दीन पतित अन्यायी शरण आले विठाबाई....

युवा लेख

युवा विवेक    21-Sep-2023   
Total Views |

दीन पतित अन्यायी शरण आले विठाबाई....

भक्तीचा आधिकार कोणाला असतो ? खरंतर तो कोणाला नसतो ? भेदभावाच्या सीमा ओलांडताच कळतं की प्रत्येक जीवाला असतोच की अधिकार परमेश्वराच्या उपासनेचा. खरंतर एकदा का 'त्या'ला आपलं म्हंटलं की भेदभावाचा प्रश्नच मूळी उरत नाही, तेव्हा खुणावत राहते 'त्या'ची कृपा, 'त्या'चं प्रेम आणि माणूस चालू लागतो 'त्या'च्या वाटा. म्हंटलं तर फार मोठ्या आणि म्हंटलं तर सुखाने भरलेल्या. एका अभंगात संत कान्होपात्रा म्हणतात,

दीन पतित अन्यायी ।

शरण आले विठाबाई ।। १ ।।

समाजाच्या रचनेतून कित्येकदा आपण आपलाच विचार करत असतो. तो प्रभाव खरंतर इतका मोठा असतो की तो बाजूला ठेवणं अनेकदा अवघड होतं. पेशाने वेश्या व्यवसाय असला तरी संत कान्होपात्रांनी विट्ठलभक्तीचा मार्ग स्विकारला. म्हंटलं तर त्यावेळेच्या समाजामधे अशा लोकांना दीन, पतित समजलं जायचं. संत कान्होपात्रा विठ्ठलाला म्हणतात की दीन, पतित, अन्यायी अशी मी तुला शरण आले आहे. जणू त्या विठ्ठलकडे बघतात ते आई म्हणून, आई; जिच्याकडे आहे प्रेम, वात्सल्य, करुणा. डोक्यावर फिरणार्या जिच्या प्रेमाच्या हाताने कमी होतात दु:ख, आतून हलकं वाटतं, अशी ती आई, विठाबाई.... खरंतर जरा वेगळ्या अर्थाने पाहीलं तर हे आपल्यासाठीही लागू होतच की. कितीही मोठमोठ्या गोष्टी आपण आपल्यापाशी बाळगून असलो तरी पुन्हा भेदभावात अडकलेलोच असतो, असे आपण दीनच असतो की.... 'त्या'ला शरण जाणं हाच सुंदर असा उपाय असतो आपल्याकडे.

मी तो आहे यातीहीन ।

न कळे काही आचरण ।। २ ।।

संत कान्होपात्रा पांडुरंगाला सांगतात की मी यातिहिन आहे, काही आचरण; योग्य आचरण मला कळत नाही. किती व्याकुळता जाणवते या शब्दांत.... तसं आपल्यालाही योग्य आचरण कळतंच असं काही नाही. खरंतर आपल्या कमीपणाची खरी कबुली कोणा जाणत्याला देणं हाच केवढा मोठा आचार आहे, महत्वाचं आचरण आहे, मात्र आपण चुकतच नाही, योग्यच असतो असे कित्येक खोटे समज धारण केलेले आपण असतो का यातिहीन ?

मज अधिकार नाही ।

शरण आले विठाबाई ।। ३ ।।

ठाव देई चरणापाशी |

तुझी कान्होपात्रा दासी ।।४।।

मला काहीच अधिकार नाही, मी तुला पूर्णपणे शरण आले आहे असं जनाबाई सांगतात त्यांच्या पांडुरंगाला. जणू इतका मोकळेपणा येतो तो 'त्या'ला आपलं म्हणण्याने. शरणागतीचा भाव संत कान्होपात्रा किती सहज व्यक्त करतात. जणू या ओळी आपल्यासाठीच असल्याचं वाटतं. मला काहीच कळत नाही असं म्हंटलं, आपल्या खोल अज्ञानाची जाणीव झाली की सोप्पं होतं शरण जाणं; मात्र अधिकार नसतानाही उगीच आपल्याला खूप काही माहीत असल्याचा भ्रम बाळगून आपण शारण्यभावापासून दूर राहतो, तेव्हा अधिकार नसल्याची लख्ख जाणीव झाल्यातलं सौंदर्यच जणू दिसू लागतं. जणू शारण्यभावात असतो अभिमान तो 'त्या'ला शरण गेल्याचा, धन्यतेचा....

संत कान्होपात्रा मागतात ठाव तो 'त्या'च्या चरणांपाशी. त्याच्या चरणांशी आपल्याला ठाव मिळणं ही किती मोठी गोष्ट आहे.... ते सुख मिळतं ते जणू दास्यभावातून.... त्यासाठी शरणागती मात्र हवी....

- अनीश जोशी.