मनातला वसंत..

निसर्गाचा हा जसा वसंत ऋतू आहे, तसा प्रत्येकाच्या मनात वसंत असतो. या वसंताची चाहूलही मन आपल्याला देत असतं.

युवा विवेक    29-Mar-2024   
Total Views |

मनातला वसंत
   माणसाचं मन संवेदनशील आहे. प्रत्येक घटनेची, प्रसंगाची ते नोंद ठेवतं. ज्याप्रमाणे माणसाचं शरीर निसर्गाशी संबंधित आहे त्याप्रमाणेच त्याचं मनही निसर्गाशी जोडलेलं आहे. मळभ असेल तर मन ताजतवानं नसतं; याउलट, पाऊस पडून गेल्यावर मन आनंदी होतं. सकाळच्या कोवळ्या उन्हात मन प्रसन्न असतं. समुद्राला जशी भरती आणि ओहोटी असते, तशी मनालाही असते... सुख आणि दु:ख! निसर्गाचे जसे सहा ऋतू असतात तसे मनाचेही ऋतू असतात. मनाच्या ऋतूंना आपल्याला 'मूड' म्हणता येईल. विचार हे मनाचं आभाळ आहे. थोडक्यात काय तर मन हा निसर्गाचाच एक घटक आहे. त्यामुळे निसर्गात जे घडतं, त्याचा मनावर प्रभाव पडतो.

   पाडगावकर लिहितात, " सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे! " ही ओळ किती खरी आहे. प्रत्येक ऋतूचं वैशिष्ट्य असतं. प्रत्येक ऋतूच्या अस्तित्वाला काही कारण आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू आपापली वैशिष्ट्ये घेऊन पृथ्वीवर अवतरतात. एकेका ऋतूचा जणू सोहळाच पृथ्वीवर साजरा होतो. या ऋतूंचा राजा वसंत आहे. वसंताची चाहूल मोठी आनंददायी असते. वसंत ऋतू म्हणजे नवचैतन्याचं शिंपणच.. झाडाला पालवी फुटते, कोकिळेला सुरेख सूर गवसतात, सण-उत्सवाच्या निमित्ताने सारे जण एकत्र येतात, नवेपणाचा अगदी उत्सवच असतो. सारी सृष्टी मोहरते. नवनवे रंग, निरनिराळे गंध झाडांना येतात. थंडी हळूहळू कमी होते. शरीर आणि मनाचा समतोल साधण्यासाठी नवी ऊर्जा मिळते. वसंत हा खरंतर निसर्गाचा देवदूत आहे. त्याच्या रुपाने स्वर्गातले देवच पृथ्वीवर अवतरतात आणि सा-या विश्वाला पुन्हा नव्याने आपल्या पंखाखाली घेतात. वसंत ऋतूवर मराठी साहित्यात अगणित कविता आहेत... असं असूनही त्याच्या स्वागतासाठी पुन्हा पुन्हा कविता करावीशी वाटते..

   निसर्गाचा हा जसा वसंत ऋतू आहे, तसा प्रत्येकाच्या मनात वसंत असतो. या वसंताची चाहूलही मन आपल्याला देत असतं. आपल्याला ती चाहूल ओळखता यायला हवी. आपलं एखाद्या व्यक्तीशी भांडण होतं, एखाद्या महत्त्वाच्या कामात अपयश येतं, जवळची व्यक्ती दुरावते , तेव्हा आपण दु:खी होतो. पण दु:खं फक्त आपल्या एकट्यालाच नाही.. झाडंही पानगळीचं दु:खं सोसतात. त्यांनाही रडू येतं. पण निसर्गाने दिलेले हे शिशिराचे वरदान आहे, असं म्हणत झाडं पानगळ स्वीकारतात. कारण, त्यांना ठाऊक असतं, शिशिरानंतर वसंत ऋतू येणारच असतो. आपण मात्र ही दु:खाची पानगळ सोसत नाही. अशावेळी समजावं, आपण मनाने दिलेली वसंताची चाहूल ओळखलेली नाही. निसर्गाचा ऋतू पुढे सरतोय नि आपल्याला मात्र शिशिरातच रहायचंय! वसंताची वाट पाहत शिशिराची पानगळ सोसणं आपण झाडांकडून शिकायला हवं. एखाद्या व्यक्तीशी भांडण होतं तेव्हा आपण आत्मपरीक्षण करत नाही. त्याची कारणं आपल्याला शोधायची नसतात. पण त्यामुळे मनातली सल वाढत जाऊन माणसं दुरावतात. आपल्याला अपयश स्वीकारता येत नाही. कुणी व्यसनाच्या आहारी जातात, कुणी ताणतणावाची आराधना करतात.. पण मनातला वसंत कुणीच का शोधत नाही! मनातल्या वसंताच्या सहवासात नातं नव्याने जोडण्याची, अपयश दूर सारत पुन्हा नव्या जोमाने उभं राहण्याची शक्ती असते. सुकलेल्या झाडाला पालवी फुटते, तर मनाला पालवी का फुटायची नाही.. मनालाही पालवी फुटते.

   यश मिळणं आणि त्यामुळे सुखावलेलं मन म्हणजे वसंत आहे. नवं नातं जुळणं, एखादी गोष्ट आपल्याला जमणं, आपण ज्या व्यक्तीला आदर्श म्हणतो ती व्यक्ती आपल्याला भेटणं म्हणजेच मनातला वसंत आहे. मन आनंदी आणि प्रसन्न झाल्यामुळे मनाला मोहोर येतो, नवनव्या विचारांची पालवी फुटते, विचारांचं गणित जमल्यामुळे प्रत्यक्ष कृती करणा-याला बहर येतो. गुलमोहर फुलावा तसं आयुष्य फुलायला लागतं. झाडांची पानं सळसळतात, रोपं डुलतात तसं आपलं आयुष्य आनंदाच्या तालावर नाचू लागतं.. नवे विचार, नवे प्रयत्न, नवी आशा, नवे शब्द, नव्या भावना, नवीन कल्पना हे सारं म्हणजे मनातला वसंत आहे. प्रत्येक शिशिरातल्या पानगळीच्या सोहळ्यानंतर वसंताचं नवेपण जाणवणार आहेच. ह्या नवेपणाची आपल्याला ख-या अर्थाने जाणीव व्हावी म्हणूनच आयुष्यात काही घटना, प्रसंग, व्यक्ती या सा-याची पानगळ होणारच.. पण ही पानं जुनी होऊन निखळ्याशिवाय तिथे नवं पान येणार तरी कसं! म्हणूनच, वसंताच्या नवेपणासाठी थोडी शिशिराची पानगळ सोसायला हवीच. मनातला वसंत एकदा ओळखता आला की, कोकिळेसारखंच आनंदाने आपल्यालाही गाणं गाता येईल.. मनाला मिळालेलं हे वसंताचं दान आपल्याला जपायला हवं. यासाठी एखाद्या कलेशी मैत्री आपल्याला करता येईल. कला माणसाला नवा विचार, नव्या भावना, नव्या कल्पना सुचवत असते. माणसाच्या मनातलं नवेपण जिवंत ठेवत असते. कला म्हणजे चित्रकला, संगीत, साहित्य हवं असंच काही नाही. रोज नवनवी माणसं जोडणे ही एक कलाच आहे. असं नवेपण आपण रोज जगत राहिलो तर मनातला वसंत कायमच फुलेल आणि आयुष्य रोज नव्याने बहरेल..

- गौरव भिडे
पुणे.
३० मार्च २०२४