आयुष्याचं वेळापत्रक

युवा लेख

युवा विवेक    05-Aug-2023   
Total Views |

आयुष्याचं वेळापत्रक

परवा एक कविता वाचली, ''सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते! तेच ते!विंदांनी खरंच छान कविता लिहिली आहे. त्याच त्या जगण्याचं वास्तव नेमकेपणाने मांडलेलं आहे. कवितेच्या शेवटी विंदा लिहितात 'मरणंही तेच ते' तेव्हा वाटतं ही तुमच्या-माझ्या आयुष्यातील थोड्याफार प्रमाणात सारखीच कविता आहे. त्या कवितेचा बराच वेळ मी विचार करत होतो. तेव्हा आपलं दैनंदिन जीवन डोळ्यांसमोर आलं. आपल्या दैनंदिन जीवनाची आपण 'तेच ते' कविता केलेली आहे. अर्थात, त्याला फार चांगला दुसरा पर्याय शोधणं तसं अवघडचं आहे; पण तरी त्यातल्या त्यात आयुष्याच्या वेळापत्रकाचा काही वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल का? असा प्रश्न स्वतःला विचारला म्हणजे उत्तर मिळणं शक्य आहे.

पूर्वी सकाळी गजराची घड्याळं आपल्याला साखरझोपेतून उठवत असत. आता मोबाईलमधला 'अलार्म' आपल्याला साखरझोपेतून उठवतो. एखाद्या दिवशी उठवत नसलं तरी नाईलाजाने या अलार्मरावांची आज्ञा आपल्याला पाळावीच लागते. तो आपल्या वेळापत्रकातील पहिला भाग असतो. आंघोळ, नाष्टा, ऑफिसची बॅग भरणे, तयार होऊन गाडी पहिल्या किकमध्ये सुरू व्हावी, म्हणून किंवा आपली नेहमीची बस, लोकल मिळावी म्हणून प्रार्थना करणे, ऑफिस गाठून आपला चेहरा (हल्ली अंगठा घेतात) दाखवणे पर्यंतच्या कामांना धावपळ हाच शब्द योग्य आहे. आपलं आयुष्य तर आहेच; पण आपल्या आवडत्या मालिकेत सुद्धा तो नायक येईल-जाईल त्या प्रत्येक व्यक्तीला "आज मला ऑफिसला जायला उशीर झालाय" म्हणून ऐकवत असतो. मालिकेत हा उशीर रोजच कसा होतो, हे मात्र एक कोडंच आहे बुवा! असो पण सांगायचा मुद्दा म्हणजे पडद्यावरचा, पडद्यामागचा, ख-या आयुष्यातला प्रत्येक नायक आणि नायिका सुद्धा वेळापत्रकाशी बांधलेले आहेत

संध्याकाळही अशीच वेळापत्रकानुसार ठरलेली असते. वेळेला बांधलेल्या आयुष्याचा एखाद्या दिवशी कंटाळा येतो आणि तो सबंध दिवस चिडचिडीतच जातो. अगदीच वाटलं तर शहराच्या जवळपास आपण एखाद दिवस सुट्टी घेऊन फिरायला जातो. फिरणं झालं की, दुस-या दिवशी आपण पुन्हा वेळेशी गणित जमवतो. गणितात हातचा राखतात तशी वेळ राखता आली तर किती बरं होईल, असं आपल्याला वाटायला लागतं. बरेच जणांच्या वेळापत्रकात स्वतःसाठी फारसा वेळच ठेवलेला नसतो. पहिल्यांदा तो वेळ आपण ठेवायला हवा. जसं अनेक माणसं आपल्याशी गप्पा मारायला उत्सुक असतात, तसा आणखी एक आवाज देखील उत्सुक असतो. तोही आपली वाट बघत असतो. त्या आवाजाचं नाव, आतला आवाज! कितीतरी जुन्या-नव्या गोष्टी तो आपल्याला सांगू पाहतो. बऱ्याच जणांना उदरनिर्वाहाकरिता नावडतं काम स्वीकारावं लागतं; पण आपल्याला आवडत्या कामातूनही पोट कसं भरता येईल? हे तो आतला आवाज सांगत असतो. स्वतःचा कल, त्याचं आकलन आणि त्याआधारे रोजगारनिर्मिती कशी करता येईल? याचा विचार आपण करत राहिलं पाहिजे. कारण, ती रोजगारनिर्मिती आपल्याला जमली तर स्वतःचं वेळापत्रक स्वतः तयार करता येईल. आतला आवाज ऐकण्यासाठी स्वतःकडे पाहण्याची कला आत्मसात करता येईल. ती कला आपल्यात निसर्गदत्त असते. आपण फक्त त्या शक्तीच्या हातात हात द्यायचा असतो..

वेळापत्रकात आणखी एक बदल करता येईल तो म्हणजे दुसऱ्या व्यक्तीसाठी दिवसातला थोडा तरी वेळ राखून ठेवणं. आपलं फक्त कुणीतरी ऐकून घ्यावं, असं वाटणारे अनेक जण जगात आहेत. कुणाला तरी काहीतरी सांगावंसं वाटतं म्हणजे व्यक्त व्हावंसं वाटतं; पण ऐकून घेईल अशी व्यक्ती त्याला सापडत नाही. आपण ऐकून घेणं, जाणून घेणं शिकायला हवं. आपण दु:खं हलकं व्हावं म्हणून समुद्रकिनारी जातो; पण त्या समुद्रालासुद्धा भरतीचं सुख आणि ओहोटीचं दु:खं असतंच; पण तरीही तो आपलं दु:खं शांतपणे ऐकून घेतो. आपल्यापाशी एखादा माणूस दु:खं हलकं करायला येतो, तेव्हा त्याचं दु:खं आपल्याला हास्यास्पद तरी वाटतं किंवा बरेचदा, आपण ते नीटसं ऐकतही नाही... कारण आपल्याला समुद्र होताच येत नाही! आपण आपल्या स्वतःच्याच दैनंदिन भरती-ओहोटीत रमलेले असतो... आपली भरती-ओहोटी विसरुन समुद्र होणं आपण जमवायला हवं... म्हणजे मग आपलं आयुष्य अथांग होईल. जगा आणि जगू द्या जसं म्हटलं जातं, तसं ऐका आणि ऐकवू द्या असं म्हणायला शिकलं की, आयुष्य किती सोपं होईल!

हे बदल घडत असताना आणखी नवनवे बदल काय करता येतील ते 'आतला आवाज' आपल्याला सुचवेल. कुणाचं तरी ऐकून घेण्याच्या निमित्ताने त्याच्याशी संवाद साधताना नवं काहीतरी सुचेल. आयुष्य जगण्याची कला आत्मसात करता येईल. ती कला आपल्याला जमली म्हणजे कितीतरी जणांच्या आयुष्यात आपल्याला रंगांची उधळण करता येईल... वेळापत्रकापासून पळता आलं नाही तरी त्याचा त्रास जाणवणार नाही इतपत तरी आयुष्य नक्कीच सोपं होईल, फुलेल... या आयुष्याचा सुगंध घेताना प्रत्येक क्षणी जगण्याचं सार्थक वाटेल...

- गौरव भिडे