निरागस साशाची डोळे पाणवणारी गोष्ट

युवा विवेक    22-May-2021   
Total Views |

story_1  H x W: 
संतोष सिवन हे आपल्याला सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. त्यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला १९९६ सालचा 'हॅलो' हा बालचित्रपट उत्कृष्ट भारतीय बालचित्रपटांपैकी एक आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार, दिग्दर्शनाचं रजतकमल, सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रण, तसेच विशेष उल्लेखनीय बालकलाकार असे चार राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाले आहेत. इतर आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवांतही या चित्रपटाला पुरस्कार मिळाले आहेत. दूरदर्शनवर पूर्वी बाल चित्रसमितीची निर्मिती असलेले चित्रपट दाखवले जात असत, त्यात हा चित्रपट पाहण्यात आला होता. आता तो यूट्युबवरही उपलब्ध आहे.
सात वर्षांच्या साशाच्या आईचं तिच्या जन्माच्या वेळी निधन झालं. ती आपल्या वडिलांसोबत राहत असते. शाळेच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा इतर मुलं खेळण्यात, गाण्यात रमलेली असतात, तेव्हा साशाला एकटं वाटतं. त्यामुळे तिला जेवावंसंही वाटत नाही. अशा वेळी घरातला नोकर तिला गंमतीत सांगतो की, देव तिच्यासाठी एक मित्र पाठवेल. तेव्हाच गल्लीतलं एक कुत्र्याचं गोंडस पिल्लू एका सकाळी तिला भेटतं आणि ती त्याचं नाव 'हॅलो' ठेवते. हॅलोसोबत तिचा वेळ मजेत जात असतो. तिची मित्रमंडळीही हॅलोबरोबर रमून जातात. अशात अचानक हॅलो हरवतो. साशा त्याचा शोध घेऊ लागते. तिला या शोधात वेगवेगळी विचित्र माणसं भेटत जातात. एका वृत्तपत्राचा संपादक भेटतो. एका स्मगलर टोळीच्या शोधात असणारे पोलीस भेटतात. कुत्र्यांना पकडणारा एक माणूस भेटतो. लहान मुलांची एक टोळी आणि त्या टोळीचा प्रमुख रंगा भेटतो. पुढे काय होतं, तिला तिचा हॅलो भेटतो का, हे चित्रपटातच पाहणं योग्य ठरेल.
चित्रपटात साशाच्या मुख्य कथानकासोबत इतर उपकथानकंही आहेत. गोल्डी आणि लता यांची प्रेमकथा आणि त्यातली वळणं आहेत. वेगवेगळे विषय घेऊन त्यावर भाष्य करणारा 'बडबड टॉक शो' आहे. त्याचा बडबड्या सूत्रसंचालक आहे. मुंबईत चोरीछुपे चालणारं स्मगलिंग, ते करणारी टोळी आणि त्या टोळीच्या मागे लागलेले पोलीस आहेत. बातम्यांच्या शोधात असणारी वृत्तपत्रांची कार्यालये आहेत. पाऊस आहे. १९९२-९३ साली मुंबईत झालेल्या दंग्यांचा प्रसंगही आहे. लहान मुलांची टोळी, त्यांचा म्होरक्या रंगा, त्याने साशाला मदत करायचं ठरवणं, पोलिसांना पाहून पळून जाणं, हेही यात सहजपणे येतं. रस्त्यावरचं आयुष्य जगणारा रंगा आणि बंद वगैरे काय असतं, हे माहीतही नसलेली केवळ हॅलोला शोधणारी साशा, यांच्या आयुष्यातली तफावत इथे सहज दिसते. एका प्रसंगात पोलिसांना पाहून रंगा पळू लागतो, पण दंगलीच्या वेळी रस्त्यावर पडलेलं लहान मूल उचलून साशा म्हणते, "ये तो हस रहा है", त्या प्रसंगातून संतोष सिवन यांच्या संवेदनशीलतेचं, लहान मुलांच्या ठायी असलेल्या निरागसतेच्या त्यांना असलेल्या जाणिवेचं दर्शन होतं.
