बहुरूपी

युवा विवेक    22-Jun-2021   
Total Views |
'जगात वेदनेची एखादी कळ उठल्याशिवाय विनोदाची खरी किंमत आपल्याला कळत नाही.... '
विनोद आणि कारुण्य यांचा मिलाफ अशा पद्धतीने एका वाक्यात मांडता येण्यासाठी आयुष्य खूप आतून बघावं, अनुभवावं लागतं. पु. ल. देशपांडे यांचं हे वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं तत्वज्ञान आहे. गेल्याच आठवड्यात बारा जूनला पुलंच्या दुःखद निधनाला एकवीस वर्षं झाली, पण आजही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही 'पुलं' माहिती नसणारा मराठी माणूस शोधूनही सापडणार नाही. मराठीच नव्हे, तर भारतीय साहित्यविश्वात पुलंइतकी अमाप लोकप्रियता क्वचितच कोणाला लाभली असेल.
तसे आपल्याकडे अगदी व्यास-वाल्मिकींपासून गालिब-गदिमांपर्यंत अनेक अभिजात लेखक, कवी होऊन गेले, पण पुलं ही दोन अक्षरं गेली जवळ-जवळ सत्तर वर्षं मराठी मनाचा मानबिंदू म्हणून आपलं स्थान टिकवून आहेत. महाराष्ट्रात शेकडो, हजारो साहित्यिक होऊन गेले, पण महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व हे बिरुद मात्र एकाच व्यक्तीला मिळालं, ते म्हणजे पु. लं. देशपांडे..... असं काय होतं या नावात, या व्यक्तिमत्वात? पुलंच्या कर्तृत्वावर आजवर इतक्या वेळा लिहिलं-बोललं गेलंय की, अनेकदा पुलं त्या हत्ती आणि सात आंधळ्यांच्या गोष्टीतल्या हत्तीसारखे वाटतात. कोणाला त्यांच्या विनोदाची शैली आवडते कोणाला त्यांचं संगीत भावतं, कोणी त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रेमात तर, कोणाला त्यांच्या दानशूरतेचं कौतुक..... पिग्मालियन किंवा इडिपसचा सांगोपांग अभ्यास केलेले जाणकारही 'ती फुलराणी' च्या 'तुला शिकविन चांगलाच धडा' वर माना डोलवताना दिसतात. पुलंची वाक्य आणि त्यांच्या उपमा रोजच्या व्यवहारात वाक्प्रचारांसारखी वापरली जातात.एवढंच नाही तर आजच्या डिजिटल युगात मीम्सपासून टी शर्टसवरच्या कोट्सपर्यंत पुलंच्या साहित्याचा मुक्तसंचार दिसतो आणि तरीही 'अतिपरिचयात अवज्ञा' ही उक्ती पुलंना लागू होत नाही. ही हेवा वाटण्याइतकी लोकप्रियता पुलंना मिळण्याचं कारण काय असावं? तशी कारणं अनेक आहेत, पण मला वाटतं, पुलंच्या लोकप्रियतेचं मूळ कुठंतरी आपल्या सामाजिक आणि मानसिक जडण-घडणीतच आहे. त्यांच्या आधीच्या किंवा त्यांच्या समकालीन लेखकांचं लेखन वाचताना ते 'आपलंसं' वाटतं, पण त्यांचं लेखन आपल्याला 'आपलं' वाटतं. त्यांच्या लेखनात सतत असणारा 'मी' हा ताम्हणकरांच्या गोट्या किंवा चिं. वि. जोशींच्या चिमणरावासारखाच काल्पनिक असेल, पण त्यातल्या 'मी' या संबोधनामुळे तो काल्पनिक वाटत नाही. त्यांच्याच हरितात्यांसारखे ते स्वतःही त्यांच्या गोष्टींमधला एक भाग बनतात, कदाचित त्यामुळेच त्यांच्याबरोबर आपणही गटणेच्या अतिभावुकतेनं हैराण होतो, नंदा प्रधानच्या ट्रॅजेडीनं गलबलतो आणि अंतूशेठबरोबर गंजिफा खेळायलाही बसतो. चार्ली चॅप्लिन आणि पुलंमधलं हे फार मोठं आणि महत्वाचं साम्य आहे. दोघांनीही स्वतःवर हसत लोकांना हसवलं आणि त्याच भरात विनोदामागचं कारुण्यही अगदी अलगद दाखवून दिलं. मग ते गोल्ड रशमधलं चॅप्लिनचं बूट खाणं असो की चितळे मास्तरांच्या झिजलेल्या टाचांच्या चपला असोत....
