प्रमाणभाषा आणि बोलीभाषा..

आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा मनातले विचार आणि भाव-भावना व्यक्तीपर्यंत किंवा व्यक्तीसमूहापर्यंत पोचवत असतो.

युवा विवेक    01-Mar-2024   
Total Views |
 
प्रमाणभाषा आणि बोलीभाषा..
प्रमाणभाषा आणि बोलीभाषा..

आपण एकमेकांशी बोलतो तेव्हा मनातले विचार आणि भाव-भावना व्यक्तीपर्यंत किंवा व्यक्तीसमूहापर्यंत पोचवत असतो. त्या विचाराला, भावनेला दुसरी व्यक्ती प्रतिसाद देते, तेव्हा ते संभाषण पूर्ण होते. हे बोलणे म्हणजेच भाषा होय. विचार व्यक्त करण्याचं भाषा हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे भाषेला महत्व आहे. कोणत्याही भाषेत प्रमाणभाषा आणि बोलीभाषा असे दोन वेगळे प्रकार असतात. मराठी भाषेतही ते आहेत. हल्ली सोशल मिडीयावर मराठी प्रमाणभाषेविषयी विविध व्हिडिओ आणि आपापली मते लोक मांडत आहेत. भाषा विषयावर सोशल मिडीयावर चर्चा होणे ही बाब स्वागतार्ह आहे. पण मध्यंतरीच्या काळात दोन-तीन व्हिडिओ, प्रतिक्रिया आणि त्यावर आधारित मते माझ्या वाचनात आली. ब-याच लोकांचा मराठी प्रमाणभाषेला विरोध असल्याचे त्यातून जाणवले. प्रमाणभाषा अस्तित्वातच नसल्याचे अनेक जणांचे म्हणणे आहे. त्यांच्या एकंदरीतच म्हणण्याप्रमाणे प्रमाणभाषा म्हणजे ब्राह्मणांची भाषा , पुण्यातील सदाशिव पेठ किंवा पेठेतील शुद्ध भाषिकांनी मराठीवर लादलेली आपली भाषा! मुळातच ब्राह्मण, पुणेरी असं जर म्हणायचं असेल तर त्याला बोलीभाषा म्हटलं पाहिजे. प्रमाणभाषा ही कुणाची मालकी असू शकत नाही. प्रमाणभाषा म्हणजे शासनाने, समाजाने दैनंदिन व्यवहारासाठी ठरविलेली भाषा... त्यामुळे ती भाषा कुणा एका समाजाची किंवा शहराची नसते. दैनंदिन व्यवहारात सोपेपणा आणि सारखेपणा असावा म्हणून प्रमाणभाषा वापरली जाते. त्यामुळे ती श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असा प्रश्नच उद्भवत नाही . ती तुमची, माझी, आपल्या सर्वांचीच दैनंदिन व्यवहाराची भाषा आहे. भाषेत सारखेपणा असावा, एकमेकांना एकमेकांनी बोललेलं व्यवस्थित उमगलं पाहिजे, सहजपणे संवाद साधता आला पाहिजे यासाठी प्रमाणभाषेची रचना असते.

दैनंदिन व्यवहारात परकीय शब्द कमी करुन आपली म्हणून महाराष्ट्रातील दैनंदिन व्यवहाराची एक भाषा असावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीतील पहिला राज्यव्यवहारकोष तयार करुन त्यातील शब्दांना दैनंदिन भाषेत स्थान देत ती भाषा रुजवली. त्यामुळे प्रमाणभाषेची रचना दैनंदिन व्यवहारासाठी केलेली असते. बोलीभाषा अनेक असतात. प्रत्येक पाच-दहा कोसावर बदलणारी भाषा म्हणजे बोलीभाषा. आदिवासी, आहिरणी, मालवणी, पुणेरी इत्यादी भाषा त्या-त्या समाजामुळे, प्रांताच्या नावामुळे ओळखल्या जातात. म्हणूनच त्याची निश्चित अशी संख्या किंवा प्रमाण ठरवता येत नाही. बोली म्हणजे एखाद्या भागातील लोकांच्या बोलण्यातून तयार झालेली भाषा असते. त्याला आकार-उकार नसतात ; म्हणजेच व्याकरण नसते. त्याचा संबंध उच्चारणाशी असतो. व्याकरण आणि भाषेचे नियम असल्यामुळे प्रमाणभाषेचा उच्चारण आणि लेखन या दोहोंशी सारखाच संबंध असतो.

पत्रलेखनातून प्रमाणभाषा आणि बोलीभाषेची ओळख करून घेता येते. औपचारिक आणि अनौपचारिक असे पत्राचे दोन प्रकार असतात. आपण जसे घरी बोलतो तसेच्या तसे प्रत्येक शब्द आपण एखाद्या सरकारी अधिका-याला पत्रात लिहत नाही. माननीय, महोदय, विनंती, तसदी इत्यादी शब्दांचा वापर करूनच ते पत्र आपल्याला लिहावे लागते. कुटुंबियांना पत्र लिहताना मात्र माननीय या शब्दाऐवजी प्रिय, तसदी या शब्दाऐवजी त्रास असे शब्द आपण लिहतो. तसदी आणि त्रास या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असला तरी शासकीय किंवा औपचारिक व्यवहारात तसदी हाच शब्द वापरावा हे प्रमाणभाषेने निश्चित केले असल्यामुळे तसदी हा व्यावहारिक शब्द आहे. बोलीभाषेत असंख्य शब्द असतात. बोलण्यातून, वस्तूच्या आकार-प्रकारातून ते शब्द तयार झालेले असतात. संबंधित गावातील लोकांना ते अवगत असतात. पण एखादा नवखा माणूस त्या परिसरात किंवा गावात आला तर तेथील बोलीभाषा त्याला बोलता येत नसेल आणि लोक त्याच्याशी बोलले तरी त्याला काही शब्द कळणार नाहीत. तो त्याच्या बोलीभाषेत बोलू लागला तर त्याला काय हवंय, तो कशासाठी गावात आलाय हे स्थानिकांना कळणार नाही. त्यामुळे संवाद साधण्याची प्रक्रिया अपूर्ण राहून समज-गैरसमजात वाढ होईल. त्यासाठी दोघांनी एकमेकांना नीट समजेल अशाच भाषेत बोलणे आवश्यक आहे. इथे प्रमाणभाषेचे महत्व जाणवते. पण म्हणून बोलीभाषा कनिष्ठ असे समजण्याचे कारण नाही. श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेद करण्यापेक्षा प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांची गरज समजून घेऊन त्याचा त्या-त्या ठिकाणी वापर करणे हेच आपल्या मराठी भाषेला अभिप्रेत आहे.

प्रसिद्ध साहित्यिक आणि मराठीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, असे पु . ल . देशपांडे आपल्या एका भाषणात म्हणाले होते, " ज्याला आपल्या भाषेवर मनापासून प्रेम करता आलं त्याला जगातील कोणत्याही भाषेवर प्रेम करता येईल. " त्याप्रमाणेच ज्याला वेगवेगळ्या भाषा मनापासून शिकाव्याशा वाटतात त्यानी मराठी प्रमाणभाषेला नावे ठेवण्यापेक्षा ती समजून घ्यावी आणि बोलीभाषेचंही आपलेपण समजून घ्यावं..

- गौरव भिडे
पुणे
०२ मार्च २०२४