प्रार्थना

कवितेच्या शेवटल्या ओळी म्हणजे प्रार्थनेचा परमोत्कर्षच वाटतात.

युवा विवेक    06-Jan-2024   
Total Views |
 
प्रार्थना
प्रार्थना
जर तुम्हाला शब्दांच्या संमोहनाचा सजीव प्रत्यय पाहण्याची आकांक्षा असेल तर त्याला अरुणा ढेरेंच्या कवितेशिवाय पर्याय खचितच नसतो! त्यांची मोरपंखी शब्दकळा वाचकाला हरखून टाकते! त्यांच्याच शब्दात सांगायचं, तर त्याची 'शहाणीव' समृद्ध होत जाते आणि काहितरी जाणवल्याचा आनंद आतमधे तरंगत राहतो. एकूणच, त्यांच्या कवितेतली तरलता अफाट आहे! शब्दांचं संमोहन म्हटलं तरी त्यांची कविता केवळ शब्दसौष्ठवावर बेतलेली नाही. तिच्या अंतरंगातील ओला आशय कवितेत घडवताना शब्द तितकेच लावण्य घेऊ लागतातच पण तिथेच न थांबता त्यांच्या अचूक प्रयोजनानं, आणि कवितेच्या या घडवलेल्या नितांतसुंदर वाटेनं वाचक आपसुकच त्यांच्या अस्सल कवितेच्या सरोवराकडे आकर्षित होऊन त्यामधे उतरत जातो. त्यात यथाशक्ती चिंब होत जातो. कविता दर्शन देत राहते!!
त्यांच्या एकूणच कवितेबद्दल, काव्यशैलीबद्दल आपल्या अल्पमतिने बोलू तितके थोडेच.. पण आता अरुणा ढेरे यांच्या कवितेकडे वळताना, त्यांचीच ही प्रार्थना अनुभवूयात..
पानाच्या टोकावार ओथंबलेल्या टोकापर्यंत जावो मुळाची हाक
प्रतिसाद ओलावत जावो शिरेशिरेतून आभाळनिळा
रे गोपाळा वळोत माझ्या इतस्ततः धावणा-या संवेदना
तुझ्या गोविंदस्वराच्या संमोहित दिशेने
ही प्रार्थनेची सुरुवात पाहूनच शब्दांचं संमोहन म्हणजे नेमकं काय असावं हे संवेदनशील रसिकाला अनुभवातून कळून जातंच यात शंका नाही. निसर्गातील या उत्कट प्रतिमा कधी सांकेतिकही वाटतात! हे झाड म्हणजे आयुष्यच वाटतं कधी कधी! 'आभाळनिळा' या शब्दात जणू क्षणभर विरघळून जाते जाणीव! निळाईची अपूर्वाई आपल्याच आत ओथंबत जाते सजगपणे. 'मुळाची हाक' याबद्दल काय बोलावं?? प्रत्येकाला एक नवी जाणीव देणारा हा शब्द नव्हे तर अनुभव वाटतो. इतकी आर्तमधूर आणि अर्थमधूर प्रार्थना पुढे वळते ती गोपाळाकडे!! जाणवतं, की इथे काय मागितलंय गोपाळाकडे? मागितलंय ते राधा होणंच!! कारण, 'रा' म्हणजे इंद्रियं आणि 'धा' म्हणजे धावन्ति म्हणजे सगळीच इंद्रियं ज्याच्याकडे धावतात अशी ती, म्हणजे राधाच तर असते! त्यामुळे मागितलं आहे ते 'राधेपण'च!! त्या मुरलीमनोहराची दिशाही संमोहित.. आणि तशीच ही कविताही!
फुटोत पारंब्या स्वराला शब्दाला फुटोत आस्थेची पाने
विष्णुकांत असोत सावल्या हृदयावर हलणा-या
मौनाने बहरुन येवोत इच्छा शब्दामधून निसटणा-या
असो मेंदूत चिखल विश्वाच्या आधीचा
गढूळपणा असो शुद्धाशुद्धतेच्या पूर्वीचा
