ऐसे ज्याचे देणे

संतांनी नामाचा, नामसाधनेचा प्रेमाने गौरव केलेला दिसून येतो. त्यातून त्यांनी जनसामान्यांना नामाचा सहज सुंदर मार्ग दाखवलाच पण त्याचबरोबर चुकीच्या मार्गावर चालू पाहणाऱ्यांनाही योग्य मार्गावर आणलं.

युवा विवेक    02-Feb-2024   
Total Views |
 
ऐसे ज्याचे देणे....
ऐसे ज्याचे देणे....
संतांनी नामाचा, नामसाधनेचा प्रेमाने गौरव केलेला दिसून येतो. त्यातून त्यांनी जनसामान्यांना नामाचा सहज सुंदर मार्ग दाखवलाच पण त्याचबरोबर चुकीच्या मार्गावर चालू पाहणाऱ्यांनाही योग्य मार्गावर आणलं. असाच सहज, सुंदर मार्ग दाखवणाऱ्या स्त्री संत म्हणजे संत निर्मळा. संत निर्मळा यांचा जन्म मंगळवेढ्यातील मेहुणाराजा येथे झाला. संत चोखा मेळा यांच्या त्या लहान बहिण तसेच संत सोयराबाई यांच्या नणंद. संत सोयराबाई यांचे भाऊ बंका यांच्या त्या पत्नी. एकुणच त्यांचं सगळं कुटुंब हे पंढरीच्या पांडुरंगाची भक्ती करण्यात रममाण होतं. त्यांच्या एका अभंगात त्या म्हणतात -
नाहीं मज आशा आणिक कोणाची ।
स्तुति मानवाची करूनी काय ॥१॥
काय हे देतील नाशिवंत सारे ।
यांचे या विचारें यांसी न पुरे ॥२॥
त्या सांगतात की त्यांना आणखी कोणाचीही आशा नाहीये, इच्छाच नाहीये. कदाचित आणखी हा शब्द वापरला आहे तो 'विट्ठलावाचून' हे दर्शित करण्यासाठी. विट्ठलावाचून कोणाचीच इच्छा का नाहीये ? याचंच जणू उत्तर देत त्या म्हणतात की मानवाची स्तुती करुन साध्य करायचं तरी काय ? कारण त्यातून मौलिक, चिरंतन असं काहीच मिळणार नसतं, तशी ताकदही असते कुठे मानवाकडे.... संसाराबाबत बोलताना त्या किती सहज म्हणतात, 'किती हे जाचणी संसार घसणी ।
करिती दाटणी काम क्रोध ॥' जणू ही भुमिका मांडताना त्या म्हणतात मुळात नाशवंत असल्याने नश्वराच्या सीमा ओलांडणारं असं कोणीच काहीच देऊ शकणार नाही.... जर खरंच हे जाणलं तर माणसाची इतरांकडून स्वार्थासाठी काही मिळवण्याच्या, खोटी स्तुती करण्याच्या वृत्तीचीच निवृत्ती होईल....
ऐंसें ज्याचें देणें कल्पांती न सरे ।
तेंचि एक बरें आम्हांलागीं ॥३॥
मग माणसांची इच्छा नसताना अंतरंगात नेमकी कोणाची इच्छा आहे ? इच्छा आहे ती अशाची ज्याचं देणं हे कल्पाच्या अंतीही सरत नाही, कमी होत नाही, ते पुरुन उरतं नेहेमीच. असा तो कृपादान देणारा पांडुरंग आहे. माणसांची नाही तर त्याचीच, त्याच्या नामाचीच त्यांना आवड आहे. एका वेगळ्या अभंगात त्या म्हणतात, 'मज नामाची आवडी । संसार केला देशघडी ॥' संसार देशधडी केला इतका महत्वाचा आहे 'तो', 'त्या'चं नाम. मात्र त्याची आणि खरंतर फक्त त्याचीच इच्छा निर्माण होण्यासाठी, ओठांवर त्याचं नाव यायलाही त्यामागे सुकृत असावं लागतं हे सांगत त्या एका वेगळ्या अभंगात म्हणतात - 'अनंता जन्मांचे सुकृत पदरीं । तोचि उच्चारी होठी हरिनाम ॥'
जो भक्तांचा विसावा वैकुंठनिवासी ।
तो पंढरीसी उभा विटें ॥४॥
निर्मळा म्हणे सुखाचा सागर ।
लावण्य आगर रूप ज्याचें ॥५॥
वैकुंठनिवासी असलेला तो नारायण पंढरीत वीटेवर उभा आहे, तोच भक्तांचा विसावा आहे, भक्तांच्या खऱ्या अर्थाने विश्रांतीचं निधान आहे. थकलेल्या, शिणलेल्या जनांना आपल्या कृपस्पर्शाने विश्रांती देणारा आहे.... संत निर्मळाबाई पुढे म्हणतात की लावण्याचा आगर असणारा तो कृपाळू पांडुरंग भक्तांसाठी सुखाचा सागर आहे. याच सुखाचं वर्णन संत तुकाराम महाराज एका अभंगात करताना म्हणतात - 'नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । म्हणऊनि मन स्थिरावलें ॥१॥ धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥' अवघ्या त्रिभुवनात हरि भजनासारखं दुसरं सुख नाही, त्यामुळे त्या ठिकाणीच मी माझं मन स्थिर केलं आहे. त्याचप्रमाणे विट्ठलाची पाऊले आणि त्याचं नाम मी माझ्या कंठात स्थापन केलं आहे असं ते मोठ्या प्रेमाने सांगतात....
अभंगाच्या माध्यमातून संत निर्मळाबाईंनी रेखाटलेली त्यांची पांडुरंगावरची अतुल्य श्रद्धा आणि निष्ठा आपल्याला वाचायला मिळणं ही पांडुरंगाचीच कृपा म्हणावी लागेल....
~ अनीश जोशी.