यांचं नातंच खरंतर अधिक दृढ करत असतात.

श्रावणाची चाहूल लागताच मनात निरनिराळ्या भावना नवनवी रुपे धारण करतात. समाजातील सर्वांनीच एकत्र येऊन खऱ्या अर्थाने समाज म्हणून एकाच आभाळाखाली आणणारा हा श्रावण महिना... म्हणूनच जशी पावसाळ्यात नवनवीन रोपांची बीजं पेरली जातात, तशीच समस्त मानवजातीच्या कल्याणाची सण-उत्सव-समारंभरुपी बीजं पेरुन समाज नावाचा वृक्ष बहरतो तो श्रावणातच! हा श्रावण महिना खरोखरच सुंदर आणि साजिरा आहे. याबरोबरच तो मांगल्याचा आणि पावित्र्याचाही आहे. साहित्य, कला, क्रीडा, संगीत, खाद्यपदार्थ, पाने-फुले, झाडे-वेली, वारा, ऊन, पाऊस सा-या सा-यांनाच श्रावण महिना मधुर स्वरात साद घालतो. नवोन्मेषाच्या आभाळाचा परिसासारखा स्पर्श धरतीला होतो आणि सारी सृष्टी हिरवाईनं मोहरते, अंतर्बाह्य खुलते, तेव्हा या सृष्टीचा श्रृंगार मनामनाला साद घालतो. तुमच्या-माझ्या तनामनात उत्साहाचं, पावित्र्याचं, मांगल्याचं शिंपण करतो तो हा श्रावण महिना! म्हणूनच श्रावण महिन्याचं वपुंनी केलेलं वर्णन असो, सुंदर साजिरा श्रावण आला... गीत असो, श्रावणमासी हर्ष मानसी सारखी कविता असो, या साऱ्या कवितांतून श्रावणाचं वर्णन आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा मनात श्रावण नाचू लागतो, सजू लागतो... माझ्याही मनात आता नाचू लागलेले शब्द आहेत...

सावळ्या रंगांचा, जणू कृष्णच गोजिरा
आनंद शिंपीत श्रावण आला...

- गौरव भिडे