नृत्यांगणा मृणालिनी साराभाई

माणसाला नृत्य आणि गायन आवडतं ते फक्त मनोरंजनासाठी नाही तर सुखाच्या स्फटिक स्वच्छ रूपाची अनुभूती घेण्यासाठी.

युवा विवेक    04-Jan-2024   
Total Views |
 
नृत्यांगणा मृणालिनी साराभाई
नृत्यांगणा मृणालिनी साराभाई
कला ही माणसाच्या आवडीची गोष्ट आहे, ती फार पूर्वीच्या काळापासून. माणसाला नृत्य आणि गायन आवडतं ते फक्त मनोरंजनासाठी नाही तर सुखाच्या स्फटिक स्वच्छ रूपाची अनुभूती घेण्यासाठी. जेव्हा संगीत किंवा नृत्य हे एक अनोखं, विलोभनीय रूप घेतं तेव्हा त्या सुखाच्या साधनाला आपण शास्त्रीय संगीत किंवा नृत्य असं नाव देतो. अशा या शास्त्रीय नृत्याच्या क्षेत्रात भरभरून काम करणाऱ्या, या क्षेत्राला एका उंचीवर घेऊन जाणाऱ्या नृत्यांगणा म्हणजे मृणालिनी साराभाई.
११ जानेवारी १९१८ मधे केरळ येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बॅरीस्टर तर आई स्वातंत्र्यसैनिक होती. त्या वयाच्या अगदी पाचव्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला लागल्या. कलेशी त्यांचं नातं जोडलं गेलं ते इतक्या कोवळ्या वयात, संस्कार झाले ते नृत्याचे जणू पुढे होणाऱ्या अपार कार्यासाठी. पुढे त्यांनी मीनाक्षी सुंदरम पिलै यांच्याकडून भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले, त्याकाळी कुंचू कुरूप यांच्याकडून त्यांनी कथकलीचे शिक्षण घेतले आणि कल्याणीकुट्टी अम्मन यांच्याकडून त्या मोहिनीअट्टम शिकल्या. उल्लेखनीय गोष्ट अशी की त्या टागोरांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनिकेतन येथेही शिकल्या आहेत. त्यांनी वयाच्या १२-१३व्या वर्षी स्विझरलँड येथे बॅले नृत्यप्रकाराचे धडे गिरवले होते. विविध प्रकारच्या नृत्यांचा अभ्यास हा त्यांच्या नृत्यनाट्यांत दिसतो आणि प्रेक्षकवर्गामधे सुखाचे वारे वाहू लागतात.
मृणालिनी साराभाई यांनी प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्याशी विवाह केला. हा विवाह एका शास्त्रज्ञाचा एका कलेच्या अंगणात वावरणाऱ्या नृत्यांगणेशी होता, म्हणून तो जणुकाही 'शास्त्र आणि कलेचा संसार' आहे असं म्हंटलं जातं. त्यांनी एकदा पॅरिसमधे नृत्य सादर केलं, नंतर त्यांना जगभरात सादर करण्यासाठी बोलावण्यात आलं. त्यांना फ्रेंच सरकारने 'अभिलेखागार इंटरनेशनल डे ला डांसे' हा डिप्लोमा आणि पदक प्रदान केलं होतं. पुढे विक्रम साराभाई यांनी 'दर्पण नृत्य अकादमी' स्थापित केली ती १९४८ मधे, तिथे त्या नृत्याचं प्रशिक्षण देत असत. मृणालिनी साराभाईंना 'आम्मा' असं म्हणत असत. १९६३ पासून मृणालिनी साराभाई यांनी पारंपरिक नृत्यशैलींची अभिजात परीभाषा तशीच राखून नृत्यनाट्य बसवायला सुरूवात केली. ही एक वेगळी आणि सौंदर्यपूर्ण कल्पना होती. आत्तापर्यंत १८००० हुन अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या अकादमीतुन भरतनाट्यम आणि कथकलीमधे पदवी घेतली आहे. १९७७ मधे त्यांनी आपली कन्या मल्लिका साराभाई यांच्या हाती दर्पणची सगळी सूत्र सोपावली. त्यांनी दर्पणचे काम वाढवले, तिथे 'नटराणी' हे वर्तुळाकार प्रेक्षागार उभारले आणि मुख्य म्हणजे आम्मा त्यात सहभागी होतील अशी काळजी घेतली. त्यांना पद्मभूषण, पद्मविभुषण, संगीत नाटकाची फेलोशीप असे अनेक सन्मान मिळाले आहेत.
वयाच्या नव्वदीतही आम्मा नृत्याच्या आविष्कारांबद्दल सजग होत्या. कलेला वाहिलेलं असच त्यांचं जीवन होतं. अशा या श्रेष्ठ उपसिकेला सादर वंदन.
~ अनीश जोशी.