प्रवासातली माणसं..

वपु म्हणतात, "परिचयाच्या किंवा नात्यातल्या माणसांपेक्षा चार तासांच्या प्रवासात अनोळखी माणसाजवळ कधीकधी समोरची व्यक्ती जास्त मोकळी होते."

युवा विवेक    23-Mar-2024   
Total Views |
 
प्रवासातली माणसं..
प्रवासातली माणसं..

   प्रवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो वळणावळणांचा रस्ता, आपल्याबरोबर धावणारा दुतर्फा दिसणारा निसर्ग, इच्छित स्थळी पोचल्यावर काय काय करायचं त्याचे विचार, पुणे-मुंबई प्रवास असेल तर कर्जतचा बटाटेवडा ... असं बरंच काही डोळ्यासमोर उभं राहतं. आयुष्यात कधी प्रवासच केला नाही, असा माणूस विरळच असेल. काही ना काही कामानिमित्त आपल्याला प्रवास करावा लागतोच. कुणी एसटीने, कुणी रेल्वेने, कुणी स्वतःच्या वाहनाने प्रवास करतात. प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे, असं आपण म्हणतो. पण प्रवासात हे एकटेपण भारी कंटाळवाणं होतं. समोर सामानं घेऊन धावणारी माणसं, निरनिराळ्या आवाजात आपल्या खांद्यावरच्या किंवा डोक्यावरच्या टोपलीतले खाद्यपदार्थ, वस्तू वगैरे विकणारे विक्रेते, खिडकीतून दिसणारं , तिकीट फाडणारा वाहक असं बरंच काही मन रमवण्यासाठी प्रवासात असतं. पण ठराविक वेळानंतर त्याचाही कंटाळा येतो. कुणाशी तरी बोलावंस वाटतंच. आणि नेमकी अशावेळी आपली एसटी एखाद्या बसस्टॉपवर थांबते. तो प्रवासी आपल्या शेजारी बसतो. हाश-हुश करत सामान ठेवत थोड्या वेळाने जरा स्थिरावतो, तेव्हा आपल्याला फार बरं वाटतं. आता उरलेला प्रवास तरी कंटाळवाणा व्हायचा नाही.. त्यातच तो प्रवासी देखील बोलक्या स्वभावाचा असेल तर अगदी दुधात साखरच! मग काय ओळख होऊन गप्पा सुरू व्हायला असा कितीसा वेळ लागतोय..

   पण काही जण मात्र पोस्टातल्या खळीने ओठ चिकटवल्यासारखे प्रवासभर अगदी गप्प बसलेले असतात. पण ते शेवटी आपल्यासारखेच प्रवासी असतात.. त्यामुळे आपल्याला जसा नुसतं बसून कंटाळा येतो तसा त्यालाही कंटाळा आलेला असतोच.. हा कंटाळाच त्या ओठांवरली खळ पुसतो आणि त्या ओठातून " काय कुणीकडे दौरा?" असे शब्द उमटतात. मग एकमेकांना कुठे नि कशासाठी चाललो आहोत, किती दिवसांचा दौरा वगैरे प्रश्नांनी संवादाचा श्रीगणेशा होतो. हळूहळू संवाद रंगात येतो. मग चहा-नाश्त्यासाठी गाडी थांबते. एकत्र चहा होतो. पुन्हा प्रवास सुरू होतो. आयुष्यात कधीही न पाहिलेल्या त्या अनोळखी माणसाशी आपल्याही नकळत अगदी तासा-दोनतासातच छान ओळख होते. एकमेकांना आपण दैनंदिन कामात येणारे, मागच्या प्रवासातले अनुभव शेअर करतो. मग त्यातून एकमेकांची कौटुंबिक माहिती एकमेकांना मिळते. आपल्या मनात या सहप्रवाशाविषयी विश्वास निर्माण होतो. इथे खरी या निनावी नात्याची सुरुवात होते. खरंतर कुठल्याही नात्यात एकमेकांवर डोळे मिटून विश्वास ठेवण्याइतपत मनात खात्री निर्माण होते तिथे त्या नात्याची नव्याने आणि प्रामाणिक सुरुवात होते.

