मन नाजूकशी मोतीमाळ..

मन ही आपल्याला मिळालेली छानशी भेट आहे. आपलं मन आपल्या बरचसं ओळखीचं असतं आणि बरचसं ओळखीचं नसतंसुद्धा!

युवा विवेक    09-Mar-2024   
Total Views |
 
मन नाजूकशी मोतीमाळ..
 
मन नाजूकशी मोतीमाळ..

   मन ही आपल्याला मिळालेली छानशी भेट आहे. आपलं मन आपल्या बरचसं ओळखीचं असतं आणि बरचसं ओळखीचं नसतंसुद्धा! रोज वेगवेगळ्या गोष्टींमुळे, घटनांमुळे आपल्याला मनाच्या या अनोळखीपणाची ओळख होत असते. ओळखीचं मन म्हणजे साद घालणारं मन.. अनोळखी मन म्हणजे प्रतिसाद देणारं मन.. आपण एखाद्या व्यक्तीला साद घातल्यावर ती व्यक्ती कसा प्रतिसाद देईल, प्रतिसाद देईल की नाही हे आपल्याला सांगता येत नाही. अनोळखी मनाचंही असंच असतं. त्याच्यावर झालेल्या संस्कारांचा, एखाद्या घटनेच्या झालेल्या परिणामाचा, आपल्या स्थायी भावाचा मेळ साधत ते प्रतिसाद आणि प्रतिक्रिया देत असतं. आपल्या नकळतच एखादा शब्द आपल्या तोंडून निघून जातो, ठरवलेलं नसतानाही आपण एखादी क्रिया करतो ती या मनातून आलेली असते. त्यामुळे या अनोळखी मनाचं अनोळखीपण मुद्दाम किंवा ठरवून जाणून घेता येत नाही. पण त्याचं घडणं आपल्या हातात असतं. योग, प्राणायाम या क्रियांमुळे आपलं मन निरोगी राहतं. पण आपल्याला योग, प्राणायाम यासाठी वेळ देता येत नाही. मग अशावेळी आपण एक साधना केली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, साधना म्हणजे पुन्हा वेळ देणं आलंच! पण ही साधना वेळखाऊ नाही किंवा अवघड देखील नाही. अगदी साधी आणि सोपी आहे. रोज नवनवीन माणसांशी ओळखी करून घ्यायच्या, अवतीभवती असणा-या माणसांची सुख- दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा, छान संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे मनावर संस्कार होतील, स्वतःच्या दु:खाचा किंवा एखाद्या घटनेचा मनावर झालेल्या नकारात्मक परिणामाचा आपल्याला विसर पडेल. नवनवीन गोष्टी शिकत राहिल्यामुळे, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांशी संवाद साधल्यामुळे मनाची प्रतिसाद देण्याची क्रिया मनापासून वाढत जाईल..

   साद आणि प्रतिसाद देणारी मन ही जगातली एकमेव गोष्ट आहे. त्यामुळे मन जपायला हवं आणि तेही स्वतःबरोबरच दुस-या व्यक्तीचंसुद्धा! मन जपणं हे मोठं कौशल्याचं काम आहे. कौशल्य म्हटलं म्हणजे ते आत्मसात करायला हवं. म्हणजेच मन मनापासून जपणं आलं. मन हे नाजूक फूल आहे. ज्याप्रमाणे फुलाचं मूळाशी, खोडाशी, फांदीशी, पानांशी नातं असतं तसंच प्रत्येक भाव-भावनेशी, विचारांशी, व्यक्तीशी, घटनेशी, वस्तूशी, निसर्गाशी मनाचं नातं आहे. या प्रत्येकाचा एकेक अंश मनात आहे. फुलाभोवती भुंगा भ्रमण करतो, वा-याची एखादी झुळूक फुलाला अलगद स्पर्श करते, लांब उभं राहून कुणीतरी ते फूल न्याहाळतं. आपल्याला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा त्या भुंग्यासारखी ती आपल्याभोवती भ्रमण करत असते. एखादी व्यक्ती कधीतरीच भेटते पण वा-याच्या झुळूकेनं जसं फूल मोहरुन जावं तसं मन मोहरतं. कुणीतरी आपलं मन जाणून घेण्याचा प्रयत्न करतं.. पण यामुळे फुलाचं सौंदर्य, त्याची नाजूकता, त्याचं हळवेपण यावर परिणाम होत नाही.. आपलं मनही कायम असंच आनंदी असलं पाहिजे.