स्वरांना पारंब्या फुटणं किती गरजेचं आहे! वाटतं, की त्या पारंब्यांवर आपलं आयुष्य किमान काही क्षण बहाल करुन, एकाच वेळी जाता येईल आपल्याला दिगंतराच्या व्यापक आकाशात, आणि केवळ आकाशातच न राहता पाहतही येईल खोलवर, पानांवर ज्याचं प्रतिबिंब असतं, ती मुळातील हिरवाई! हृदयावर हलणार्या सावल्या साक्षात विष्णुकांत असल्या की शब्दांना आस्थेची पानं फुटतात वाटतं आपसुकच! याचे प्रत्यय घ्यायला ही कविताही पुरेशीच वाटते. किती निसटत जातं शब्दामधून! त्याच्या साच्यात मावत नाही जीवाचं पसायदान.. पण म्हणून कुठे थांबवायचे असतात आपले लेखनप्रयास? त्या शब्दाकृतीही इतक्या सुबक घडाव्यात, की मौनाने अशब्द जाणिवाही त्यासोबत बहरुन येतील.. सहप्रवासी होऊन!! काही उच्चकोटीच्या साधकांभवती जसं तेजोवलय असतं, तसंच काही कवितांनाही असतं मौनाचं तेजस्वी वलय..! शब्द विरुन गेले तरी आत अखंड हलत राहणारं वलय. विश्वाच्या आधीचा चिखल आणि शुद्धाशुद्धतेच्या पूर्वीचा गढूळपणा ही सृजनाची फार मोठी, उबदार उमेदी मातीच तर आहे! तो 'निळा पारदर्शक अंधार' आहे! गर्भाला वेढून-व्यापून असलेला.. विश्वाला कवेत घेऊन असलेला! त्याच्याच पोटात उगवतात संजीवक श्वास.. माणसाचे, किंबहुना कुठल्याही कल्याणकारक ऊर्मीचे, आणि म्हणूनच कवितेचेही! तोच चिखल मागितला आहे मेंदूत. आनाद्यंत!
प्रेमाची तहान असो गळ्यात आणि डोळ्यांत पाऊस
हृदयाला हृदय भेटो संवादाकरता
आत्मा मागत फिरणा-या भणंग निराधार अर्थांनाही
आपले म्हणून जवळ घेवो माझी कविता
गळ्यामधे अखंड तृप्ती मागणं किती सोपं आहे! पण इथे मागितली आहे ती एक संजीवक तहान, प्रेमाची! म्हणूनच मागितली आहे तहानेला असलेली तृप्तीची अनिवार्य ओढ. थेट तृप्ती नव्हे! डोळ्यांत का बरं मागितला असावा पाऊस? ते मोकळं होणं असावं कदाचित, काहितरी जागं ठेवणं असावं, किंवा काहीही.. हृदयाचा ह्रदयाशी संवाद मागितला आहे, त्या तहानेतूनच तो बहरत राहील पुन्हा पुन्हा.. अभिनवपणे. कवितेच्या शेवटल्या ओळी म्हणजे प्रार्थनेचा परमोत्कर्षच वाटतात. त्याबद्दल फार लिहावं असं वाटत नाही. पण, ते मागणं वारंवार करण्याची इच्छा अनिवार होत जाते.. कवितेने आपलं म्हणून जवळ घेण्यातली एक स्नेहाळ ऊब लोभस वाटत राहते. जणू प्रत्येक कलाकारासाठी ही उत्कट प्रार्थना म्हणजे 'मुळाची हाक'च तर होते!
ही इतकी सुमधूर प्रार्थना डॉ. अरुणा ढेरे यांनी लिहिली असली, तरी त्याची फलश्रुती त्यांच्या कवितांत आणि एकूण साहित्यात जागोजागी प्रकट होत राहते. अध्यात्मातल्या एखाद्या अधिकारी व्यक्तिने सामान्यांसाठी प्रार्थना करुन द्यावी तशीच आपल्यासाठी त्यांनी घडवलेली ही प्रार्थना वाटते. संकुचिताच्या सा-या सीमा ओलांडून केलेली ही प्रार्थना, शब्दांचीही कुंपणं ओलांडते. मुळाची हाक आत खोलवर जागी होत राहते, पुन्हा पुन्हा..
~ पार्थ जोशी