चौकट

युवा विवेक    15-Jun-2021   
Total Views |
 
frame_1  H x W:
माणूस कशासाठी जगतो? आध्यात्मिक वगैरे पातळ्यांवर फारच गहन-बिहन मानल्या जाणाऱ्या या सखोल प्रश्नाचं उत्तर खरं तर एका शब्दात देता येतं.... ते म्हणजे चौकट ! म्हणजे बघा ना, जन्माला आल्यावर पाळण्यापासून ते अंताच्या क्षणी आलेल्या ॲम्ब्युलन्सपर्यंत माणूस फक्त चौकटींमागे धावत असतो. पाळणा, दुपटं, फरशी, घर, शाळा, वर्ग, फळा इथपासून सुरू होणारा प्रवास शेवटी खाटेवर येऊन थांबतो तरीही चौकटी बदलायची माणसाची खुमखुमी काही सुटत नाही. अहो, सुटणं शक्यही नाही. कारण चौकट आणि युनिफॉर्म या दोन गोष्टी माणसाला एक अलौकिक भावनेची देणगी देऊन जातात, ती भावना म्हणजे स्वामित्व !
दुकानाच्या काउंटरपलीकडचा माणूस अलीकडच्या माणसापेक्षा स्वामित्वाच्या भावनेत वरचढ असतो, कारण तो त्या चौकटीचा मालक असतो. त्यामुळेच मागच्या भिंतीवर कितीही 'ग्राहक देवो भव'ची पाटी लावली तरी त्याला हे पक्कं ठाऊक असतं की, उद्या काही वाद झाले तरी आपण ग्राहकाला 'गेट आउट' म्हणू शकतो, तो आपल्याला हे म्हणू शकत नाही. मग त्याची बाजू योग्य का असेना, मालक आपण आहोत. ही स्वामित्वाची खरी ओळख. काही लोक या भावनेतही 'जळाहुनी शीतळू' असतात; पण ते रेल्वेतल्या 'विंडो सीट्स'सारखे आपल्या वाट्याला क्वचितच येतात. बाकी बहुतांश लोकांना ही चौकट आणि त्यावरची आपली मालकी हेच कर्तृत्वाचं एव्हरेस्ट वाटतं आणि तसं वाटण्यात त्यांची काही चूक असते, असंही नाही म्हणता येणार. आपल्याकडचे पिढीजात संस्कारच तसे असतात.
काहीशे चौरस फुटांचं घर, घरात फ्रीज, टीव्ही, ओव्हन, वॉशिंग मशीन इत्यादी पाहुण्यांची रेलचेल, खाली तसंच एक आपल्या नावाचं पार्किंग आणि त्यात उभी असलेली तितकीच मठ्ठ, चौकोनी चेहऱ्याची गाडी..... हे सगळं आपण कसं आयुष्यभर कष्ट करून, रात्रीचा दिवस आणि रक्ताचं पाणी करून कमावलंय, हे पुन्हा कोणालातरी सांगत राहण्याचा वेडा अट्टहास.... ऐकणारा ते खरंच मनापासून ऐकतोय का, त्याला खरंच तुमची 'कर्तृत्वगाथा' कौतुकास्पद वाटतीय की, हातातल्या पोह्यांच्या प्लेटपायी तो तुमचं नीरस पुराण सहन करतोय आणि मुळात त्यानं तुमचं का ऐकावं, कारण तोही त्याच सगळ्या भट्टीतून जळून निघालेला असणार आहे, असे प्रश्न या कर्तृत्ववान महानुभवांना कदापि पडत नाहीत. स्वामित्वभावाचा हाच मोठा घोळ असतो खरं तर.... ते नुसतं असून भागत नाही, ते सतत दाखवत राहावं लागतं. त्याची स्वतःला आणि इतरांना सतत जाणिव करून देत राहावी लागते. जितकी जाणीव प्रखर, तितकी त्या भावनेची धारही तेजतर्रार. या दाखवण्याचेही अनेकविध मार्ग असतात. उदाहरणार्थ, कोणी आपल्याकडे काहीतरी लिहायला साधं नोटपॅड जरी मागितलं तरी, त्याच्या पहिल्या पानावर ताबडतोब आपलं नाव टाकून ठेवणे. ही दिसेल तिथं आपल्या नावाची निशाणी सोडून यायची आचरट खोड यातूनच मोठी होत जाते. परवा तर एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये कोण्या महाभागानं 'बघतोस काय संतापानं, नाव लिहिलंय जयंतच्या बापानं,' असा खानदानी ठसा उमटवलेला पाहायला मिळाला. म्हणजे या जयंत नामक कोण्या इसमाच्या बापाकडे आलम दुनियेनं प्रेमानंच बघावं, हाही स्वामित्वभावच म्हणायचा की.....
या मंडळींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक एका गोष्टीत कधीच सुखी राहूच शकत नाही. यांना सतत काही ना काहीतरी नवीन चौकट हवी असते, जी त्यांच्यासाठी त्या त्या वेळेपुरती 'जीने का सबब' वगैरे असते. म्हणजे बघा, शाळेतल्याला कॉलेजात जायचं असतं, कॉलेजवाल्याला हापिसची हौस असते, हापिसातल्या खुर्चीत बस्तान टेकवलं की, लग्नाचा चौकोनी मंडप दिसत असतो, मग हापिसामागून हापिस चालले, खुर्चीमागून खुर्ची असा प्रवास सुरू होतो. मध्येच कोणाला तरी बिजनेसचा झटका आला तर त्यासाठीची मगजमारी वेगळीच, बाकी वर म्हटलं तसं घर वगैरे आहेच.
रिटायरमेंटनंतर मात्र पुणे नामक तीर्थक्षेत्री दोन गुंठे प्लॉटमध्ये 'सार्थक', 'कृतार्थ' किंवा 'देवकृपा' असल्या नावाची एक टुमदार चौकोनी बंगली वसवली की साठीशांत किंवा पंचाहत्तरीच्या सोहळ्यासाठी पार्टी तयार.... तिथून पुढं मग येणाऱ्या-जाणाऱ्या नव्या पिढीला मार्गदर्शन (आम्ही कित्ती कष्ट काढले, काय सांगू....) ती पिढीही तोंडावर नमस्कार करून बाहेर पडल्यावर 'काय चमत्कारिक म्हातारा आहे, तू कष्ट काढले तर आम्ही काय गोट्या खेळतोय का?' असे आदरयुक्त शब्द उच्चारत आपापल्या कचेऱ्यांकडे, म्हणजेच नव्या चौकटींकडे धावत असते..... काय करणार, पिढीजात संस्कार, दुसरं काय....
खरं तर या अशा लोकांवरच समाजाचा गाडा यथासांग चालू असतो. अहो, उद्या प्रत्येकजण उठून चित्रकार आणि नट व्हायला लागला तर खऱ्या कलावंताला विचारणार कोण हो? बरं, चित्रकार, नटांना तरी कॅनव्हास आणि स्टेजच्या चौकटी चुकलेल्या नाहीतच.... प्रत्येक जण आपापल्या वाट्याचं आणि वाटेचं जिणं समरसून जगत असतो. चिडतो, रडतो, अडखळतो, पडतो, पुन्हा उठतो आणि पळायला लागतो. कारण आज पळालो नाही तर, उद्या चालायला तरी हे पाय साथ देतील की नाही, याची खात्री कोणालाच नसते....
शेवटी काय, पळणाऱ्या पायाखालची दिशा महत्वाची, चौकटीबाहेरच्या आभाळाला भिडणारे पाय कुठल्याच चौकटीतले नसतात.
अक्षय संत