   वपु म्हणतात, "परिचयाच्या किंवा नात्यातल्या माणसांपेक्षा चार तासांच्या प्रवासात अनोळखी माणसाजवळ कधीकधी समोरची व्यक्ती जास्त मोकळी होते." वपुंचं हे वाक्य जवळजवळ प्रत्येक प्रवाशालाच लागू पडतं. गप्पांच्या ओघात आपल्याही नकळत आपल्या मनातलं एखाद गुपित, सुख-दु:ख त्या सहप्रवाशाला आपण सांगतो. हे असं का होत असावं हे मात्र विचार करण्यासारखं आहे. याचं अगदी साधं सोपं कारण म्हणजे ती व्यक्ती आपल्या परिचयातील व्यक्तींना ओळखत नसते. त्यामुळे ती कुणाला आपलं गुपित सांगेल याची आपल्याला भिती वाटत नाही. या अनोळखीपणाच्या मोकळ्या हवेतच मन मोकळा श्वास घेत असतं.. त्या व्यक्तीचे गुण-दुर्गुण किंवा आपले गुण-दुर्गुण त्या व्यक्तीला माहित नसल्यामुळे एक नैसर्गिक निरागसता जाणवते. हेवा, असूया, मत्सर वगैरे न वाटता आपल्याविषयी शुद्ध आपुलकी त्या व्यक्तीला वाटत असते. त्यामुळेच ते नातं टिकवण्यापुरतं किंवा कृत्रिम संभाषण न राहता त्याच्या मनमोकळ्या गप्पा होतात. या गप्पांमुळेच मन प्रसन्न होतं. आपल्या माणसाला न सांगितलेली गोष्ट त्या व्यक्तीला सांगितल्यामुळे मन हलकं होतं. ही प्रवासात भेटणारी माणसं आपल्या आयुष्याचा एक भाग असतात.. या दोन व्यक्तींचं मन जुळण्याचं आणखी एक कारण म्हणजे दोघांनाही प्रवासाचा सारखाच कंटाळा आलेला असतो. सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, वय इत्यादी सुखं बघून नातं जोडणारी माणसं समाधानी असतातच, असे नाही. पण प्रवासातली कंटाळा घालवणे ही छोटीशी गरजही दोन माणसं रंगीबेरंगी फुले गुंफावीत तशी गुंफते.. या नात्याचा गंध टवटवीत आणि तितकाच निरागस असतो..

   थोडक्यात काय तर एकमेकांना आपण ख-या अर्थाने 'हवे असतो'. हे 'हवं असणं'च ही प्रवासातली माणसं जोडतं.. पण आयुष्याच्या प्रवासात असा सहप्रवासी क्वचितच भेटतो.. एकमेकांचं एकमेकांना सगळं- सगळं माहित असायला हवं, एखादी गोष्ट सांगायची राहिली तर ती 'मुद्दाम लपवली' असं आपण म्हणतो, अपेक्षांचं निरर्थक ओझं पाठीवर लादतो, एकमेकांच्या बोटापेक्षा आर्थिक उत्पन्नातली तफावतच आपल्याला मुठीत हवी असते... आणि मग असला सहप्रवासी असेल तर हा प्रवासच नको, असं म्हणत आपण उगाचच प्रवास थांबवतो.. अशावेळी वाटतं , या चार-सहा तासांच्या प्रवासातल्या माणसांच्या नात्यातून माणसानं आयुष्याचे ठोकताळे बांधायाला शिकावं.. एकमेकांच्या सांपत्तिक आणि सामाजिक स्थानापेक्षा एकमेकांच्या गरजा किती जुळतायत हे बघितलं तर कित्येक आयुष्याचे प्रवास सुखाचे होतील.. त्या प्रवासातली माणसं वळणावळणावर आपल्या ओंजळीत सुखाची फुले देतील..

- गौरव भिडे
पुणे.
२३ मार्च २०२४