गणपती बाप्पा मोरया...

युवा लेख

युवा विवेक    23-Sep-2023   
Total Views |

गणपती बाप्पा मोरया...

गणेशोत्सव हा सर्वांचाच आवडता उत्सव. अर्थात सर्वच सण म्हणजे उत्सवच असतो. पण गणेशोत्सव हा अबालवृध्दांच्या ह्रदयाला आनंद , सौख्य आणि एक प्रकारे समाधान मिळवून देणारा उत्सव आहे. या उत्सवात उत्साहाला, आनंदाला आणि जल्लोषाला पारावार राहत नाही. आता अधुनिक काळात तर हा उत्सव जगभर साजरा केला जातो. म्हणूनच गणेशोत्सवाचे आगळे महत्त्व आहे. कलांचा अधिपती म्हणजे श्रीगणेश.. पहिल्या दिवशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापनापूर्वक पूजा केली जाते. मोदक, लाडू, पेढे, पंचखाद्य असा नाना खाद्यांचा नैवेद्य गणपतीला दाखवतात. घरातले सगळे जण एकत्र येऊन छान मोठ्या आवाजात टाळ, मृदुंग, घंटानाद करत आरती म्हणतात. मूर्ती आणताना गणपतीच्या चेह-यावर असलेलं तेज अजून तेजाळतं.. मग अशावेळी बाप्पाकडे नुसतं बघितलं तरी मन अगदी प्रसन्न होतं..
दहा दिवसांच्या या गणेशोत्सवाची तयारी महिना-दोन महिने आधीच सुरू होते. मूर्तीकार मंडळी तर सहा महिने आधीच तयारीला लागतात. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी सुरू होणा-या या उत्सवाच्या अनेक कथा आणि आख्यायिका आहेत. पार्थिव गणेश पूजन असेच या पूजेचे नाव असते. पार्थिव याचा अर्थ मातीपासून तयार झालेला किंवा मातीचा उपयोग करुन घडविलेला.. शाडू मातीची मूर्ती आणून घरोघरी त्याची पूजा केली जाते. असे असले तरी अलीकडील काळात वेगवेगळ्या धातू आणि पदार्थांपासून मूर्ती तयार केल्या जातात. ते पर्यावरणपूरकच आहे. पण त्यास पर्थिव गणेश पूजन म्हणता येणार नाही. माती हा पृथ्वीवरील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. पंचमहाभूतांचा मातीशी थेट, प्रत्यक्ष संबंध असतो. या पंचमहाभूतांचा स्पर्श झालेली मृदा आणि त्या मृदेपासून म्हणजे मातीपासून घडविलेली गणेशाची मूर्ती म्हणजे पार्थिव गणेश पूजन होय. गणेशोत्सवाची सुरुवात याच पार्थिव गणेशाच्या षोडोशोपचारी पूजेने करावी. हल्ली पौरोहित्य करणा-यांची म्हणजे पुरोहितांची संख्या, कुटुंब आणि घरांची संख्या लक्षात घेता प्रत्येकच घरी पुरोहित पूजेसाठी वेळेत उपलब्ध होईलच असे सांगता येत नाही. पूजा सांगाण्यास पुरोहित म्हणजे गुरुजी मिळाले तर फारच उत्तम.. तथापि, आपण स्वतः पूजा केली तरी चालते. कारण पूजा काय किंवा कोणतेही कार्य काय, आपण ते किती भक्तिभावाने, निष्ठेने आणि मनापासून करत आहोत त्याला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या यथाशक्ती, ज्ञान आणि उपलब्ध होईल ते पूजेचे साहित्य यांच्या आधारे गणेशाचे भक्तीभावाने व उत्साहात पूजन करावे. गणपती बाप्पा नक्की आशीर्वाद देईलच. म्हणूनच तर आपण गणपती बाप्पाला वरदविनायक असेही म्हणतोच की!
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. आपला देश त्यावेळी पारतंत्र्यात होता. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय कार्यक्रम , देशाच्या दृष्टीने चांगले उपक्रम या निमित्ताने आयोजित केले गेले. सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मिरवणूक आणि सुबक अशा गणेशमूर्ती.. ब-याच ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात गणपतीचे वाजत गाजत स्वागत केले जाते. पण अलीकडे मात्र या उत्सवाचे स्वरुप बदललेले दिसते. कर्कश आवाजातील गाणी, उत्सवाशी संबंध नसणारी आणि अश्लीलतेकडे वळणारी श्रृंगारिक गाणी वाजवली जातात. पर्यावरणाला हानी पोचेल असा प्रकाश पडणारे दिवे इत्यादी मुळे रंगत वाढण्याऐवजी उत्सवाचा बेरंग होतो. याचा सार्वजनिक पातळीवर विचार आणि त्या विचाराप्रमाणे कृती करणे हे समाजहितासाठी गरजेचे आहे. तसेच या उत्सवात पोलीस बांधवांना आधीच ताण असल्यामुळे कुठलाही गैरप्रकार करुन आणखी त्यांच्या तणावात वाढ होणार नाही याची अगदी महत्वाची जबाबदारी आपल्यावर निश्चितच आहे. अनेकदा यावरही आक्षेप घेतला जातो, फक्त हिंदू धर्मानेच नियम पाळावे व बाकी धर्मांनी पाळू नयेत काय! तर तसे आजिबातच नाही.. सर्वच धर्मांनी घरगुती आणि सार्वजनिक उत्सव साजरा करत असताना सामाजिक भान ठेवत, पर्यावरणपूरक साजरे केले म्हणजे आपल्याच सर्वांना गणपती बाप्पाचा, सर्व देवदेवतांचा छान आशीर्वाद मिळेल आणि देशाची उत्तरोत्तर प्रगती होईल.
गणेशोत्सव हा दहा दिवस चालणारा उत्सव असल्यामुळे यात सार्वजनिक मंडळांना आवाहन करावेसे वाटते, धार्मिक कार्यक्रमांबरोबरच राष्ट्रीय पातळीवर देशाची प्रगती होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. देशाची प्रगती, देशावरील वर्तमान व भविष्यात येणारी संकटे कशी टाळता येतील, विविध जणांच्या कलागुणांना वाव कसा देता येईल याचे प्रयत्न झाले म्हणजे गणेशोत्सवाची रंगत आणखी वाढेल. कलांचा अधिपती असणा-या श्रीगणेशाचा सर्वांना आशीर्वाद नक्की मिळेल. आपला देश छान घडेल.. घरगुती गणेशोत्सवही पारंपारिक पद्धतीने केला म्हणजे संस्कृतीचेही रक्षण होईल.. आपणा सर्वांनाच या निमित्ताने गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा !
मंगलमूर्ती मोरया...

- गौरव भिडे