अंधारातले उजेड

युवा लेख

युवा विवेक    10-Sep-2023   
Total Views |

अंधारातले उजेड

अंधाऱ्या अदृश्य पटलावर, फिरवले जातात सहज रंगांचे संमोहक स्ट्रोक्स... त्यांची हवीशी वीण, त्यातलं गुंतणं, गुरफटणं, तुटणं, रंगांचं परस्परांत मिसळून जाणं, अचानक विलग होणं, किती किती छटा तरळत राहतात अखंड. स्वप्नांची अशी जादू किती सहज असते! जादूचा प्रयोग पाहून एखाद्या लहान मुलाला कौतुक वाटावं, कुतूहल वाटावं तशीच ही जादू. तसेच आपणही. पाहात रहाणारे, भांबावून, भारावून जाणारे, कुतूहलाने चकित होणारे. कदाचित, शोधतही राहणारे. जादू मात्र रोज दिसते; पण जादूगार? तो मात्र कुठून खेळतो हे कोणास ठाऊक!

स्वप्नाचं हे आदिम कुतूहल अजून विज्ञानालाही पुरतं उकललेलं नाही. अर्थात, ते उकलल्याचं स्वप्न मात्र पडायला हरकत नाही!! पण स्वप्नांचा इतिहास मात्र रंजक आहे!

पूर्वी ग्रीक लोकं रोज सकाळी त्यांच्या मंदिरातील पुजाऱ्यांकडे आपल्या स्वप्नांबद्दल विचारायला जात असत. आपली स्वप्नं लक्षात ठेवून ती त्यांना सांगितली की, त्याआधारे ते पुरोहित काही उपाय सांगत, कधी समस्यानिवारणासाठीचे मार्ग सांगत. यामागे, ईश्वर स्वप्नांतून उत्तरं सांगतो अशी त्यांची धारणा. म्हणून त्यांचा अन्वय लावण्यासाठी पुरोहितांची मदत. वाईट स्वप्न पडत असतील, तरी लोकं मंदिरांत जाऊन झोपत. तिथे झोपल्यामुळे चांगली स्वप्न पडतात ही श्रद्धा. मग अगदी चांगलं स्वप्न पडलं तर त्याचा अर्थ वाईट, वाईट पडलं तर चांगलं अशा अनेक लोकधारणा कालप्रवाहात काही काळ वर्चस्व निर्माण करुन लोपून गेल्या; पण स्वप्न मात्र काही प्रमाणात गूढच राहिलं.

आज, झोपलेल्या माणसाच्या मेंदूचं थेट स्कॅनिंग करुन त्याच्या मेंदूतील कोणत्या भागात कोणत्या भावना उत्तेजित होतात, हे आपण पाहू शकतो; पण त्यामागच्या कारणांमधे अस्पष्टताच आहे. फ्रॉइडच्या मतांनुसार आपल्या सुप्त इच्छा, दाबून टाकलेल्या इच्छा-आकांक्षा व्यक्त करण्याचं, त्यातून मोकळं होण्याचं माध्यम म्हणजे स्वप्न. 'इंटरप्रीटेशन ऑफ ड्रीम्स' याच विषयावर त्याने दोन ग्रंथही सिद्ध केले. पुरेशी झोप झाली नाही आणि त्यात स्वप्न पडली नाहीत, तर चिडचिड होते, नैराश्य येतं यामागचं स्वप्न हेही एक महत्त्वाचं कारण. कारण, अव्यक्त राहिलेल्या आतल्या उर्मींचं सांकेतिक व्यक्त होणं स्वप्नात असतं, असाही समज आहे. संशोधन आहे.

स्वप्नाबद्दल आणखी एक रंजक बाब म्हणजे, आपण पाहिलेली सगळीच स्वप्न आपल्या लक्षात राहात नाहीत!! तेव्हा वाटतं, की आपलं स्वप्न असलं तरी ते आपण कुठे ठरवतो? त्याला आपल्या इच्छा आकांक्षांच्या मुळाचं सांकेतिक प्रतिबिंब म्हटलं, तरीही ते कोणतं, कसं, हे आपण कुठे ठरवतो?

शंकराचार्यांनी केवलाद्वैत सिद्धांत मांडताना जग हे स्वप्न आहे हेच तर प्रतिपादित केलं आहे! जेव्हा आपण स्वप्नात असतो, तेव्हा तेच तर सत्य वाटतं आपल्याला. किंबहुना आपण स्वप्न पाहात आहोत, याचीही जाणीव नसते. म्हणजे स्वप्न हे असत्य आहे का? तर मुळीच नाही! ती जागृतीची एक अवस्था आहे; पण सत्य नाही. स्वप्नात आपण कितीतरी हवेसे नकोसे अनुभव घेतो. आनंदून जातो, घाबरुन जातो, हसतो, रडतो, जणू त्याच घटना सत्य आहेत असंच अनुभवत राहतो; पण ते सत्य नाही केवळ स्वप्नंच आहे हे आपल्याला केव्हा कळतं? अर्थात जाग आल्यावर झोपेतून बाहेर आल्यावर. आचार्यांच्या मते तसंच तर हे जग आहे! जोवर आपण या सुखदुःखाच्या, द्वैताच्या निद्रेत स्वप्न पाहण्यातच आनंद मानत आहोत, तोवर हे स्वप्नच सत्य आहे; पण ज्याक्षणी माणसाला खरी जाग येते, त्याक्षणी द्वैतभावना विरुन जात नाही, कारण ती नव्हतीच तर विरण्याचा प्रश्नच कुठे येतो? स्वप्नातून आपण बाहेर येतो आणि अद्वैताचाच प्रत्यय येऊ लागतो. इतरांना स्वप्नात गुंतून गेलेलं आपण स्वतः जागे झाल्यावर पाहू शकतो. स्वप्नाचा असाही विचार जगाच्या पाठीवर क्वचितच कुठे झाला असेल.

आपल्या रोजच्या स्वप्नांचा विचार, हा स्वप्नामधल्या स्वप्नांचा म्हणून केला तरी किती वेगळा अनुभव येईल!

अर्थात, स्वप्नातून जागं होणं हे जागेपणाबद्दल दूरुन बोलण्याइतकं सोपं नाहीच; पण असाही विचार करता, न दिसणाऱ्या जादूगाराची जादू पाहात, अंधारातल्या उजेडात हरखून जात, स्वप्नाचे प्रकाश कित्तीतरी अर्थांनी खुणावत राहतात, ते असे!

- पार्थ जोशी