कवितेचं भावविश्व..

कविता ही एक प्रतिक्रिया आहे. एखादी क्रिया घडते आणि त्याचे जे बरे-वाईट पडसाद उमटतात, त्या उमटणा-या पडसादातून हळूहळू कविता तयार होत असते.

युवा विवेक    24-Feb-2024   
Total Views |
 
कवितेचं भावविश्व..
कवितेचं भावविश्व..

   कविता ही एक प्रतिक्रिया आहे. एखादी क्रिया घडते आणि त्याचे जे बरे-वाईट पडसाद उमटतात, त्या उमटणा-या पडसादातून हळूहळू कविता तयार होत असते. कवीच्या वैयक्तिक आयुष्याशी कवितेचा प्रत्यक्ष संबंध नसला तरी कुणाचं तरी आयुष्य किंवा आयुष्यातला एखादा क्षण कवितेत असतो. सुखाच्या किंवा दु:खाच्या वाटेवरुन जात असताना लागणारी निरनिराळी वळणं, वाट गवसल्याचा आनंद, मधेच दरवळणारा गंध, कळत-नकळत भेटणारा सहप्रवासी, जाता जाता एखाद्या माणसाने, झाडाने किंवा घराने उंचावलेला हात, मागे वळून पाहताना आपल्याकडे धावत येणा-या आठवणी, दुतर्फा असणारा हिरवागार निसर्ग आणि वास्तव, वाट संपत आल्याची दिसणारी एखादी खूण अशा कितीतरी सजीव-निर्जीव घटकांना कवेत घेणारं कविता हे व्यापक साहित्य आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर शब्दांना कवेत घेते ती कविता..

   सुरुवातीच्या कालखंडात देव आणि धर्म यावरच कविता लिहिली जात असे. त्याच कवितेला विविध संत मंडळींनी आपल्या रचनेतून भारुड,अभंग, ओवीरुपात छंदबद्ध केलं.. पुढे शाहीर आणि लोककलाकारांनी त्यावर आपला ठसा उमटवला. पुढे परकीय आक्रमणे, महायुद्ध यातून अन्याय, विरोध, जागरुकता या भावना कवितेत आल्या. स्त्रीवादाला कवितेत स्थान मिळालं. भाषांतरित साहित्याचा कवितेवर मोठा प्रभाव पडला. प्रेम, प्रणय, जीवन, जन्म-मृत्यू असे निरनिराळे विषय कवितेत येऊ लागले. स्वातंत्र्यानंतर संघर्ष, वास्तविकता आणि अन्याय यांचा प्रभाव पडला. ग्रामीण कवितेसारखा प्रकार बदलत गेला. शहरीकरणाचा प्रभावही कवितेवर पडला. या विविध कालखंडातून, विविध प्रसंगातून कविता मार्गक्रमण करत होती आणि आजही करत आहे. पण मानवी मनाला कवितेनं घट्ट धरून ठेवलंय. भावभावनांचे निरनिराळे रंग कवितेत दिसतात. कवी हा मनाचं चित्र रेखाटणारा आणि भावनांचे विविध रंग भरणारा तुमच्या-आमच्यातलाच एक माणूस आहे. कविता कुणालाही करता येईल. अक्षरांना अक्षरे जुळवली की कविता होते. पण ती कविता निष्पर्ण वृक्षासारखी भासते. कुठल्या मनात कुठला रंग भरायचा ही कला आहे, दैवी देणगी आहे. कवीचं वेगळेपण हेच असतं.

   कवितेचं भावविश्व तरल असतं. तरलता हा त्या भावविश्वाचा स्थायी भाव असतो. ती एकसंध असेल तर तितकीशी आपल्याला भावणार नाही. त्यामुळे त्या कवितेचा विचार एकसंध असला तरी शब्दांचा प्रवास वळणावळणाने होत असतो. लहान मुलासमोर खेळण्याचं टोपलं आपण ठेवतो. त्यातलं एक-एक खेळणं ते मूल टोपलीतून बाहेर काढतं , परत टोपलीत टाकतं. आज आवडलेलं खेळणं त्याला उद्या आवडेल असं नाही. काहीवेळा एखादं खेळणं हरवतं. ते बिचारं मूल हिरमुसतं. मग आपण बाजारातून तसंच्या तसं नवं खेळणं आणून त्याला देतो. पण त्याचा जीव त्या हरवलेल्या खेळण्यातच अडकलेला असतो.. तसंच कवीचं आहे. हरवलेली भावना शोधण्यात त्याचं मन गुंतलेलं असतं. या गुंतलेल्या मनात तो ते हरवणं गुंफत असतो. ते गुंफण कागदावर उतरतं. कुणाचं तरी काहीतरी हरवलेलं किंवा गमावलेलं असतं ती व्यक्ती त्या कागदावरलं ते हरवणं वाचते.. तेव्हा त्याचं मन कागदाशी, भावनेशी , कवितेशी आणि कवीशी जोडलं जातं. अशी असंख्य मनं कवीच्या मनाशी जोडलेली असतात. या मनांच्या भेटीतून कवितेचं भावविश्व उमलतं.. त्या भावविश्वाचा म्हणजे भावनांचा शब्दांना गंध असतो. लय असते, छंद, नाद, सूर असतो.

कवितेची जशी मनाशी नाळ जोडलेली असते तशी ती मनातल्या एखाद्या प्रदेशाशीही काहीवेळा जोडलेली असते. आरती प्रभू मुंबईत आले तरी त्यांची कविता कोकणातील आपल्या मूळगावाशीच अधिक जोडलेली आहे. मंगेश पाडगावकरांना प्रेमकविता आवडते तितकाच आवडतो माया करणारा वेंगुर्ल्याचा पाऊससुद्धा! बा. भ. बोरकरांचं मन खा-या वा-याच्या गोव्याच्या भूमीशी जोडलेलं आहे. अलीकडच्या काळातील वैभव जोशींची कविता तरल आहे. पण गझल ह्या आपल्या मनातल्या आवडीशीही ती जोडलेली आहे. या कवींच्या कवितेत तरलता आहेच; परंतु, मनाच्या कोप-याशी देखील ती बांधलेली आहे. कवितेतील तरलता ख-या अर्थाने जाणवते ती शांता शेळके यांच्या कवितेतून.. त्यांची कविता बालमनाशी, तारुण्याशी, प्रेमाशी, भक्तीशी अशा विविध मनामनाची आहे. अलीकडच्या काळातील संदीप खरे यांचीही कविता तरल आहे. तारुण्य, प्रेम, बालमनाची आजची स्थिती, शहरी जीवन अशा अनेक भावना त्यात आहेत. मुंबईत राहून पुण्यावर कविता करता येते, पुण्यात राहून ग्रामीण जीवनावर कविता करता येते, गावात राहून विज्ञानावर कविता करता येते. म्हणूनच कवितेचा संबंध प्रांत, भाषा, गाव, शहर इत्यादीपेक्षा मनामनातल्या विविध भावनांशी आणि विचारांशी असतो. भावना हाच कवितेचा भावार्थ ! त्यामुळे कविता शब्दांनी सांधता येत असली तरी कशानेही बांधता येत नाही.. एखाद्या पक्ष्यानं आभाळभर विहार करावा तशी कविता मनाच्या भावविश्वात मुक्त विहार करत असते. माणसाचं मन हेच कवितेचं भावविश्व असतं...

- गौरव भिडे
पुणे