फकिरा : अक्षय संत

युवा विवेक    29-Jun-2021   
Total Views |

Faqira_1  H x W 
आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो.. एका अवलिया फकिराची गोष्ट..... गोष्ट म्हणण्यापेक्षाही हा त्याच्या कहाणीचा पूर्वरंग म्हणता येईल. कथानायकाचं खरं नाव नंतर सांगेनच, पण सध्या तरी आपण त्याला फकिराच म्हणू या.....!
तर, ही गोष्ट सुरू होते फकिराच्या जन्मापासून.... येशू ख्रिस्ताप्रमाणेच फकिराचा जन्मसुद्धा एका कुमारी मातेच्या पोटी झाला. त्याच्या आईची इच्छा होती की, त्यानं खूप शिकावं, छान पदवीधर व्हावं. ती स्वतःसुद्धा पदवीधर होती. पण, परिस्थितीमुळे म्हणा किंवा अजून काही कारणाने असेल, तिला हे मूल सांभाळणं शक्य नव्हतं. तिनं ते मूल कोणाला तरी दत्तक द्यायचं ठरवलं. बऱ्याच शोधाशोधीनंतर तिनं एका उच्चशिक्षित वकील कुटुंबाची निवड केली. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एका रात्री मुलं दत्तक देणाऱ्या संस्थेनं दुसऱ्याच एका कुटुंबाला फोन करून त्या मुलाला दत्तक घेण्याबद्दल विचारलं, कारण ते वकील कुटुंब अजून संस्थेच्या वेटिंग लिस्टवर होतं. त्या दुसऱ्या कुटुंबानं आनंदानं मुलाचा स्वीकार केला. फकिराची आईपण खुश होती, पण सर्व सोपस्कार पूर्ण होऊन जेव्हा कागदोपत्री सह्या करायची वेळ आली, तेव्हा तिला कळलं की फकिराची होणारी आई पदवीधर नाही आणि त्याचे होणारे वडील तर कधी शाळेतही गेलेले नाहीत. ऐन वेळी तिनं फकिराला या कुटुंबात दत्तक द्यायला नकार दिला, पण फकिराच्या नव्या आईवडिलांनी तिला वचन दिलं की ते त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी घेतील आणि त्याला पदवीधर व्हायला लागेल ती मदत करतील. फक्त या एका वचनावर फकिराची आई राजी झाली.
त्याच्या आईवडिलांनी त्यांचं वचन पूर्ण केलं. वरील घटनेनंतर सतरा वर्षांनी फकिरानं पदवीधर होण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तो आता नियमित कॉलेजला जात होता. त्याच्या आईचं स्वप्न पूर्ण होताना दिसत होतं. पण पुन्हा एकदा आयुष्यानं वेगळंच वळण घेतलं.
कॉलेजमध्ये जायला लागल्यापासून सहाव्या महिन्यातच फकिराचा अभ्यासातला इंटरेस्ट संपला. पाठ्यपुस्तकातलं “मार्क्स”वादी शिक्षण त्याला कंटाळवाणं वाटायला लागलं. पाठांतराला ज्ञान आणि त्यावर मिळालेल्या कागदाला पदवी म्हणणं ही कल्पनाच त्याला असह्य व्हायला लागली. शेवटी सहाच महिन्यांत साहेबांनी कॉलेजला रामराम ठोकला. पण पुढं काय?
वर्गात बसणं सोडलं तरी तो कॉलेज कॅंपसमधून हिंडत राहायचा. कॅम्पसमध्ये डकवलेली पोस्टर्स, पत्रकं वाचत तासनतास उभा राहायचा. त्यातूनच तो त्या पोस्टर्सवरच्या अक्षरांकडे आकर्षित झाला. ती अक्षरं बघता बघता त्याला एका नवीन गोष्टीचा शोध लागला.... कॅलिग्राफी....!
जेव्हा इतर मुलं वर्गात बसून अभ्यास करायची, तेव्हा तो अक्षरांच्या आकारउकारांचं गूढ उकलण्यात रमलेला दिसायचा. पुढं काही वर्षांनी हाच फकिरा नव्या युगाच्या नव्या ऑपरेटिंग सीस्टिमचा आणि अतिशय आर्टिस्टिक आणि अफलातून फॉन्टसचा प्रणेता बनला..... त्या फकिराचं नाव स्टीव्ह जॉब्ज.... ॲपलचा सर्वेसर्वा, जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम अनिमेशन कंपनी ‘पिक्सार’चा संस्थापक आणि रूढी-परंपरांच्या चौकटी उधळून देत संगणक क्षेत्राला नवीन आयाम देणारा एक अद्भुत अवलिया फकिरा....
२००५ साली स्टॅन्डफोर्ड युनिव्हर्सिटीच्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून केलेल्या भाषणात त्यानं आपली ही गोष्ट तिथल्या नवपदवीधर तरुणांसमोर सांगितली. गोष्टीची सुरुवात करताना त्यानं एक खूप महत्वाचा मुद्दा मांडला..... कनेक्टिंग डॉटस..... बिंदू जोडणं...!
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक चांगल्या-वाईट घटनांचं विश्लेषण आपण नेहमीच करत असतो. त्या त्या घटनांमधून, अनुभवांमधून जाताना आपण स्वतःला कायम एक प्रश्न विचारतो, व्हाय मी? हे माझ्याच बाबतीत का? यावर स्टीव्ह जॉब्ज म्हणतो, तुम्ही फक्त भविष्याचाच विचार करून जगण्याचे बिंदू नाही जोडू शकत..... त्यासाठी तुम्हाला भूतकाळाचा आधार घ्यावाच लागतो. यू कॅन्ट कनेक्ट डॉटस लुकिंग फॉरवर्ड..... फक्त तुमचा जगण्यावरचा विश्वास आणि आयुष्याबद्दलचं तुमचं कुतुहल मात्र या प्रवासात कुठंही हरवू द्यायचं नाही.....
आत्ताच्या घडलेल्या एका घटनेला मागच्या हजार गोष्टींचे संदर्भ असू शकतात, नव्हे, बऱ्याचदा असतातच.... स्टीव्ह जॉब्ज चारचौघांसारखा कॉलेजमधून पदवीधर झाला असता तर कदाचित सगळंच वेगळं असतं..... मला वाटतं हा फक्त एका प्रतिथयश उद्योजकानं उमलत्या तरुणाईला दिलेला कानमंत्र नाही.... हा आनंदी आणि प्रगल्भ जीवनाचा एक आदिम मूलमंत्र आहे.
- अक्षय संत