जल्लोष..

युवा लेख

युवा विवेक    30-Sep-2023   
Total Views |

जल्लोष..
नुकतीच गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक ठिकठिकाणी पार पडली. बाप्पाला निरोप देताना दु:ख कुणाला होणार नाही ! पण अगदी कुठलीही व्यक्ती आपल्या घरातून बाहेर पडताना आपण हस-या चेह-यानेच त्याला अच्छा करतो. मग गणपती म्हणजे प्रत्यक्ष देवच. त्याला निरोप देताना तो छान हस-या चेह-याने आणि वाजत-गाजत दिला तर गणपती नक्की खुश होईल आणि 'पुढच्या वर्षी लवकर या' हे आपलं म्हणणं किंवा विनंती नक्की मनापासून स्वीकारेल. जल्लोष म्हणजेच वाजत-गाजत काढलेली गणपतीची विसर्जन मिरवणूक.. किंबहुना, जल्लोष हा शब्द विसर्जन मिरवणूकीतूनच आलाय की काय असेच वाटते.

अनंत चतुर्दशीला सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरुवात होते. महाराष्ट्रात आणि देशभरात विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात काढली जाते. पण पुणे शहराचं आणि या विसर्जन मिरवणूकीचं नातं काही वेगळंच आहे. प्रत्येक पुणेकराच्या मनात या मिरवणूकीविषयी एक आदराची भावना असते. पुण्यात मानाचा पहिला गणपती म्हणजे कसबा गणपती.. पालखी आणि ढोल ताशांच्या गजरात कसबा गणपतीची मिरवणूक निघते. त्यानंतर राहिलेल्या चार गणपतींची देखील अशीच पारंपारिक पद्धतीने मिरवणूक निघते. या मिरवणूकांमधे उत्साहाला तोटा नसतो. ढोल , ताशे , लेझीम ही पारंपारिक वाद्ये वाजवली जातात. मल्लखांबासारखे खेळही काही मिरवणूकांमधे आयोजित केले जातात. विविध ढोल पथकांची या मिरवणूकीत चांगली रेलचेल असते. पारंपारिक पोषाखातल्या ढोल वादकांना पाहून मनात एक ऊर्जा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांचे पोषाख सारखेच असल्यामुळे एकतेचा संदेशही त्यातून आपोआपच दिला जातो. टिळक युगापासून सुरु असलेल्या या विसर्जन मिरवणूकीचं आकर्षण सर्वांनाच असतं..

मुंबई सारख्या शहरात तर खास आकर्षण असतं ते उंचच उंच मूर्तींचं.. मूर्ती रथात मावेल अशा पद्धतीने रथ निवडून तो रथ सुरेख सजवला जातो.. पुष्पवर्षाव हे तर खास आकर्षण असतं.. या पुष्पवर्षावाच्या वेळी होणारा जल्लोष उत्साह वाढवणारा असतो. समुद्रात या मूर्तींचं पारंपारिक पद्धतीने विसर्जन केलं जातं. कोल्हापूर , सांगली सारख्या शहरात तर पारंपारिक खेळ , फुगड्या असतात. ढोल ताशांच्या गजरात या सा-या खेळांना अजूनच उधाण येतं.. गणपती बाप्पा तर नक्की सुखावत असणार.. मराठवाडा , विदर्भ इथे देखील उत्साहाचं वातावरण असतं. कोकणात तर गणेशोत्सव हा महत्वाचा सण आहे. वेगवेगळ्या गावात विसर्जनाची परंपरा , पद्धत वेगळी असते. महाराष्ट्रात तर जल्लोष असतोच पण महाराष्ट्राबाहेरही सर्व राज्यात ही विसर्जन मिरवणूक असते. अलीकडच्या काळात तर परदेशातही ढोल ताशांच्या गजरात उत्साहाने बाप्पाला निरोप दिला जातो. त्यामुळे या विसर्जन मिरवणूकीला जशी एक परंपरा आहे तशीच या जल्लोषाची देखील एक परंपरा आहे , असेच म्हणावे लागेल..

काळ जसजसा पुढे जातोय तसतसं या जल्लोषाला वेगळं रुप आलंय. ढोल तासांत रमणारे आता डीजेच्या तालावर नृत्य करत आहेत. गाण्यांचा मूळ ताल बदलून त्याला वेगळे स्वरुप दिले जाते.. पण त्यामुळे मूळ तालात गाणी ऐकू न आल्याने मनाचे समाधान होत नाही. आपल्याला पाहून लाज वाटावी असे विविध अंगविक्षेप केले जातात. आपल्या समोर बाप्पाची मनोहर मूर्ती असून त्यासमोर आपण काय करीत आहोत याचे भानही राहत नाही. तेव्हा मात्र फार वाईट वाटतं. डीजे या मिरवणूकीत जरी सहभागी करून घेतला तरी त्यावर कोणत्या प्रकारची गाणी वाजवली जातात , हे देखील पाहणे महत्वाचे आहे. गणपतीला आवडतील , वातावरणात पावित्र्य राहिल आणि उत्साह दाटून येईल अशी गाणी लावणे अपेक्षित असते. पण आपल्याला आवडतील , वातावरणात पावित्र्य राहण्याऐवजी आपलं मंडळ कसं मोठं इत्यादी चुकीचे विचार त्यामागे केल्यामुळे विसर्जन मिरवणूकीस अर्थ उरत नाही. गणपती हा कधीच मोठाही नाही आणि लहानही नाही.. एकवेळ त्याची मूर्ती काही ठिकाणी लहान असेल तर काही ठिकाणी मोठी असेल.. पण त्याचे अस्तित्व मात्र सगळीकडे सारखेच आहे.. त्यामुळे विसर्जन मिरवणूकीत माझा गणपती मोठा किंवा आम्ही अमुक एक डीजे मागवला त्यामुळे आमचं मंडळ कसं मोठं या स्पर्धेला काहीही अर्थ नाही. ही जबाबदारी सरकारची आहे का पोलीसांची हा कदाचित चर्चेचा विषय होईल.. पण घराघरातून प्रत्येक पालकानी आपल्या पाल्याला विसर्जन मिरवणूकीतील पारंपारिकता म्हणजे काय , उत्साह आणि पावित्र्य या शब्दांचा गणेशोत्सवाप्रती असलेला नेमका अर्थ काय याबाबत माहिती दिली पाहिजे. दरवर्षी तीन-चार जणांचे मृत्यू डीजेच्या दणदणाटामुळे होतात , हे आपण वृत्तपत्रात वाचतो. माझ्या विसर्जन मिरवणूकीत अत्यंत मोठ्या आवाजात गाणी लावून दोन-चार जणांना तरी मृत्यू आला पाहिजे , असे कधीही आपणास गणपतीने सांगितलेले नाही. एकमेकांना साथ देत , सांभाळून घेत पुढे गेलं तर असे प्रकार होणारच नाहीत. त्यामुळे आपल्याला गणपतीचे आशीर्वाद हवे असतील तर वर्तनातील काही पथ्ये आपण पाळलीच पाहिजेत.

आपल्याला उत्साह आणि जल्लोष कायम राखायचा आहे. गणपतीने पुढच्या वर्षी लवकर यावे असेच आपल्या सर्वांना वाटत असते.. त्यामुळे या विसर्जन मिरवणूकीत एकमेकांना त्रास देण्यापेक्षा एकमेकांना साथ देत पुढे गेलं तर उत्साह वाटेल.. आणि एकच जल्लोष विसर्जन मिरवणूकीचा असेल..

- गौरव भिडे