संकल्पाची ऐशीतैशी..

संकल्प म्हणजे , संकल्प म्हणजे संकल्प असतात , तुमचे आणि आमचे अगदी सेम असतात ..

युवा विवेक    06-Jan-2024   
Total Views |

संकल्पाची ऐशीतैशी..
संकल्पाची ऐशीतैशी..

   नुकतंच नवीन वर्ष सुरू झालं. या नववर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा. मराठी नववर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. इंग्रजी वर्ष एक जानेवारीला सुरू होतं. इंग्रजी असो की मराठी पण नवीन वर्ष म्हटलं की नाविन्याचा उत्सव असतोच. या नव्या उत्सवातून नवा उत्साह निर्माण होतो. या नव्याची चाहूल डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लागते. झालेल्या चुकांची माफी मागून , दु:खाचे प्रसंग आपण विसरतो. वर्षभरातले सौख्याचे , सन्मानाचे क्षण आपण मनात जपून ठेवतो. ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड असं म्हणत सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत आपण करतो. खरंतर हा नवा उत्साह , सारं नवकोरं आपल्याला का वाटतं सांगू ? आपण चुकांची माफी मागतो नि वाईट गोष्टी विसरतो म्हणून ! असं प्रत्येक रात्री आपल्याला विसरता आलं तर प्रत्येक सकाळ आपल्याला ख-या अर्थाने नवीकोरीच वाटेल.

   नव्याचा स्वीकार आपल्याला आनंद देत असतो. या नव्या उत्साहाने आपण कितीतरी गोष्टी करत असतो. त्यात संकल्प ही गोष्ट आघाडीची म्हणता येईल. या संकल्पांचं तर काही विचारुच नका ! नाविन्य शिंपलेल्या मनातून संकल्पाचं फूल उमलतं. जणू एकेका संकल्पाच्या फुलातून अवघा बगीचा फुलतो. कित्येक जण किती निरनिराळे संकल्प करतात. व्यायाम या संकल्पाला तोड नाही. व्यायाम नावाच्या संकल्पाचा रोल नंबर दरवर्षी पहिलाच असतो. वजन कमी करणे आणि वजन वाढवणे हे या संकल्पाचे दोन सख्खे भाऊ आहेत. कांजीवरम , पैठणी , बनारसी वगैरे साड्यांचे प्रकार असतात. तसे या संकल्पाचे रोज दोन तास , रोज एक तास पासून निदान पाच मिनिटे तरी मी व्यायाम नक्कीच करीन असे निरनिराळे 'कालवार' प्रकार असतात. पहिल्या दिवशी सकाळी , खरंतर पहाटे उठून व्यायामशाळेत रांग लावून काही जण उभे असतात. घाम निथळेपर्यंत व्यायाम करतात. चला , संकल्पाची सुरूवात तर छान झाली , असं म्हणतात. मग चार पाच दिवस झाले की व्यायामशाळा कशाला हवी , घरीसुद्धा छान व्यायाम होतो , असं म्हणत घरीच संकल्पपूर्ती सुरू होते. पुढे एक दिवसाआड , मग दोन दिवसाआड असं करत दोन-तीन महिन्याआड सुद्धा ही संकल्पपूर्ती सुरू असते. ऐशी व्यायामाच्या संकल्पाची पूर्तता तैशी होते !

   काही जण 'रागवणार नाही , चिडणार नाही ' असा संकल्प करतात. हा देखील पहिल्या दहा रोल नंबरपैकी एक संकल्प आहे. पहिल्या दिवशी या संकल्पाला उधाण येतं. घरी , रस्त्यावर , ऑफिसात सगळीकडे न रागावता व्यवहार चालतो. वागण्या-बोलण्यात गोडवा असतो. मृदू , सौम्य वगैरे शब्दांचा आपण पुरेपूर फायदा घेतो. या संकल्पाला आयुष्य तसं कमीच ! दोन-चार दिवस किंवा फारतर एखादा सप्ताह.. नवीन लग्न झालेली बायको माहेरी गेली की नव-याला क्षण देखील युगासारखा भासतो. तसंच हा सप्ताह वर्षभरासारखाच भासतो. आपल्याला चिडायचं नसतंच.. पण समोरची व्यक्ती हो ! ती आपल्याला चिडायला भाग पाडते. नाहीतर तसं संकल्प उगाचच कशाला कोणी मोडेल , नाही का ! असो , तर ह्या संकल्पाची अशी ऐशीतैशी होते. पुस्तक वाचणे हा पाचव्या-सहाव्या रोल नंबरवर स्थान मिळालेला संकल्प आहे. पुस्तके वाचणे हा त्यातल्या त्यात बरा संकल्प असतो. सुरूवातीला आपल्या आवडत्या लेखकांची किंवा आकाराने छोटी असलेली पुस्तके वाचण्यापासून संकल्पपूर्तीस सुरूवात होते. या संकल्पाचे आयुष्य चांगले दोन-चार महिन्यांपर्यंत असू शकते. पोहायला जाणे हा देखील पहिल्या दहा रोल नंबरातील एक संकल्प आहे. व्यायामाप्रमाणेच पोहण्याचे फायदे आपण कुठेतरी वाचलेले असतात. त्या वाचनातूनच या संकल्पाचा जन्म होतो. एक जानेवारीला आपल्याला बघायला इतकी गर्दी होतेय हे बघून प्रत्यक्ष जलतरण तलावाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ! ह्या संकल्पाचं आयुष्य निश्चितपणे सांगता येत नाही. पण याचीही तशी ऐशीतैशीच होते. पहिल्या दहा रोल नंबरनंतरचे सगळे संकल्प साधारण सारखेच असतात. कुणी निरनिराळ्या वस्तू जमवण्याचा संकल्प करतं. जुनी नाणी , बसची तिकीटे रंगीबेरंगी डब्या इत्यादी अनेक छोट्या-मोठ्या वस्तू जमवण्याचा संकल्प करतात. कुणी सायकल शिकणे , गाडी शिकण्याचा संकल्प करतात. नवीन तंत्रज्ञान शिकणे , नवीन पदार्थ शिकणे व नवीन पदार्थ खाणे , नवनवीन गोष्टी शिकणे इत्यादी बरेच वेगवेगळे संकल्प असतात.

   काही संकल्प वर्षभर टिकत असतील तर त्यांना नक्की शुभेच्छा आहेतच. तुम्हा सर्वांनाही या वर्षीच्या सर्व संकल्पांसाठी शुभेच्छा ! 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं , तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं ' अशी पाडगावकरांची प्रसिद्ध कविता आहे. त्यांच्या या कल्पनेचीच एक मनापासून गोडशी चोरी करतो आणि म्हणतो ,
संकल्प म्हणजे , संकल्प म्हणजे संकल्प असतात ,
तुमचे आणि आमचे अगदी सेम असतात ..

- गौरव भिडे
पुणे
०६ जानेवारी २०२४