देवाविणें नाही रिते....

ज्यांच्या अभंगांमधे अखंड भक्तीचा अनुपम गोडवा भरलेला आहे, ज्यांच्या अभंगामधे कर्माचा भक्तिशी आणि भक्तीचा कर्माशी सुंदर समन्वय साधलेला आहे अशा स्त्री संत म्हणजे संत जनाबाई.

युवा विवेक    16-Feb-2024   
Total Views |
 
देवाविणें नाही रिते....
देवाविणें नाही रिते....
ज्यांच्या अभंगांमधे अखंड भक्तीचा अनुपम गोडवा भरलेला आहे, ज्यांच्या अभंगामधे कर्माचा भक्तिशी आणि भक्तीचा कर्माशी सुंदर समन्वय साधलेला आहे. अशा स्त्री संत म्हणजे संत जनाबाई. जनाबाईंचा जन्म महाराष्ट्रातल्या गंगाखेडमधे झाला तो साधारण इ.स. १२५८ मधे. त्यांचे वडील दामाशेठ आणि आई करुंड. त्या लहान असतानाच त्यांच्या वडीलांनी त्यांना नामदेव महाराजांच्या घरी पाठवलं. एकुणच जनाबाईंच्या अभंगांमधून त्यांच्या मनामधे नामदेव महाराज आणि पांडुरंगाविषयी असलेली नि:सीम भक्ती पहायला मिळते. पांडुरंगाच्या भक्तीत अविरत न्हाणाऱ्या अशा नामदेव महाराजांच्या घरात जनाबाई काम करायच्या तशा रहायच्याही. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. त्यांनी नेहेमीच स्वत:ला 'नामयाचि जनी' असं संबोधलं आहे. आपलं अस्तित्व, त्याचं अधिष्ठान आणि आधरही आपले सद्गुरू आहेत हे मानणं आणि मोठ्या कौतुकाने सांगणं ही वाचकालाही कृतार्थ करणारी गोष्ट म्हणता येईल....
जनाबाईंच्या अभंगांतून जसं त्यांचं दु:ख आणि त्यांना विट्ठलाने दिलेला आधार येतो तसा आत्मानुभवही दिसतो. एका अभंगात त्या म्हणतात -
देव खातें देव पितें । देवावरी मी निजतें ।।१।।
किती वेगळी अनुभूती आहे ही.... देव खाते, देव पिते, त्याच्यावरच निजते असं त्या अगदी सहजतेने म्हणतात.... पहायला गेलं तर 'अन्न हे पूर्णब्रम्ह....' असं आपण म्हणतो, खरंतर नुसतं म्हणतोच कारण त्याला अनुभूतीची जोड नसते. तसा तो परमेश्वर सगळीकडेच भरलेला आहे मात्र तो आपल्यासारख्या अज्ञानात सुख मानणार्यांना कसा दिसणार.... ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात, 'विट्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला....' ह्या शब्दांचा खरा अर्थ जेव्हा अनुभूतीच्या पातळीवर उतरतो तेव्हा चराचरी त्याचाच अंश भरुन उरलेला दिसू लागतो, तेव्हा अन्न, जल, शेज असं कशाचच वेगळं अस्तित्व ते काय उरणार.... जणू याचं गमक सांगत त्या एका वेगळ्या अभंगात म्हणतात,
जोड झाली रे शिवासी प्रांत फिटली जिवाची ।।
शिवाची जोड झाल्यावर, जीवाचा वेगळा प्रांत कसा काय उरणार....
देव देतें देव घेतें । देवासर्वे व्यवहारितें ||२||
सामान्यपणे काहीतरी घेणं आणि त्याच्या बदल्यात काहीतरी देणं याला आपण व्यवहार म्हणतो. असा हा व्यवहार त्यांच्यासाठी देव देणारा आणि देव घेणाराच असणार.... त्यांचे अभंग पाहीले तर लक्षात येतं की हा व्यवहार फक्त अलौकिकाचा नाही तर लौकिकाच्या पातळीवर सामन्यांना भुरळ घालेल असा होता. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर, 'एके दिवशीं न्हावयास । पाणी नव्हतें विसणास ॥१॥
देव धांवोनियां आले । शीतळ उदक घे घे बोले ॥२॥' विसणासाठी त्यांच्याकडे पाणी नव्हतं म्हणून स्वत: देव आले ते शीतल पाणी घेऊन, ईथे 'घे' या शब्दाची पुनरावृत्ती विट्ठलाची त्यांच्याप्रति असलेली कृपेची, भक्ताच्या देवाने केलेल्या कौतुकाची भावना दाखवते असं म्हणता येईल. एका अभंगात त्या म्हणतात, 'देव हातें बुचडा सोडी । उवा मारीतसे तांतडी ॥ केश विंचरुनी मोकळे केले । जनी ह्मणे निर्मळ झालें ॥' ईथे देव भक्तांसाठी निरातिशय साधी कामं देखील किती सहजी करतो हे दिसून येतंच पण त्याचबरोबर भक्तांचे त्रिताप हरुन आपल्या स्पर्शाने निर्मळ करतो, भक्तीच्या वाटेवर चालायला बळ देतो असाही अर्थ लावायला वाव असल्याचं दिसून येतं.... अर्थात, जनाबाईंनी परमार्थासाठी प्रपंच सोडला नाही किंवा प्रपंचासाठी परमार्थ सोडला नाही तर या दोहोंचा इतका उत्तम मेळ साधला की पांडुरंगाला त्यांच्या हाकेला धावून यावं लागलं हे लक्षात घ्यायला हवं.
देव येथें देव तेथें। देवाविणें नाहीं रितें ॥३॥
जनी म्हणे विठाबाई भरूनि उरलें अंतरबाहीं ॥४॥
ही जणूकाही त्यांची अनूभुतीच त्या सांगत आहेत. जिथे बघावं तिथे तो आहेच.... त्याच्या असण्यातच पूर्णत्व आहे आणि ते जाणण्यात व त्यापुढे अनुभवण्यात आपलं.... असं असताना तो नसणं म्हणजे रितेपणच म्हणावं लागेल, मात्र असं रितेपण जनाबाईंना दिसतच नाही, त्यांच्यासाठी ते असतच नाही.... हीच अनुभूती एका वेगळ्या अभंगात त्या मांडतात ती अशी - 'जनी दृष्टी पाहे जिकडे तिकडे हरी आहे।।' अर्थात जिथे पहावं तिकडे हरि आहेच. अशी आपली अनुभूती सांगून, आपलं प्रासादिक मनोगत व्यक्त करुन जनाबाई भक्तीच्या सुगंधाने तेजाळलेली धन्यतेची फुलं वाहतात ते त्यांच्या आईच्या, विठाबाईच्या चरणांवर, अंतर्बाह्य भरुन उरल्याच्या सतेज भावनांनी....
~ अनीश जोशी.