   मन आनंदी असलं म्हणजे भावनांचा गुंता न होता त्याची छान गुंफण होते. डोळ्यांची लेखणी घडणारी प्रत्येक घटना मनाच्या कागदावर नोंदवत असते. नोंद घेण्याची प्रक्रिया अखंड सुरू असते. एखाद्या अपघातात मेंदू किंवा अवयवांवर आघात होऊन त्यांचं कार्य मंदावतं. शरीरावर त्याचा परिणाम जाणवतो. पण मन मात्र कधी मंदावत नाही. मेंदूला इजा झाली तर मनावर परिणाम होऊ शकतो. पण भावनेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याची मनाची प्रक्रिया कधी थांबत नाही. बाह्य घटनांप्रमाणेच शरीरात घडणा-या बदलांमुळेही मनाच्या स्थिर-अस्थिरतेवर परिणाम होतो. त्यामुळे मन जपणं किती महत्त्वाचं याची आपल्याला कल्पना येते. मन आपल्यापासून कधी दुरावत नाही. त्याचं एक कारण म्हणजे मनाचं अनोळखीपण... ओळख करून घेण्याच्या निमित्ताने आपला मनाशी सतत संवाद सुरुच असतो. हे नाजूकसं मन बांधून ठेवता येत नाही. तळ्यात आणि मळ्यात हा त्याचा खेळ सतत सुरू असतो; किंबहुना, हे तळ्यात-मळ्यात असणं हेच त्याच्या जगण्याचं अस्तित्व असतं.

   समुद्राच्या भरती-ओहोटीशी देखील मनाच्या स्थिर-अस्थिरतेचा संबंध असतो, असं म्हणतात. ते बरोबरच आहे. आपल्या शरीराचा प्रत्येक घटक निसर्गातल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी जोडलेला असतो. मग मन तरी त्यापासून वेगळं कसं असेल.. प्रत्येक घटकाच्या अस्तित्वाला काही अर्थ असतो. जवळच्या व्यक्तीला साधं खरचटलं तरी मनाला वेदना होतात. मन संवेदनशील असतं. या संवेदनशील मनात राग-लोभ, आपलेपणा-परकेपणा, प्रेम, वात्सल्य, सुख-दु:खं, मत्सर, द्वेष या आणि अशा कितीतरी भावना असतात. ही प्रत्येक भावना म्हणजे एकेक मोती असतो. असे कितीतरी मोती एकत्र येऊन मन नावाची सुरेख पण तितकीच तरल अशी गुंफण होते... हीच नाजूकशी मोतीमाळ असते. आपली मोतीमाळ जपताना अशीच दुस-या व्यक्तीची देखील मोतीमाळ आहे आणि ती जपण्याची काळजी घेण्याचा आपण प्रयत्न करायला हवा.. दुस-या व्यक्तीची मोतीमाळ जपता आली नाही तरी त्याचा आदर करणं हीच मनाची निरागसता आहे. मन म्हटलं की, कवी संदीप खरे यांनी लिहिलेल्या एका कवितेच्या ओळी आठवतात..
' मन तळ्यात, मळ्यात, जाईच्या कळ्यात..
मन नाजूकशी मोतीमाळ, तुझ्या नाजूकशा गळ्यात! '

- गौरव भिडे
पुणे
०९ मार्च २०२४