साध्या माणसांची साधीसोपी सुख-दुःखं मांडणाऱ्या पुलंवर अनेकदा 'मध्यमवर्गीयांचे लेखक' म्हणून टीकाही झाली, पण त्यावर त्यांचं अत्यंत प्रामाणिक उत्तर होतं, 'जे मी बघितलं, अनुभवलं आणि त्यातून मला जे जाणवलं तेच मी लिहिलं. उगीच जे अनुभव माझ्या वाट्याला आलेच नाहीत, त्याबद्दल मी का लिहू?' असं असूनही त्यांच्या सामाजिक जाणिवा किती प्रखर आणि संवेदनशील होत्या हे त्यांनी लिहिलेल्या 'कोसला' च्या प्रस्तावनेतून किंवा 'एक शून्य मी' सारख्या त्यांच्या अत्यंत आशयघन गंभीर लेखमालिकेतून स्पष्टपणे कळतं. मध्यमवर्गीयांचे लेखक म्हणून ओळखला गेलेला साहित्यिक जेव्हा तुझे आहे तुजपाशी, ती फुलराणीसारख्या नाटकांमधून बुवाबाजी, सामाजिक विषमता या मुद्द्यांवर कुठेही प्रचारकी न होता अत्यंत हसतखेळत भाष्य करतो, अनेक सामाजिक संस्थांना मुक्तहस्ते मदत करतो तेव्हा मात्र त्यांच्यातल्या सह्रदय माणुसकीसमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं.
पुलंच्या आयुष्याकडे बघताना मला नेहमीच खांद्यावर झेंडा आणि कपाळी अबीरबुक्का फासून वारीत चालणाऱ्या वारकऱ्याचीच आठवण येते. आपल्याच परमानंदात तल्लीन असणारा वारकरी जसा तेवढ्या दिवसांपुरता का होईना, आपल्या सगळ्या काळज्या, विवंचना विसरून जातो. पुलंही आयुष्यभर असेच एखाद्या वारीत फिरल्यासारखे जगले. गडकरी आणि वुडहाऊसवर त्यांनी सारखंच प्रेम केलं. त्यांना बालगंधर्व जितके प्रिय तितकीच बेगम अख्तरही आणि टागोर जितके आवडीचे तितकाच वॉल्ट डिस्नेही..... स्थळ, काळ, धर्म, पंथ, जात, ओळख असल्या कोणत्याही मर्यादा त्यांनी कलाकाराच्या आणि त्याच्या बावनकशी कलाविष्काराच्या आड येऊ दिल्या नाहीत. आणि म्हणूनच पुलं फक्त महाराष्ट्रीय न राहता खऱ्या अर्थानं ग्लोबल झाले आणि आजही आहेत.
'अनंत हस्ते कमलवराने, देशील किती तू दो हातांने' असं कलेचं, संस्कारांचं आणि प्रसिद्धीचं समृद्ध दान लाभलेला हा पुरुषोत्तम.... जगण्याच्या जत्रेत एखाद्या लहान मुलासारखा पालं बघत, रमत हिंडणारा मुसाफिर, भावनेला शास्त्रकाट्याच्या कसोटीवर तोलणारा संवेदनशील माणूस.... आणि दारावर येणाऱ्या वासुदेवाइतकाच आदिम आणि कालातीत बहुरूपी.... बहुरूपी पुलं....
- अक्षय संत