संभाषण कौशल्य...

युवा लेख

युवा विवेक    26-Aug-2023   
Total Views |

संभाषण कौशल्य...

हल्ली अनेक पालकांची तक्रार असते. “आमचा मुलगा किंवा आमची मुलगी अजिबात कुणाशी बोलतच नाही. घरी मात्र चांगला दंगा चाललेला असतो! सुट्टीच्या दिवशी तर बघायलाच नको!" वगैरे वगैरे तक्रारी आपण नेहमी ऐकतो. विशेष म्हणजे अगदी चार-पाच वयाच्या मुलांपासून जवळपास सोळा-सतरा वर्षांच्या मुलांच्या पालकांपर्यंत सर्वांची अशीच तक्रार असते. खरंतर संभाषणाचा इतका बाऊ वाटावा, असा काही मोठा हा प्रश्न नाही. कारण, संभाषण मुळातच बोलणं ह्या साध्या सोप्या गोष्टीवर अवलंबून असतं. संभाषण ही सुंदर कला आहे. ते चित्र आहे, त्यात रंग भरावेत शब्दांचे!

अशी आपल्या पाल्याच्या संभाषणाविषयी तक्रार करणाऱ्या पालकांना मला सांगावंसं वाटतं. तुम्ही तुमचं लहानपण एकदा आठवून बघा. अगदी आताही वयाची तिशी, चाळिशी, पन्नाशी पार केलेले तुम्ही-आम्ही सर्वजण प्रत्येक वेळी व्यक्त होऊ शकतोच असे नाही. त्यामुळे, संभाषण म्हणजे व्यक्त होणं. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, आपल्या मनात काय आहे ते दुस-याला सांगणं म्हणजे संभाषण! त्यामुळे, संभाषण ही शिकण्याची बाब नाही; ती आत्मसात करण्याची गोष्ट आहे. म्हणजेच ते कौशल्य आहे आणि कौशल्याचा उगम होतो तो अनुभवातूनच! साध्या-साध्या गप्पांतूनही संभाषणाचं कौशल्य आत्मसात करता येतं. अर्थात, ही दोन व्यक्तींमध्ये घडणारी गोष्ट असल्याने दोन व्यक्ती एकत्र येणं हा त्याचा पाया आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल. संभाषण कौशल्य आत्मसात न करता येण्यामागचं पहिलं कारण आपल्याला इथे सापडलं. दोन व्यक्ती निवांत अशा एकत्र येतच नाहीत. त्या ठरवून अशा एकत्र येणारच नाहीत. मुळातच, ठरवून एकत्र आलं म्हणजे त्या गप्पा नसून ती चर्चा असते. संभाषण हे काही पूर्वनियोजित नसतं. ती घडणारी गोष्ट आहे. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो बघा, आमची मैत्री झाली किंवा आमचं छान जमतं. हे होणं किंवा जमणं या सहज व्याख्येत संभाषणाचं अस्तित्व आहे.

एसटी किंवा आपण रोज ज्या बसनी प्रवास करतो तिथे तरी आपली आधी कुठे कुणाशी ओळख असते. मध्येच आभाळ भरुन न येताही अचानक पाऊस सुरू व्हावा तसं एखादा विषय निघाला की, गप्पा सुरू होतात. मग ओळख होते. मग छानशा संभाषणाकडे आपली वाटचाल होते. "आज पाऊस फार आहे नाही?", असं आपण म्हटलं की, प्रतिसाद म्हणून समोरचा माणूस, "हो ना... अगदी कंटाळा आलाय या पावसाचा.", असं म्हणतो. मग गप्पा हळूहळू वाढत गेल्या की, आपल्या सीटजवळ उभा असणारा माणूस त्याच्याही नकळत आपल्यात सामील होतो नि संभाषण नावाच्या या अत्तराचा गंध मनामनात दरवळायला लागतो. आत्मसात करण्यासाठी अनुभव हवा. या अनुभवातूनच ओठांच्या आड दडलेले शब्द बाहेर येतात. ते काहीवेळा निराकार असतात. समोरची व्यक्तीच त्याला सुरेख आकार देते आणि मग आपल्याला वाटतं, जे व्यक्त करायचं तेच नेमकं आपण इतके दिवस उगाचच ओठांआड दडवून ठेवलं! हीच संभाषणाची गंमत आहे. आपण लहानपणी आई-बाबांचा हात धरुन चालायला शिकतो. तसाच अगदी सहजतेनं शब्दांचा हात हातात घेऊन आपल्याला बोलायला म्हणजे व्यक्त व्हायला सुरुवात करायची आहे. एकदा तुम्ही सुरुवात तर करा, मग बघा तुम्ही संभाषणाची कला चुटकीसरशी अवगत केलीच म्हणून समजा!

आता तुम्ही म्हणाल, एखाद्या व्यक्तीशी बोलायचं म्हणजे त्याच्या स्वभावाचा थोडा तरी अंदाज हवा; पण खरं सांगू का, असा कुणाचाही स्वभाव आपल्याला नीटसा कळत नाही. फारतर वृत्ती कळते ती देखील त्या व्यक्तीच्या वर्तनावरुन... इतकंच काय, लग्नाला २०-२२ वर्षे झाली तरी जोडीदाराच्या स्वभावाचा आपल्याला अंदाज बांधता येत नाही. आपल्या जवळच्या किंवा लांबच्या नात्यातली व्यक्ती कुठल्या क्षणी कसं वागेल काही सांगता येत नाही; पण म्हणून त्या व्यक्तीशी आपण बोलणं टाळत नाही... जिथे नात्यातल्या लोकांचा अंदाज बांधता येत नाही, तिथे आपण परक्यांच्या स्वभावाचा अंदाज तरी कसा बांधणार? त्यामुळे, आपल्याला जे वाटतंय ते बोलल्यावर तो आपल्याकडे दुर्लक्ष करेल, उठून जाईल, नाहीतर रागवेल; पण त्या व्यक्तीला बोलावंसं वाटलं, काही व्यक्त करावंसं वाटलं तर छानपैकी गप्पा होतील. होतील कसल्या चांगल्या रंगतील! आपण बोलके असलो म्हणजे आपल्याला दुसऱ्या व्यक्तीलाही बोलतं करता येतं.

तुमच्या-माझ्यात असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, ओठांआड दडलेल्या शब्दांसाठी, व्यक्त होऊ पाहणाऱ्या अनेक अव्यक्त भावनांसाठी आपल्याला हे कौशल्य आत्मसात करायला हवंच. त्यासाठी छान अनुभव हवेत म्हणून आपण सतत कुणाशी ना कुणाशी बोलत रहायला हवं. बोलता येत नसणारं तान्हं मूल देखील डोळ्यांतून, स्पर्शाचा आधार घेत घेत बोलू पाहतं. अगदी तसंच आहे. निरागस भावनेने बोलायला शिकायला हवं. शब्दांचा जन्मच मुळी बोलण्यासाठी झालाय! त्यामुळे, कुणी बोलत नाही ही तक्रार करण्यापेक्षा आपण बोलकं व्हायला शिकू या... शब्दांचा हात हातात घेत पुढे जायला शिकू या... माणूस समाजप्रिय प्राणी आहे. अंतरातली समाजप्रियता ओळखता यायला लागली म्हणजे संभाषण जमून आलं म्हणून समजा! माझा एक मित्र मला कायम म्हणतो, "बोलोगे तो बात बनेगी!"

-
गौरव भिडे