या चित्रपटाचा क्लायमॅक्स हा सर्वोत्कृष्ट क्लायमॅक्सपैकी एक आहे, असे म्हणायला हरकत नाही. डोळ्यांना अश्रूंची धार लागते पाहून. असंख्य सुविचारांतून जे शिकवता येणार नाही, ते एका लहानशा दृश्यातून संतोष सिवन यांनी साध्य केलं आहे. लहान मुलं वाढत असतात, तेव्हा खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांना आपल्या स्वतःच्या वस्तूंवर अधिकार गाजवायचा असतो. त्यात काही चुकीचंही नसतं. मात्र, या परीकथेच्या सुंदर जगाला टाचणी लावणारा एखादाच वास्तवाचा क्षण येतो आणि त्या एका क्षणात मुलं लहानाची मोठी होतात. हा क्षण कुणासाठी अन्यायाचा असू शकतो, कुणासाठी मोहाचा त्याग करण्याचा. मात्र, तो खूप काही शिकवून जातो आणि आपण आता लहान राहिलेलो नाही, हे मुलांनाच आपसूक कळत जातं. निरागस बालपण जपतही मूल मोठं व्हायला शिकतं. हे सगळं शेवटच्या काही मिनिटांत हा चित्रपट दाखवून जातो आणि तोवर केवळ बालचित्रपट असलेला हा चित्रपट सर्वांसाठी एक नवा अनुभव देऊ पाहतो. त्यातच या चित्रपटाचं वेगळेपण दडलं आहे.
बेनफ दादाचनजी साशाच्या मुख्य भूमिकेत आहे. साशाचं एकटेपण, हॅलो भेटल्यावर तिचं आनंदून जाणं, तो हरवल्यावर पुन्हा कोषात जाणं, तरीही न डगमगता त्याला शोधण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणं, हे सगळं तिने फार सुंदररीत्या पडद्यावर रंगवलं आहे. चित्रपट पाहताना तिच्या भावविश्वाशी आपण एका क्षणात जोडले जातो, इतका तरल आणि सहजसुंदर अभिनय या गोडुलीने केला आहे. क्लायमॅक्सच्या दृश्यात तर तिचं ते रडणं पाहून काळीज तुटतं. तिच्या वडिलांच्या भूमिकेत दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी धमाल आणली आहे. विजू खोटे, मुकेश ऋषी, टिनू आनंद या सुप्रसिद्ध कलाकारांसोबत इतर लहानसहान भूमिकांतले कलाकारही लक्षात राहतात. विशेषतः साशासोबतचा तो लहान टकलू मुलगा वारंवार एकच वाक्य म्हणत राहतो, ते फार गोड आणि नैसर्गिक वाटतं. लता, गोल्डी, नोकर, नन, रंगा या सगळ्यांनीही धमाल आणली आहे. चित्रपटाचं लेखन संजय छेल, संतोष सिवन आणि स्नेहेंद्र यांनी केलं आहे. कुठेही बोजड संवाद न वापरताही कथा रंजक पद्धतीने कशी सांगावी, याचं हा चित्रपट म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे. चित्रपटातलं 'मेरा गाना है बहाना, हेलो हेलो का तराना' हे गाणं, त्याच्या सहजसुंदर चालीमुळे आणि सोप्या शब्दांमुळे लक्षात राहतं.
१९९६ सालचा हा चित्रपट आजही तितकाच रेलेव्हंट वाटतो, कारण मानवी मूल्यांबाबत कसलीही मोठी भाषणं न देता तो बोलतो. आज चित्रपट निर्मितीची साधनं पूर्वीपेक्षा जास्त पॉलिश्ड झालेली असताना निरागसतेच्या अशा कथांची निकड जास्त जाणवते आहे.
- संदेश कुडतरकर.