चाहूल येता ओळखीची ती...

प्रेम , प्रीती , प्रीत , अनुराग यासारख्या शब्दांचे अर्थ उमगू लागतात , सारे अर्थ ओळखीचे वाटू लागतात तेव्हा मनातल्या भावभावनांना मूर्त स्वरुप आलंय असं वाटू लागतं

युवा विवेक    20-Jan-2024   
Total Views |
 
चाहूल येता ओळखीची ती...
चाहूल येता ओळखीची ती...

प्रेम , प्रीती , प्रीत , अनुराग यासारख्या शब्दांचे अर्थ उमगू लागतात , सारे अर्थ ओळखीचे वाटू लागतात तेव्हा मनातल्या भावभावनांना मूर्त स्वरुप आलंय असं वाटू लागतं. हे सारं होतं तेव्हा कुणीतरी कुणालातरी आवडलेलं असतं.. होकाराची फुलं फुलतात नि डोळे 'यंदा कर्तव्य आहे ' हे सांगू लागतात. सध्या लग्नसराई अगदी जोरात सुरू आहे. वरातीचे आवाज ऐकू येतात. नववधू आणि नववराचं थाटात स्वागत होतंय. सारा उत्साह लग्नघरी संचारलेला असतो. या उत्साहानेच घराला उत्सवाचं स्वरुप येतं. मांगल्याचा जणू वर्षाव होतो. लग्नाची सुरुवात होते ती ओळखीने. ओळख हा एका अर्थाने अतिशय नाविन्यपूर्ण शब्द आहे. वधू-वरांची आधी ओळख होते. मग बैठका , पसंती , साखरपुडा , लग्न या क्रमाने सारं काही पार पाडतं. ओळख ते लग्न या प्रवासात सहवास वाढतो. माणूस आपलसं वाटायला लागतं. ही चाहूल ओळखीची होती. मनात शब्दांचं काहूर माजतं. पण बेटा एकही शब्द ओठावर यायला तयार नसतो.. या ओळखीच्या चाहूलीने मन अगदी बावरतं..

वधू-वरांनी एकमेकांना होकार दिला की गाठ बांधल्याची ती खूण असते. स्वप्नांच्या आभाळात मनाच्या चांदण्या बहरतात. त्या चांदण्यांच्या शीतल प्रकाशाचे वेध एकमेकांना लागतात. सहवास हवाहवासा वाटू लागतो. क्षणही साहवत नाही. सासरचे वेध लागलेले असताना असताना वधूच्या मनात एकीकडे माहेरचं सारं काही साठून येतं. त्या मनाच्या अवस्थेचं वर्णन शब्दात करताच येत नाही. माहेरहून काय काय आठवणी , कोणकोणत्या ओळखीच्या खुणा घेऊन जाव्यात काही काही उमगत नाही. अशातच एका नव्या जगाची चाहूल हळूहळू ओळखीची वाटायला लागते. हजारदा यापूर्वी आरशात पाहिलेलं असतं. पण लग्न ठरल्यानंतरचं दर्पणात पाहणं प्रत्येक वेळी नवं असतं. श्रृंगाराची ती हवीहवीशी सुरुवात असते. चेहरा झाकला तरी लाजण्याचा बहर थांबत नाही. लग्नाची तारीख जवळ येऊ लागते तसा श्रृंगार आकार घेऊ लागतो. तो श्रृंगार नववराच्या नेत्रांना पहावासा वाटायला लागतो. अनुराग पुन्हा पुन्हा ओठावर येऊ पाहतो. मांगल्याची हळद लावली जाते. तेव्हा वराच्या चेह-यावर तजेला येतो तो त्या चाहूलीतून.. नववधूच्या हातावर मेंदी काढली जाते.. मेंदी हळूहळू रंगते तेव्हा नववधूला बावरण्याचं वरदान लाभतं.

मांडव सजतो. रांगोळी काढली जाते. रुखवताची मांडणी होते. अक्षता तयार होतात. करवली , वधूपिता , स्वागताला औक्षण करणा-या सवाष्णी यांची लगबग सुरू होते. नववधू आणि वराच्या कायेवर श्रृंगाराचं सुरेख शिंपण होतं. मनात नवनव्या चाहूली फेर धरतात. लगीनघाई सुरू होते. मंगलाष्टकांचे सूर कानी घुमू लागतात. आनंदाला पारावार उरत नाही . लग्न लागतं. सनई-चौघडे वाजतात. डोक्यावर आशीर्वादाच्या अक्षता पडतात. सप्तपदीत वचनांची देवाण-घेवाण होते. तेव्हा होणारा अलगद स्पर्श मनाला साद घालू लागतो. वधू-वरांची पंगत बसते. नाना पदार्थांची रेलचेल पानात होते. उखाणे घेऊन एकमेकांना भरवलेले पक्वान्नांचे घास अधिकच गोड वाटतात. पाठवणीची वेळ येते तेव्हा वधूपित्याचं मन कृतकृत्य होऊन नयनातून बाहेर येऊ पाहतं. वधूही आपल्या माता-पित्यांना आसू आणि हसू या दोन भावनांनी आलिंगन देते. बराच वेळ वधूपिता त्या पाठमो-या गाडीकडे पाहतो. वधू काचेतून आपल्या पित्याला हात दाखवते.

वराच्या घरी वधूचं छान स्वागत होतं. सारेजण पुन्हा पुन्हा उखाणा घ्यायला सांगतात. गृहप्रवेश होतो. परंपरांनुसार तांदूळाच्या अक्षतांवर नाव लिहिणे , सत्यनारायण पूजा , कुलदेवतांचं , ग्रामदेवतांचं दर्शन व ओटी भरणे , जागरण-गोंधळ इत्यादी शुभकार्ये पार पडतात. लाजाळूच्या पानांसारखी नवी नवरी नव-याचं नाव घेता लाजते. त्या नवरीला पुन्हा पुन्हा पहावंसं नव-याला वाटत असतं. नववधू सासर आपलंसं करण्याचा वराच्या सहवासात प्रयत्न करते. कधी ती घाबरते कधी बावरते. त्या क्षणी लताबाईंनी गायलेलं 'नववधू प्रिया मी बावरते..' हे गीत प्रत्यक्षात उतरतं. बावरणारी नववधू नव-याच्या साथीने सा-या घराची ओळख करून घेत असते. नव-यालाही तिच्याबरोबर आपल्या घराची नव्याने ओळख होते. मधुचंद्राच्या चाहूलीने पुन्हा लाजणं नि बावरणं सुरू होतं. एकमेकांच्या मनातल्या शीतल चांदण्यात न्हाताना एकमेकांच्या स्पर्शाची ऊब जाणवते. एकमेकांना साद घालणारं सारं काही एकमेकांना प्रतिसाद देतं. अनुराग , प्रिती , सहवास वगैरे ओळखीचे वाटू लागलेले शब्द आता सार्थ वाटू लागतं. मन, शरीर यात अंतर राहत नाही. सारं सारं एकरुप होतं. साता जन्माचं नातं साकार झाल्यासारखं भासतं. त्या ओळखीच्या चाहूलीतून इतकं सगळं घडून येतं आणि आशाबाईंनी गायलेल्या गीताच्या ओळी आठवू लागतात ...

चाहूल येता ओळखीची ती ,
बावरल्यापरी मी एकांती
धुंद जीवाला डोळ्यांपुढती
नव्या नवतीचे स्वप्न दिसे..